पाली : रायगड जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जमिनीखाली राहणारे अनेक साप आणि जीव आसरा शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा पांढराशुभ्र ‘अल्बिनो चंचू वाळा’ हा बिनविषारी साप आढळून आला आहे.
बिळात पाणी शिरल्याने बाहेर पडला
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असून सापांची बिळे पाण्याने भरली आहेत. परिणामी, हा साप सुरक्षित आणि कोरड्या जागेच्या शोधात बाहेर पडला होता. माणगावमधील स्थानिक नागरिक योगेश तुपट यांनी या सापाचे अनोखे रूप पाहून वन्यजीव अभ्यासकांशी संपर्क साधला. माणगावमधील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी या सापाची पाहणी केली आणि तो ‘अल्बिनो चंचू वाळा’ असल्याची माहिती देत त्याची ओळख पटवली.
काय आहे ‘चंचू वाळा’?
‘चंचू वाळा’ (शास्त्रीय नाव: Grypotyphlops acutus) हा सापाचा एक बिनविषारी प्रकार आहे. हे साप प्रामुख्याने जमिनीखाली, मातीत किंवा कुजलेल्या पानांच्या ढिगाऱ्याखाली राहतात. वाळवी आणि मुंग्यांची अंडी हे त्यांचे मुख्य अन्न आहे. हे आकाराने लहान असतात. त्यांचे डोळे आणि तोंड पाहताना चोचीसारखा आकार दिसतो, म्हणून त्यांना ‘चंचू वाळा’ म्हणतात.
जनुकीय बदलामुळे पांढरा रंग
सामान्यतः हा साप गडद रंगाचा असतो. मात्र, ‘अल्बिनो’ ही एक दुर्मिळ जनुकीय अवस्था आहे, ज्यामध्ये सापाच्या शरीरातील रंगद्रव्ये पूर्णपणे नष्ट होतात. या जनुकीय बदलामुळे तो चकाकणारा पांढरा किंवा फिकट गुलाबी रंगाचा दिसतो. ही अवस्था निसर्गात खूप दुर्मिळ असते आणि अशा प्राण्यांना निसर्गात तग धरून राहणे व जगणे अवघड असते, असे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी सांगितले.
वन्यजीव अभ्यासकांचे आवाहन
पावसामुळे अनेक जीव बाहेर पडत असल्याने वन्यजीव अभ्यासकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणताही अनोखा जीव आढळून आल्यास त्यांना मारू नये; तर त्वरित वनविभाग किंवा स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधावा.


