गडचिरोली: एटापल्ली शहरात सोमवारी संध्याकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांनी भरलेली बस धावत असताना अचानक बसचा मागील भाग निखळून रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या अपघातावेळी बसचा वेग कमी होता, तसेच बसच्या मागे कोणतेही इतर वाहन किंवा नागरिक नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे मात्र एसटीच्या देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नेमकी घटना काय?
गडचिरोलीहून मुलचेरा-बोलेपल्ली मार्गे एटापल्लीकडे येणारी अहेरी आगाराची ‘मानव विकास मिशन’ अंतर्गत चालवली जाणारी बस सोमवारी सायंकाळी एटापल्ली शहरात दाखल झाली होती. बसस्थानकाकडे जात असताना गोटूलसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक बसच्या मागील भागाचा पत्रा आणि संरचना (स्ट्रक्चर) तुटून रस्त्यावर पडली. मोठा आवाज झाल्याने चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखून बस थांबवली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे बसमधील सुमारे ३० प्रवासी प्रचंड घाबरले आणि तातडीने खाली उतरले.
नागरिकांचा संताप आणि प्रशासनाची कारवाई
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या मागील भागावरील पत्रा अत्यंत जुना, कमकुवत आणि तात्पुरत्या स्वरूपात जोडलेला होता. एसटी महामंडळाच्या या भोंगळ आणि जीर्ण कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय कार्यालयाने तातडीने चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासणीमध्ये बसच्या देखभाल-दुरुस्तीत हलगर्जीपणा झाल्याचे समोर आल्याने, अहेरी आगारातील संबंधित सहाय्यक कारागिराला (Assistant Artisan) तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
गडचिरोली जिल्ह्यात एसटीच्या दुरवस्थेबाबत प्रश्न निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गडचिरोली-घोट मार्गावरील बसच्या छतामधून पावसाचे पाणी गळल्याने प्रवाशांचे हाल झाले होते, तर अहेरी आगाराच्याच एका धावत्या बसचे छत उडाल्याची घटनाही घडली होती. या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळून अशा जीर्ण बस रस्त्यावर का उतरवल्या जात आहेत, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.


