दोडामार्ग:
तालुक्यातील मोर्ले गावात रविवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी पंकज गवस यांच्या मांगरात (गोठ्यात) अन्नाच्या शोधात शिरलेल्या सुमारे १५ फूट लांबीच्या एका अवाढव्य अजगराने एका कुत्र्याला आणि त्याच्या चार निष्पाप पिल्लांना जिवंत गिळल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण मोर्ले परिसरात भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज गवस यांच्या मांगरामध्ये नेहमीप्रमाणे एक कुत्रा आणि त्याची चार पिल्ले राहत होती. रविवारी सकाळी ही पिल्ले अचानक दिसेनाशी झाल्याने गवस यांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. मांगरामध्ये शोध घेत असताना त्यांना एक भलामोठा अजगर निपचित पडलेला दिसला. त्या अजगराचे पोट कमालीचे फुगलेले होते, ज्यावरून त्याने मोठी शिकार केल्याचे स्पष्ट होत होते. अन्नाच्या शोधात आलेल्या या अजगराने कुत्रा आणि त्याच्या चारही पिल्लांना एकामागून एक गिळंकृत केले होते.
ही बातमी वाऱ्यासारखी सबंध गावभर पसरताच, अजगराला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मांगराबाहेर मोठी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत सावधगिरी बाळगत अजगराचे सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. यानंतर त्या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सुखरूप सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण असले, तरी वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.


