Category Archives: कोकण
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक 12741/12742 वास्को द गामा – पटना सेमी फास्ट एक्सप्रेस ही गाडी दिनांक 24 जानेवारी पासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वास्को द गामा ते पटना (12741) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 24 जानेवारी 2024 च्या फेरीपासून तर पटना ते वास्को (12742) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 27 जानेवारी 2024 च्या फेरीपासून एलएचबी कोचसहित चालवण्यात येणार आहे. आतापर्यंत ही गाडी 22 डब्यांची धावत होती मात्र या गाडीचा एक सेकंड स्लीपर डबा करून ती 21 एलएचबी डब्यांची करण्यात आलेली आहे.
या साप्ताहिक गाडीला कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी आणि चिपळूण या स्थानकांवर थांबे आहेत.
सिधुदुर्ग: केंद्राने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान तथा पीएम जनमन अभियान सुरू केले असून त्यामध्ये जिल्ह्याचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत १६२६ आदिम समाजाचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० वाड्यांमध्ये या समाजाचे वास्तव्य असल्याचेही पुढे आले आहे. आता या समाजाला रस्ते, पाणी, वीज, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, नळपाणी पुरवठा योजना आदी महत्त्वाच्या सुविधा या अभियान अंतर्गत देण्यात येणार आहेत.
देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ले या पाच तालुक्यांत ही वस्ती आहे. यातील १६ वाड्यांतील आदिम समाजाजवळ कच्चे घर सुद्धा राहण्यासाठी आढळलेले नाही. केवळ एकच वाडी जवळ जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. सहा वाड्यांत प्राथमिक शाळा नाहीत. चार वाड्यांना अंगणवाडी केंद्र नाही. तीन वाड्यांना आरोग्य केंद्र नाही. १९ वाड्यांत कौशल्य विकास केंद्र नाही. १३ वाड्यांत स्वच्छ पाणी नाही. सात वाड्यांत नळपाणी पुरवठा करणारी योजना नाही. १३ वाड्यांत वीज पुरवठा नाही. १५ घरांत सार्वजनिक शौचालय नाही, असे या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.
जिल्ह्यात आदिम समाजाचे वास्तव्य आढळलेल्या २० वाड्यांमध्ये केंद्राच्या प्रत्येक योजना अभियानाच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहेत. ज्या योजना अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्याला प्राधान्य दिले जाणार आहे. व्यक्तिगत लाभ मिळालेला नसल्यास तोही दिला जाणार आहे.
Konkan Railway News :अयोध्येत २२ जानेवारीला राममंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा होत आहे. त्यापूर्वी देशभरातून अनेक रामभक्त अयोध्येला भेट देत आहेत. अयोध्या जगातील एक मोठ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. दरवर्षी देशभरातून हजारो रामभक्त अयोध्येला भेट देणार आहेत. हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येत जाण्यासाठी रेल्वे आठवड्यातून एकदा सोडावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर केली आहे. याबाबत कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन सादर केले आहे.
सिंधुदुर्ग: वेंगुर्ले नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरी नुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरातून पश्चिम विभाग ३७ वा, महाराष्ट्रामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच वेंगुर्ले शहरास जीएफसी १ स्टार व ODF ++ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नगरपरिषद मार्फत वर्षभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, स्वच्छता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व यामध्ये स्वच्छताप्रेमी वेंगुर्लेवासियांचा मिळणारा उत्स्फूर्त सहभाग या सर्वामुळे वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये घवघवीत यश प्राप्त झाले आहे. आतापर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून मुख्याधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत, सामाजिक संस्था व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे, असे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.
Sindhudurg :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे सुपुत्र चंद्रकांत काजरेकर गिनीज बुक रेकॉर्ड होल्ड ठरले आहेत.शेती आणि बागायतदार चंद्रकांत काजरेकर कुडाळ यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान म्हणून रेकॉर्ड झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी आणि नंतर अकाउंटंट व्यवस्थापक म्हणून सुमारे ३२ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले चंद्रकांत काजरेकर आंबा आणि काजू बागायतीची आवड जोपासत असताना त्यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या सहाय्याने जगातील रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपली मुली डॉ. नालंदा आणि डॉ. नुपूर आणि जावई धीरज व डॉ. देवेन यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला.
त्यानंतर पूर्णतपासनीचे रेकॉर्ड तयार करताना संत राहुल महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र यशवंत ठाकुर, प्राध्यापक उमेश मिलिंद कामत आणि प्राध्यापक दयानंद विश्वनाथ ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वल्डे वाईड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग वर रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. त्या कामात डॉ. दिपाली काजरेकर, डॉ. नालंदा, डॉ. नुपुर, जावई धीरज, डॉ. देवेंद्र तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओचे टीम यांचे सहकार्य लाभले.
जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाचे जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली. कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदवले गेले आहे. या पानाची लांबी ५५.६ सेमी रुंदी १५.६ से.मी. आहे त्यापूर्वी त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत प्रयोग केले आहेत. कुडाळ येथील आपल्या राहत्या घराच्या टेरेसवर सुपारी व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग केला आहे. तसेच तळवडे, सावंतवाडी येथील शेतात आपले बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्राच्या साह्याने शेती करणे. दुर्मिळ वनौषधी लागवडी व संवर्धन यांचे यशस्वी प्रयोग केले आहेत.