चिपळूण:मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम चालू असल्याने या भागात रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे येथून जात असताना आपले वाहन सावकाश चालवण्यात यावे.
आज सकाळी या भागात काम चालू असताना रस्त्यावर दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतुक काही वेळासाठी ठप्प झाली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने अनर्थ घडला नाही. कंत्राटदार कंपनीने जेसीबी च्या सहाय्याने ही दरड बाजूला करून वाहतुक पूर्वस्थितीत आणून दिली होती. मात्र असे प्रकार वारंवार घडत असल्याने या मार्गावरून जाणार्या प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(संबधित बातमी >मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात टळला.. कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा समोर)
मागे दोन वेळा रस्त्यावर भले मोठे दगड पेढे वस्तीत आणि रस्त्यावर आले होते. सुदैवाने अजूनपर्यंत काही जिवितहानी झाली नाही आहे. पण या सर्व प्रकारांतून कंत्राटदार कंपनी कामांदरम्यान योग्य त्या सुरक्षिततेचे मापदंड पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.