अवघ्या काही सेकंदांत होणार जमीन मोजणी! अत्याधुनिक ‘रो्अर’ मशिन्स दाखल

   Follow us on        

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यातील जमीन मोजणीच्या प्रक्रियेला आता कमालीची गती मिळणार आहे. भूमिअभिलेख विभागाच्या दिमतीला तब्बल ७८ अत्याधुनिक ‘रो्अर’ (ROVER) मशिन्स दाखल झाल्या आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अवघ्या ३ ते १० सेकंदांत जमिनीचे अचूक रीडिंग मिळून अक्षांश-रेखांशासह जमिनीचा नकाशा (मॅप) स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. यामुळे मोजणीतील मानवी त्रुटी दूर होऊन जमिनीचे वाद मिटण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय शासनाने मोजणी शुल्कात मोठी कपात केल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ‘भाऊ हिस्सा’ वेगळा करण्याचे शुल्क दोन हजार रुपयांवरून थेट २०० रुपयांवर आणले गेले आहे, ज्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या वार्षिक महसुलात काहीशी घट झाली आहे.

​भूमिअभिलेख विभागाने मोजणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणण्यासाठी पूर्वीचे क्लिष्ट प्रकार बंद करून आता केवळ ‘साधी मोजणी’ आणि ‘जलद मोजणी’ असे दोनच प्रकार ठेवले आहेत. नवीन नियमांनुसार, १० हेक्टर जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून, त्यापुढील प्रत्येक हेक्टरसाठी नियमानुसार शुल्क वाढणार आहे. जिल्ह्यात मोजणी कामांसाठी पुरेसे सर्व्हेअर (भूमापक) नियुक्त करण्यात आले असून मनुष्यबळाचा कोणताही प्रश्न सध्यातरी प्रलंबित नाही. या नवीन रो्अर मशीनमुळे आता प्रत्यक्ष बांधावर होणारी कलाई आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे.

​दुसरीकडे, जिल्ह्यात अजूनही जमीन मोजणीची ३५० प्रकरणे प्रलंबित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक जमिनींचे खातेदार नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. मोजणीच्या वेळी सर्व संबंधित भागधारकांची सांगड घालणे प्रशासनाला कठीण जात असून, सर्व खातेदार वेळेत एकत्र येत नसल्यामुळेच ही मोजणी रखडल्याचे चित्र आहे. मात्र, मुंबई-पुण्यातील खातेदारांनी सहकार्य केल्यास ही प्रलंबित ३५० प्रकरणेही काही दिवसांत निकाली निघतील, असा विश्वास भूमिअभिलेख विभागाने व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search