Category Archives: कोकण गौरव

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार हिवाळी विशेष गाडी; आरक्षण ‘या’ तारखेपासून सुरु

Konkan Raiwlay:या महिन्यात कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. पश्चिम रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर एक दिनांक ०८ डिसेंबर पासून एक द्विसाप्ताहिक विशेष गाडी चालविणार आहे. या गाडीच्या एकूण १६ फेऱ्या होणार असून या गाडीचे आरक्षण दिनांक ०७ डिसेंबर रोजी पासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. या गाडी बद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे
०९४१२/०९४११ अहमदाबाद – थिवी  – अहमदाबाद द्विसाप्ताहिक विशेष (एकूण १६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९४१२ विशेष अहमदाबाद येथून दिनांक ०८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२५ पर्यंत दर रविवार आणि बुधवार या दिवशी दुपारी १४:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी  ११ वाजता थिवी  येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९४११ विशेष थिवी येथून दिनांक ०९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ पर्यंत दर सोमवार आणि गुरुवार या दिवशी सकाळी ११:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०८:४५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
थांबे:  आनंद,वडोदरा, भारूच, उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी
ही गाडी एसी टू टायर, एसी थ्री टायर, स्लीपर क्लास आणि जनरल कोचसहीत चालविण्यात येणार आहे.

Loading

ओंकार लाड; वैभववाडीचा ‘संदेश जिमन’

   Follow us on        
सिंधुदुर्ग: समाज माध्यमांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपला संदेश संबंधित यंत्रणेकडे पोहोचवून इच्छित परिणाम  साधता येतो. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना केवळ फेसबुकच्या  माध्यमातून जनजागरण करून संगमेश्वर या रेल्वे स्थानकावर गाडयांना थांबे मिळवून देऊन पत्रकार संदेश जिमन यांनी ही गोष्ट दाखवून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी स्थानकावरील प्रश्नांसाठी सुद्धा ओंकार लाड या नावाच्या तरुणाने नेहमीच आवाज उठवला आहे. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून त्याने या स्थानकावरील गैरसोयींवर यंत्रणेचे लक्ष वेधले आहे. वैभववाडी स्थानकावर पुरेशी प्रवासी संख्या असताना सुद्धा पादचारी नाही होता. याकडे ओंकार ने वेळोवेळी X च्या माध्यमातून इथे पादचारी पूल व्हावा अशी मागणी केली होती. त्याचा या प्रयत्नाला अखेर यश आले असून येथे एक पादचारी मंजूर करण्यात आला असून कालच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
मूळ गाव वैभववाडी-नापणे असलेला ओंकार सध्या मुंबईमध्ये आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण करत आहे. तसेच शिक्षण पूर्ण करता करता तो नामांकित बिग ४ मध्ये नोकरी सुद्धा करत आहे. मुंबईमध्ये सध्या तो आई बाबा समवेत वास्तव्यास आहे. कोकण रेल्वे असो व मुंबई लोकल, ज्या ज्या गोष्टी त्याला खटकतात त्या त्या गोष्टी तो X च्या माध्यमातून शासनासमोर आणि जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्म वरून खाली उतरून रूळ ओलांडावे लागत आहे. यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींचे खूप हाल होतात. पुरेशी प्रवासी संख्या असूनही प्रशासन इथे साधा एक पादचारी पूल का बांधत नाही हा प्रश्न त्याने उठवायला सुरवात केली. येथील आमदार नितेश राणे यांच्या x वरील पोस्ट वर कंमेंट करून किंवा संबंधित यंत्रणेला टॅग करून त्याने जनजागरण केले. अखेर त्याचा प्रयत्नांना यश आले असून येथे एक पादचारी पूल मंजूर झाला आहे.
वैभववाडी स्थानकावर या पुलाव्यतिरिक्त अजून कित्येक प्रश्न आहेत. या स्थानकावर अजून गाडयांना थांबा मिळणे आवश्यक आहे. तसेच येथे PRS तिकीट बुकिंग सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. या गोष्टींसाठी मी माझे प्रयत्न नेहमीच चालू ठेवीन असे ओंकार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला

Loading

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा; खासदार सुनील तटकरे यांची संसदेत मागणी

   Follow us on        
Konkan Railway Merger: कोंकण रेल्वे महामंडळाचे KRCL चे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी काल रायगड मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत केली. काल केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना त्यांनी ही मागणी केली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक स्वायत्त संस्था असून तिची स्थापना कोकण मार्गाचे बांधकाम कारण्याच्या हेतूने झाली होती. कोकण रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर तो भारतीय रेल्वेच्या एखाद्या विभागाला हस्तांतरण करणे गरजेचे होते. मात्र २५ वर्षे झाली तरीही तो हस्तांतरित झाला नाही. त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गाच्या विकासावर झाला. कोकण रेल्वेचे स्थापना होवून 25 वर्षे झाली तरीही पाहिजे तसा विकास तिचा झाला नाही.  KRCL आपल्या पूर्ण क्षमतेने विकास करण्याचा प्रयत्न करत असले तरीही त्यावर निधीअभावी मर्यादा येत आहेत. गेल्या २५ वर्षात प्रवासी संख्या कितीतरी पटीने वाढूनही त्या प्रमाणात गाड्या आणि सुविधा वाढल्या नाहीत. मुख्य म्हणजे कोकण गाड्या वाढविण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करणे खूप गरजेचे असूनही निधी मिळत नसल्याने अजूनही झाले नाही. अर्थसंकल्पातही कोकण रेल्वेसाठी कोणतीही तरतूद होत नाही. यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी जोर धरू लागली होती.
दिलासादायक गोष्ट म्हणजे आता रेल्वे संघटनेनंसोबत आता लोकप्रतिनिधींनीही याबाबत आवाज उठवायला सुरवात केली आहे. हल्लीच दक्षिणेकडील राज्यातील लोकप्रतिनिधींनी कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाची मागणी केली होती. आता खासदार सुनील तटकरे यांनी प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहचवून सुरवात केली असून लवकरच प्रवाशांना कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन झाल्याची गोड बातमी मिळेल अशी खात्री आहे.

Loading

कोकणच्या मातीचा गंध असलेली, सावंतवाडीच्या सुपुत्राने बनवलेली वेबसीरीज ‘संभ्रम’ बुधवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ट्रेलर येथे पहा

S. R. Y. Production प्रस्तुत, निर्माता आनंद मिस्त्री, लेखक रमेश भेकट आणि दिग्दर्शक कारिवडे गावच्या सागर गोसावी यांच्या संकल्पनेतून 'संभ्रम' ही रहस्यमय कथा साकारली आहे. ही कथा कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या रहस्यमयी आणि असामान्य गोष्टींमुळे प्रेम, नाती, मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करते. प्रेक्षकांच्या मनातही भ्रम निर्माण होतो.

   Follow us on        
सावंतवाडी, ता. ८ : तालुक्यातील कारिवडे-गोसावीवाडी येथील सागर गोसावी या युवकाने दिग्दर्शित केलेल्या सात भागांची ‘संभ्रम’ ही मराठी वेबसीरीज बुधवारी (ता.१०) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होणार आहे. आज  त्याच्या पोस्टरचे अनावरण आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गरीब आणि ग्रामीण तरुणाच्या जीवनावर आधारित बनवलेल्या या वेबसीरीजमध्ये प्रेम प्रकरणातून मित्रांमध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण होते, हे दाखविल्याचे निर्माता आनंद मेस्त्री आणि दिग्दर्शक सागर गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
सावंतवाडी आणि परिसरात सिरीजचे शूटिंग झाले. चार साडेचार लाख रुपये खर्च करुन हा प्रयत्न केला आहे. यात स्थानिक कलाकारांनी काम केले आहे. वेब सिरीजमध्ये सुरुवातीच्या भागापासून निर्माण झालेला गुंता, संभ्रम शेवटच्या भागांमध्ये उघड होतो. त्यामुळे सर्वच्या सर्व भाग निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. परंतु, नव्याने काहीतरी करण्याच्या उमेदीने आणि या भागातील निसर्ग आणि कलाकार जगासमोर यावेत यादृष्टीने काम करत आहोत. आम्हाला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. ही प्राथमिक सुरुवात आहे. भविष्यात यापेक्षा अधिक चांगले करू. असे यावेळी चित्रपट निर्माते सागर गोसावी यावेळी म्हणालेत.
 यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सुरेश भोगटे, रवी जाधव, कलाकार गायत्री रामशिंदे, राम निपाणीकर, सुहास रुके आदी उपस्थित होते.
Watch Trailer Here 👇🏻

Loading

कोकणकन्येची भरारी; जिल्ह्यातील पहिली मेट्रो चालक बनण्याचा मिळवला मान

रत्नागिरी: राजापूर आडवली येथील आदिती पडयार ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली कोकणसुकन्या मेट्रो चालक ठरली आहे. नवी मुंबई येथे सुरू झालेल्या मेट्रोच्या शुभारंभाची ट्रेन चालवण्याचा मोठा बहुमान या कोकणकन्येला मिळाला आहे. 
आदिती पडयार यांना मुंबई येथील मोनोरेलमध्ये ट्रेन कॅप्टन म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.  मोनोरेलमधील दोन वर्षाच्या अनुभवानंतर आता आदिती पडियार मेट्रो चालक आहेत. नवी मुंबई येथे शुभारंभ दिवशी त्यांना २२ किलोमीटरची पॅसेंजर मेट्रो ट्रेन चालवली. महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवला तर त्या कोणत्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतात अशा शब्दात अदिती पडियार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोकणातील सगळ्याच मुलींनी आता आत्मनिर्भर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
आपल्याला मेट्रो चालवण्याची संधी मिळाल्यानंतर मला कोकणातून गावावरून अभिनंदन व कौतुकाचे कॉल येत आहेत. त्यावेळेला वाटत असेल तर समाधान खूप मोठ आहे अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या. मला भविष्यात अशा आव्हानात्मक संधी मिळाल्या तर नक्कीच मी त्याचा उपयोग करेन, असाही आत्मविश्वास  यांनी पत्रकारांशी व्यक्त केला. नवी मुंबईतील मेट्रो चालक पदावर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आदिती पडियार यांचे सामाजिक शैक्षणिक, राजकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आलं आहे.

Loading

रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत आणि IRCTC वेबसाईटवर दिवा स्थानकाबाबत झालेल्या ‘त्या’ चुकीची अखेर दुरुस्ती

Konkan Railway News : एकच उपनगरीय विभाग असल्यामुळे आरक्षण प्रणालीत किंवा IRCTC वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, वांद्रे टर्मिनस, वसई, कल्याण यांसारख्या मुंबई विभागातील स्थानकांतून गाड्या शोधल्यास संबंधित स्थानकावर गाडी थांबत नसल्यास जवळील स्थानकांवरून किंवा गाडी सुटण्याच्या सुरुवातीच्या स्थानकावरून गाड्या दाखवल्या जातात. उदा. कल्याण ते माणगावसाठी गाड्या शोधल्यास ०११३९ नागपूर मडगाव एक्सप्रेस कल्याणयेथून तर ११००३ तुतारी एक्सप्रेस कल्याणवरून जात नसल्यामुळे दादरपासून दाखवली जाते. त्यात १०१०५ दिवा सावंतवाडी एक्सप्रेस पकडण्यासाठी कल्याणवरून दिवा जवळ असले तरीही ती पनवेलपासून दाखवली जात असे. यामुळे दिवा सावंतवाडी एक्सप्रेस पनवेलवरूनच सोडली जाते असा काही प्रवाशांचा गैरसमज होत असे. कदाचित दिव्यावरून एकच गाडी असल्यामुळे दिव्याचा समावेश मुंबई विभागात करणे राहून गेल्यामुळे हे घडत होते.
ही चूक रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय मधुकर महापदी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ती दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रयत्न केले व त्यांना त्यात यशही आले.  दिनांक २५ ऑक्टोबर, २०२३ ला ईमेल व सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी ही गोष्ट मध्य रेल्वेच्या लक्षात आणून दिली होती. संबंधित विभागाने ती तक्रार तातडीने २७ ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली. त्यानुसार रेल्वेने सकारात्मक कारवाई केली व आजपासून मुंबईतील स्थानकांवरून गाडी शोधल्यास दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेसचे सुरुवातीचे व शेवटचे स्थानक दिवा दाखवले जाते. यामुळे भविष्यात प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही आहे. 

Loading

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेगामध्ये आणि फेऱ्यांमध्ये ०१ नोव्हेंबर पासून वाढ; होणार २ तासांची बचत.

मुंबई : अलीकडेच सुरु झालेल्या  मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या वेग १ नोव्हेंबर २०२३ पासून वाढणार आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या प्रवास कालावधीत दहा तासांवरून अवघ्या ७ तास ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे साधारणतः मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाचा वेळ दोन तासांनी वाचणार आहे.
 त्याच बरोबर या गाड्याच्या फेऱ्याही पूर्ववत करण्यात येणार आहेत. दिनांक ०१ नोव्हेंबर पासून ही गाडी शुक्रवार वगळता दररोज चालविण्यात येणार आहे.
पावसाळयात अपघात टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालविल्या जातात. या वेळापत्रकामुळे पावसाळ्यात वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचा वेगही कमी करण्यात आला होता. तसेच फेऱ्याही कमी करून ही गाडी आठवड्यातून फक्त ३ दिवस चालविण्यात येत होती. 
 
सध्या मान्सून वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५. २५ वाजता सीएसएमटी मुंबईहून निघते आणि मडगावला दुपारी ३. ३० वाजता पोहोचते. साधरणात मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासाच्या वेळ १० तास लागत आहे.
 
मात्र, १ नोव्हेंबर २०२३ पासून नॉन मान्सून वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५. २५ वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि मडगावला दुपारी १ वाजून १० मिनिटात पोहचणार आहे. त्यामुळे साधारणतः मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाच्या वेळ साधारणता दोन तास वाचणार आहे.
 
असे असणार नॉन मान्सून वेळापत्रक-
  
२२२२९/२२२३०मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (आठवड्याचे ६ दिवस) शुक्रवार वगळता.
 
२२२२९ सीएसएमटी मुंबईहून ०५.२५वाजता निघेल आणि मडगावला दुपारी १.१० वाजता पोहोचेल.
 
२२२३० मडगावहून दुपारी २.४० वाजता निघेल आणि रात्री १०. २५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
 
MAO VANDE BHARAT TIMETABLE (From 1st Nov)
Station Name Down
22229
Up
22230
C SHIVAJI MAH T 05:25 22:25
DADAR 05:32 22:05
THANE 05:52 21:35
PANVEL 06:30 21:00
KHED 08:24 19:08
RATNAGIRI 09:45 17:45
KANKAVALI 11:10 16:18
THIVIM 12:16 15:20
MADGAON 13:10 14:40

Loading

Mumbai Goa Vande Bharat : रेल्वे प्रशासनातर्फे उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर

Mumbai-Goa Vande Bharat : सर्व कोकणवासीयांना उत्सुकता लागून राहिलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस च्या उद्घाटनाची  नवीन तारीख रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. शनिवारी दिनांक ३ जून रोजी मडगाव स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले जाणार आहे. 
“आमच्याकडे या आधीच आठ डब्यांचा नवा कोरा रेक चेन्नई वरून आला आहे. उद्घाटनाची सर्व तयारी झाली असून शनिवार दिनांक ३ जून रोजी मडगाव स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करतील. या प्रसंगी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत गाडी सर्वात जलद गाडी ठरणार आहे. हे अंतर कापण्यास तिला फक्त ७ तास लागणार आहेत. या गाडीचे वेळापत्रक आणि थांबे लवकरच जाहीर होणार असून दिनांक ५ जूनपासून ही गाडी या मार्गावर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे.” असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. 
या आधी २९ मे रोजी वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखविला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. दिनांक २८ मे रोजी नवा कोरा रेक मडगाव स्थानकावर दाखल झालाही होता, मात्र काही कारणाने ही तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र आता पुढे आलेली नवीन तारीख रेल्वेतर्फे पाळली जाईल अशी आशा आहे. 

Loading

कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार्‍या उधना-मंगुळुरु विशेष गाडीचे आरक्षण आजपासून खुले.

Konkan Railway News :प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन  कोंकण रेल्वेमार्गावर पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने उधना ते मंगुळुरु दरम्यान एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचे आरक्षण आज दिनांक 10/04/2023 पासून सर्व तिकीट खिडक्यांवर आणि सर्व अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर खुले होणार आहेत.
Train no. 09057 / 09058 Udhana Jn  –  Mangaluru  Jn   – Udhana Jn Weekly Special on  Special Fare
Train no. 09057 Udhana Jn  –  Mangaluru  Jn
ही गाडी दिनांक  १२ एप्रिल ते ०७ जून पर्यंत दर बुधवारी उधाणा या स्थानकावरुन रात्री २०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058  –  Mangaluru  Jn  – Udhana Jn
ही गाडी दिनांक  १३ एप्रिल ते ०८ जून पर्यंत दर गुरुवारी मंगळुरु या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५  वाजता उधाणा या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा (RN), माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल, तोकुर
डब्यांची संरचना
एसएलआर – ०1 + जेनेरेटर वॅन – 01 + सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 06 + टू टायर एसी – 02 + फर्स्ट एसी – 01  असे मिळून एकूण LBH  22  डबे
Train no. 09057 Udhana Jn  –  Mangaluru  Jn या गाडीचे आरक्षण आज दिनांक 10/04/2023 पासून सर्व तिकीट खिडक्यांवर आणि सर्व अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.

Loading

गोष्ट एका ध्येयवेड्या ‘कोकणी रानमाणसाची’

उत्तरा जोशी, देवगड |चांगलं शिक्षण घेतल की शहराकडे निघायचं हा आजवरचा कोकणातल्या मुलांचा इतिहास. कोकणातल्या माणसाला मुळातच शहराची जबरदस्त ओढ आणि त्यातूनच शिक्षण चांगलं असेल तर मग गावाकडे परत येणं नाहीच. पण या सगळ्याला छेद देणारा एक मुलगा याच कोकणात आहे.“ प्रसाद गावडे”.

दोडामार्ग तालुक्यातील मांगेली या छोट्याशा गावातला हा मुलगा. याचं बालपण तळकोकणात गोवा-कर्नाटक-सिंधुदुर्ग च्या सीमेवरील मांगेली ह्या गावात गेले..!

तिन्ही बाजूने सह्याद्री च्या डोंगर रांगा ,मांगेलीच्याडोंगरात उगम पावून गोव्याच्या दिशेने वाहणारी थोरली न्हय अर्थातच आताची तिलारी नदी ,प्रचंड जैवविविधता ,प्राणी पक्षी आणि वनराईने नटलेला असा हा तिलारी खोऱ्याचा प्रदेश..प्रसादने मनुष्य आणि निसर्ग ह्यातील नातं जवळून अनुभवलं ते ह्याच दिवसात..संपूर्णपणे निसर्गधारीत जीवनशैली जगणारे अत्यंत आनंदी आणि समाधानी माणसं त्याने इथे पाहिलीत.

दहावी होईपर्यंत सावंतवाडी हेच मोठं शहर समजणाऱ्या प्रसादला बारावी नंतर त्याच्या चांगल्या गुणांमुळे इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. चार वर्ष दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात त्याने अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण केल. या चार वर्षात त्याने औरंगाबाद मधील दुष्काळ अगदी जवळून अनुभवला. लोकांचे पाण्यासाठी होणारी वणवण,भकास उजाड माळरान हे सगळं पाहून त्याला वेळोवेळी कोकणातल्या सुबत्तेची अधिकच जाणीव होत गेली.

प्रसाद म्हणतो की,“ह्या चार वर्षात सगळ्यात जास्त आठवलं ते माझं कोकणचं जीवन,इथला निसर्ग, इथला पाऊस,समुद्र,प्राणी,पक्षी,जैवविविधता ,हिरवेगार डोंगर,सडे,काजू आंबे फणस सगळंच..त्यामूळे डिग्री घेतल्यावर पहिल्यांदा मनात ठाम केलं की या पुढे काहीही झालं तरी कोकण सोडायच नाही..जे काही करणार इथे राहूनच..इथल्या लालमातीत सोनं आहे, जगात कुठेच सापडणार नाही असा स्वर्गीय निसर्ग असलेला प्रदेश सोडून भकास ,प्रदूषित,so called विकास करू पाहणाऱ्या शहरांकडे करिअर घडवायला जाणाऱ्यांमधला मी कधीच होणार नव्हतो..”

शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रसाद कोकणात परत आला.सर्वसाधारण कुटुंबातून आल्यामुळे उत्पन्न मिळवणे भागच होत. मांगेली पासून गोवा जवळ असल्यामुळे वर्षभर त्याने गोव्यातच GIDC मधील एका कंपनीत जॉब केला पण इथेही त्याची निसर्गाची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना . साधारण वर्षभर या कंपनीत नोकरी केल्यानंतर प्रसादला जाणीव झाली की आपल मन काही या नोकरीत राहणार नाही. गावची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. पाट्या टाकल्या सारख्या यांत्रिक नोकरीत त्यांचे मन काही रमेना. यातूनच त्याने घेतला एक धाडसी निर्णय नोकरी सोडण्याचा. एके दिवशी अचानक एक महिन्याचा पगार व्हायचा बाकी असताना नोकरीचा राजीनामा देऊन प्रसाद आपल्या गावी मांगेली ला परत आला.पुढे काय करायचं वगैरे काही ठरलं नव्हतं फक्त गावी जायचं आणि काहीतरी करायचं एवढंच डोक्यात घेऊन प्रसाद परतला होता. सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे प्रसादच्या घरच्यांनाही याच आता कसं होणार ही काळजी वाटायला पण प्रसाद मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता.

गावातल्या निसर्गधारीत जीवन जगणाऱ्या आपल्या गावठी कोकणी लोकांचं जीवन म्हणजे स्वर्गीय जीवन आहे ह्याची त्याला जाणीव होती. यातूनच त्याने सुरू केलं इको टुरिझम.
आजवर आपल्याकडे येणारे पर्यटक हे काही ठराविक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देतात मजा करतात आणि परत जातात पण कोकणातलं खरं जीवन त्यांना कुठे दिसतच नाही किंवा ते जगता येत कोकणातला माणूस जे खर आयुष्य जगतो त्याचा अनुभव घेण्यासाठी आसुसलेल्या लोकांना आपण या कोकणी माणसाच्या जीवनाचा अनुभव द्यायचा जे जीवन ते जगतात त्या जीवनाचच ब्रँडिंग करायचं आणि कोकणात आलेल्या पर्यटकांना त्यांच्यासारखं जीवन जगायला लावायचं आणि त्याचे त्यांच्याकडून पैसे घ्यायचे जेणेकरून इथल्या स्थानिक लोकांना त्यातूनच उत्पन्न मिळेल अशी प्रसाद ची कल्पना. यातूनच त्याने स्वतःकडे काहीही सोय नसताना गावच्या लोकांची मदत घेऊन अशा टूर्स अरेंज करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काही टूर्स ला प्रसाद कडे ना धड चांगला कॅमेरा होता ना स्वतःची गाडी. खरंतर चार चाकी गाडी सुद्धा व्यवस्थित चालवता येत नव्हती. पण तरीही प्रसादने या पर्यटकांना गावातल्याच एका भाड्याच्या गाडीतून फिरवलं.ओळखीच्यांच्या घरी त्यांच्या जेवणाची सोय केली आणि हे पर्यटक अतिशय आनंदाने परतले. यातूनच त्याला गवसला पर्यटनाचा आणि एक मार्ग.

पुढच्या महिन्यात त्यानेसावंतवाडी,कुडाळ,मालवण आणि वेंगुर्ले हे चारही तालुके अगदी पिंजून काढले.प्रत्येक तालुक्यात असलेली अगदी बारीकसारीक निसर्गरम्य ठिकाणं, डोंगरात लपलेले धबधबे,नद्या, जंगलातली काही सुंदर ठिकाणं, तसेच असेच काही दुर्लक्षित परंतु स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे त्याने शोधून काढले.कोकण म्हणून आजवर प्रसिद्ध झालेल्या ठिकाणांव्यतिरिक्त ज्यांना खरच निसर्गाची ओढ आहे अशा लोकांना भेट देऊन इथल्या निसर्गाचा इथल्या जीवनाचा आनंद घेता यावा म्हणून ही प्रसादची धडपड.

सोशल मीडियाचा उपयोग करून घेत सुरुवातीला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून प्रसाद ने आपल्या या उपक्रमाची माहिती द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यातून कोकणातल्या अंतर्गत भागात फिरायला उत्सुक असणाऱ्या लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. या पर्यटकांमध्ये परदेशी पाहुण्यांचादेखील समावेश होऊ लागला.गावागावात लपलेल्या प्रेक्षणीय गोष्टी पाहून येणारे पर्यटक खुश होऊन जाऊ लागले आणि नवीन लोकांना याबद्दल माहिती देऊन प्रसादकडे पाठवू लागले.प्रसादच्या या टूर्स मुळे मुख्यतः फायदा होऊ लागलाय तो गावागावातल्या अगदी सामान्य माणसाला.घरगुती जेवणाची सोय केल्यामुळे गावागावातल्या कुटुंबांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकला आहे.सध्या याचं प्रमाण कमी असेल तरी भविष्यात मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपाच्या संधी लोकांना उपलब्ध होतील आणि गावात राहणाऱ्या लोकांना आपल्या जीवनाबद्दल वाटणारी लाज कमी होईल अशी प्रसादची पक्की खात्री आहे. याबद्दल प्रसाद उदाहरण दाखल सांगतो, ”मागच्या मे महिन्यात फॉरेनर चा १६-१७जणांचा एक ग्रुप दोडामार्ग मध्ये मी घेऊन गेलो तिथल्या एका आमच्या कोकणी माणसाने त्यांना त्यांच्याच बागेत झाडावर चढुन फणस ,आंबे,काजू,कोकम काढून दिले आणि ते ह्या पर्यटकांनी चांगले पैसे देऊन विकत घेतले,आजोबांचे खूप कौतुक केले..त्यांच्या बायकोने शेतातल्या मांगरात(शेतघर) उकडा भात,तांदळाची भाकरी,फणसाची भाजी आणि सोलकढी असं जेवण करून घातले ते जेवण इतकं आवडलं की त्यांनी आजीला जाताना मिठीच मारली ..रानातील करवंद ,जांभूळ,चाफर ,तोरण सगळं काही जाताना त्यांना अगदी कोकणी रानमेवा म्हणून भेट दिली..!

आयुष्यात पहिल्यांदा कोकणातल्या एका गावठी माणसाला त्याच्या गावठी जीवनाचा अभिमान वाटला..हे मी माझं यश समजतो आणि इथेच मला माझा पहिला रानमाणूस भेटला..!!
वालावल च्या खाडीत मयु तारी गेली कित्येक वर्ष लोकांना पैलतीरावर नेऊन सोडतो पण त्याच खाडीत बॅकवॉटर सफरी साठी मी आणि मयु पर्यटकांना फिरवून त्याच्या रोजच्या उत्पन्ना पेक्षा अधिक पैसे मिळवून देतो…किनाऱ्याला लागून असणाऱ्या माडबागायतीत छोट्याशा घरात राहणारा एखादा स्थानिक इथे काही उत्पन्न नाही म्हणून पैशाच्या लोभापायी आपली सोन्यासारखी जमीन एखाद्या बाहेरच्या माणसाला विकून टाकून कोकणातून बाहेर जाईल आणि आपलं कोकण हळूहळू बाहेरच्यांच्या हातात जाईल याची भीती कायम मनात असते आणि म्हणूनच प्रसादच लक्ष या लोकांना कमीतकमी खर्चात रोजचं उत्पन्न कस निर्माण करता येईल यात लागलेल असतं.

आजवर अनेक सोलो ट्रॅव्हलर्स ,अनेक गृप टूर्सना प्रसादने स्थानिकांच्या मदतीने उत्तम सुविधा दिली आहे. नुकतीच एक कॉर्पोरेट टूर यायची ठरलेली असताना अचानक ट्रेनची तिकीट कन्फर्म न झाल्याने आणि खाजगी वाहनांसाठी ड्रायव्हर उपलब्ध नसल्यामुळे मुंबई ते सावंतवाडी प्रवासाचा पर्यटकांचा प्रश्न प्रसादने रातोरात मुंबईला जाऊन दुसऱ्या दिवशी स्वतः पूर्ण ड्रायव्हिंग करून त्यांना सावंतवाडीला आणून सहज सोडवला.त्याच्या या सहकार्यामुळे तसेच इथल्या वास्तव्यात आलेल्या अनुभवाने अतिशय खुश होऊन पुन्हा जाताना पर्यटकांनी त्याला त्याच्या पुढच्या प्रवासात मदत करण्याची देखील तयारी दाखवली आहे.

स्वतःकडील मोबाईलवर फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करणारा प्रसाद या दीड वर्षाच्या प्रवासात स्वतःचा प्रोफेशनल कॅमेरा, ड्रोन तसेच स्वतःच्या उपजीविकेपुरते पैसे कमावण्याच्या टप्प्यावर पोचलाय. सुरुवातीला कशीबशी चारचाकी चालवणारा प्रसाद आता सगळ्या प्रकारच्या चारचाकी सहज चालवू लागलाय. घरातल्यांचा सुरुवातीला काळजीपोटी असणारा विरोध आता हळूहळू मावळतोय.एकेक शिलेदार प्रसादच्या सोबत काम करायला येऊन मिळत आहेत. या सोबतच इथल्या पडीक जमिनीतून उत्पादन सुरू करण्यासाठी प्रसादचा प्रयत्न सुरू आहे.त्याची स्वतःची फारशी जमीन नाही परंतु त्याच्या या प्रयत्नांना हातभार म्हणून एका ओळखीच्या कुटुंबाने आपली पडीक असलेली शेतजमीन त्याला शेतीसाठी देऊ केली आहे.त्या जमिनीतून यावर्षीपासून उत्पादन घेण्यास सुरुवात होईल.

यासोबतच आता स्वतःच्या कल्पना जगापर्यंत पोचवण्यासाठी लवकरच “कोकणी रानमाणुस” ची स्वतःची वेबसाईट पूर्णत्वाला येईल. कोकण म्हणजे फक्त गणपतीपुळे,मालवण तारकर्ली आणि वेंगुर्ला इथले समुद्र किनारे आणि देवळे नव्हे तर कोकण म्हणजे अश्याच गावठी कोकणी रानमाणसांसोबत निसर्गजीवन जगायला शिकवणारे स्वर्गीय डेस्टिनेशन आहे..म्हणून प्रसाद आपल्या जाहिरातीत नेहमी कॅपशन ला टाकत असतो.

“Explore Heavenly Konkan with Konkani Ranmanus”

जितका सुंदर इथला निसर्ग आहे तितकीच गोड इथली माणसं ही येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून मिळणारी प्रतिक्रिया असते ..!!कोकणचा विकास हा रासायनिक प्रकल्प,मोठे रस्ते,इमारती,industries ह्यात नाहीये तो आहे निसर्गपूरक शाश्वत पर्यटनात,शेतीत,फळप्रक्रियेत,मत्स्योत्पादन ह्यात..

येत्या काळात दोडामार्ग सावंतवाडी वेंगुर्ला हा गोवा सीमेलगतच्या तालुक्यांना ecotourism साठी भारतात ओळख मिळवून द्यायचं प्रसादचं स्वप्न आहे..याबद्दल बोलताना प्रसाद म्हणतो“गाडगीळ समितीच्या शिफारसी नुसार हा संपूर्ण भाग इकोसेन्सिटिव्ह आहे तरीही मायनिंग ,क्रशर,केरळ वाल्यांचे अतिक्रमण सुरूच आहे..जोपर्यंत लोकांना शाश्वत विकासाचे महत्व आपण पटवून देत नाही तोवर कोकण चा विनाश थांबवणे अशक्य आहे..

कोकणात राहून कोकण आहे तसंच निसर्गरम्य ठेवणारे रानमाणूस जरी निर्माण करू शकलो तर देवाने मला कोकणात जन्म दिल्याचे उपकार फेडल्याचे समाधान मिळेल ..बाकी करिअर वगैरे सगळ्या सांगायच्या गोष्टी असतात हो..”

या महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रसाद आणि त्याच्या काही मित्रांनी जवळपासच्या नदी-नाल्यांमधून उन्हाळ्यात साठलेला कचरा साफ करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.याबद्दल सांगताना प्रसाद आणि त्याचे सहकारी म्हणतात की,“ उन्हाळ्यात हे गावातून वाहणारे नदी-नाले कोरडे होतात आणि याच काळात आजूबाजूची लोक सहज वाटेल तो कचरा या नदीपात्रात आणून टाकतात.पाऊस सुरू झाला की हा सगळा कचरा वाहून जवळच असलेल्या समुद्राला मिळतो आणि पर्यायाने यातले घातक घटक समुद्रातल्या प्राण्यांच्या पोटात जातात.तेच दूषित अन्न जेव्हा मासे किंवा समुद्रातले प्राणी अन्न म्हणून आपण खातो तेव्हा आपल्या पोटात जातात. शिवाय या विघटन न होणाऱ्या कचऱ्यामुळे समुद्राचं प्रदूषण होतंच आणि पुन्हा हा सगळा कचरा किनाऱ्यावर येऊन साठतो आणि स्वच्छ सुंदर किनारे विद्रुप होऊन जातात.म्हणूनच काळजी म्हणून आम्ही यावर्षी पाऊस सुरू होईपर्यंत जवळपासच्या जेवढ्या जमेल तेवढ्या नदी नाल्यांच्या कोरड्या पात्रांना स्वच्छ करायचं ठरवलं आहे.यासाठी गावागावातल्या लोकांना सोबत यायचं देखील हे तरुण आवाहन करत आहेत.येतील त्यांना सोबत घेऊन आणि कोणी नसेल तरी आपल्याला जमेल झेपेल तेवढं हे काम आपण करायचंच या ठाम निश्चयाने या कामाला सुरुवात झाली आहे.”

खरतर रोजच्या आयुष्यात अस वागणाऱ्या माणसाला सगळे वेडाच समजतात.पण वेडेच इतिहास घडवतात हेही तेवढंच खरं. प्रसाद सारखे कोकणाची ओढ असलेले तरुण सगळ्या कोकणात निर्माण झाले तर दिवसेंदिवस रिकाम्या होत जाणाऱ्या कोकणाला उज्वल भविष्य आहे एवढं नक्की. उरीपोटी कोकणच प्रेम घेऊन जगणाऱ्या या धडपड्या प्रसादला शुभेच्छांसोबत आपण आपला मदतीचा हातदेखील नक्किच देऊया..

लेखिका = उत्तरा जोशी, देवगड







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search