Category Archives: कोकण रेल्वे
Konkan Railway: उद्या दिनांक २४/०१/२०२५ (शुक्रवार) रोजी चिपळूण स्थानकावर तिसर्या पॅसेंजर लूप लाईन च्या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकचे रेल्वे सेवांवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
दिनांक २४/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर ही गाडी रत्नागिरी स्थानकावरून पुनर्नियोजित वेळेनुसार ०१:२५ तास उशिराने म्हणजे सकाळी ७.०० वाजता रत्नागिरीहून निघणार आहे.
दिनांक २३/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक रत्नागिरी – चिपळूण विभागादरम्यान मर्यादित वेगाने म्हणजेच उशिराने चालविण्यात येणार आहे.
पनवेल: कोकण रेल्वे मार्गावर नवीन अमरावती ते कोकण रेल्वेच्या वीर स्थानका दरम्यान एक विशेष अनारक्षित गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण दोन फेऱ्या होणार आहेत.
०११०१ नवीन अमरावती – वीर अनारक्षित विशेष गाडी गुरुवार दि. ६ फेब्रुवारी, २०२५ दुपारी १५:३० ला नवीन अमरावती येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:४५ ला वीर येथे पोहोचेल.
०११०२ वीर – नवीन अमरावती अनारक्षित विशेष गाडी मंगळवार दि. ११ फेब्रुवारी, २०२५ रात्री २२:०० ला वीर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३० ला नवी अमरावती येथे पोहोचेल.
या गाडीला बडनेरा, मुर्तुजापूर,अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि रोहा येथे थांबे देण्यात आले आहेत.
ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची असून तिला १६ अनारक्षित डबे आणि २ एसएलआर डबे जोडण्यात येणार आहेत.
Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे इंजिन रत्नागिरी करबुडे दरम्यान बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. या एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडण्यात आल्याने एका तासाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. मात्र या मार्गावरील काही गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. तर आज प्रस्थान करणारी गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस आज संध्याकाळी १८.०५ वाजता पुनर्नियोजित Rescheduled करण्यांत आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस ही रेल्वे गाडी रत्नागिरी करबुडे दरम्याने आली असता या गादीचे इंजिन अचानक बंद पडले. हा प्रकार मंगळवार २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या ठीक ठिकाणी थांबवण्यात आल्या. इंजिन नादुरुस्त झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एका तास खोळंबा झाला.
रत्नागिरी रेल्वे स्थानकातून नवीन इंजिन मागवण्यात येऊन तेजस एक्सप्रेस ही गाडी एका तासानंतर मार्गस्थ करण्यात आली. तेजस या गाडीला दुसरे इंजिन जोडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या मार्गावरील दिवा – सावंतवाडी, सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस, मडगाव – सीएसएमटी मांडवी, सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस या गाड्या २ ते ३ तास उशिराने धावत आहेत.
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानकावर परिपूर्ण रेल्वे टर्मिनस व्हावे, या ठिकाणी नवीन टर्मिनस प्लॅटफॉर्म आणि बिल्डिंग व्हावी, या स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करावा तसेच सावंतवाडी स्थानकावरून कोरोना काळात काढून घेण्यात आलेला १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस व १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा इत्यादी मागण्यांसाठी येत्या २६ जानेवारीला कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही अराजकीय संघटना रेल रोको आंदोलन करणार आहे. त्याबाबत ची नोटीस संबंधित प्रशासनाला दिलेली होती त्याचाच भाग म्हणून रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री शैलेश आंबर्डेकर यांनी आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रेल रोको करू नये असा आशयाचे पत्र संघटनेला सुपूर्द केले.परंतु कोकण रेल्वेने दिलेल्या पत्रात संघटनेच्या मागण्यांसंदर्भात एकही सकारात्मक बाब नसल्याने संघटनेने आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत अशा आशयाचे पत्र क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री आंबर्डेकर यांना सुपूर्द केले. तसेच आमच्या मागण्यांसंदर्भात बेलापूर येथे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांचा अध्यक्षतेखाली २३ जानेवारीच्या अगोदर बैठक आयोजित करावी अशी विनंती संघटनेने केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍड श्री संदीप निंबाळकर, सचिव श्री मिहिर मठकर, सल्लागार श्री सुभाष शिरसाट आदी उपस्थित होते.
मुंबई: रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी लोकसभा खासदार सुनील तटकरे अध्यक्षतेखाली सोमवार दि. २० जानेवारी, २०२५ सकाळी १०:३० ते १२:३९ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार व कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत आपापल्या समस्या मांडण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रवासी संघटना व प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. आपना सहकारी बँकेचे संचालक तथा रत्नागिरी जिल्हा नियोजन चे सदस्य श्री. अजयशेठ बिरवटकर यांनी जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितिन सखाराम जाधव व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांना निमंत्रित केले होते.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, रत्नागिरी दिवा गाडी दादरपर्यंत पूर्ववत करणे, मुंबई चिपळूण नवीन गाडी सुरू करणे, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस कल्याणमार्गे वळवणे, जबलपूर कोईंबतूर एक्सप्रेसला कल्याण येथे थांबा देणे, खेड येथे विविध गाड्यांना थांबा देणे, गोव्यातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांना दिलेला अपुरा कोटा वाढवणे किंवा सर्व स्थानकांना समान कोटा देणे आदी महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.
त्याचबरोबर पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि वीर येथीलही समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या पुढे रेल्वे बोर्ड व मंत्रालयाकडे मांडण्याचे आश्वस्त केले. तसेच खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
ही बैठक आयोजित करून सर्वांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार श्री. सुनिल तटकरे व बैठकीला आमंत्रित केल्याबद्दल श्री. अजयशेठ बिरवटकर यांचे जल फाऊंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने आभार.
सिंधुदुर्ग: २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री ना. श्री नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी टर्मिनस च्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी, सावंतवाडीत रेल्वेचे परिपूर्ण टर्मिनस उभारण्यासाठी आपण राज्यशासनामार्फत निधी उपलब्ध करावा, या ठिकाणी कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या गाडी क्र. १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा. नव्याने १२१३३/३४ मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस ला सावंतवाडी थांबा मिळावा, आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे या विषयावर पालकमंत्री श्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर आपण योग्य कार्यवाही करून येत्या काही महिन्यात ही कामे मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्याना दिले. यावेळी पालकमंत्री राणे यांचा संघटनेतर्फे शाल आणि भगवी टोपी घालून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे विलीनीकरण या संदर्भात निवेदन देण्यात आले. आणि सावंतवाडी टर्मिनस का गरजेचे आहे हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पटवून दिले. त्यावर आमदार श्रीमती गायकवाड मॅडम यांनी या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा कानावर हा विषय घालते असे संघटनेला आश्र्वासित केले.
यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष विनोद नाईक, प्रकाश येडगे, प्रशांत परब आदी संघटनेचे मुंबई विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.