Category Archives: कोकण

रेल्वेकडून ‘या’ कालावधीत राबवली जाणार विशेष तिकीट तपासणी मोहीम; योग्य तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन

मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वे कडून ३१ मार्च पर्यंत २ टप्प्यात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम १२ ते २५ फेब्रुवारी आणि १५ ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट काढून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणीसह द्वितीय श्रेणी डब्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना धक्काबुक्की प्रवास सहन करावी लागते. परिणामी, याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. धावत्या वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात तिकीट तपासणी करण्याची सूचना प्रवाशांकडून करण्यात आली. त्यानंतर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यासह आता भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह वाणिज्य अधिकारी आणि विभागीय कार्यालयातील वरिष्ठ पर्यवेक्षकांचे पथक आवश्यकतेनुसार आरपीएफ, दक्षता आणि इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना पाचरण करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे मंडळाकडून भारतीय रेल्वेमधील प्रत्येक विभागाला दिलेल्या सूचना
– पीआरएस तिकिटांच्या तपासणीदरम्यान प्रवाशांचे ओळखपत्र तपासणे, सवलतीचे तिकीट असल्यास त्याबाबतचे वैध पुरावा तपासून घ्यावा.
– आरक्षण केंद्रावर दलालाच्या हालचाली रोखण्यासाठी पथके तयार करून, तपासण्या कराव्यात. तसेच आपत्कालीन कोट्याचा गैरवापर होऊ नये, याबाबत सतर्क राहावे.
– कॅटरिंग कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांकडे योग्य शुल्क घेत आहेत आणि त्यांना योग्य पावती दिली जाते, याची तपासणी करावी. तसेच अनधिकृत विक्रेत्यांना रेल्वेगाड्यांमध्ये बंदी घालावी. खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवर दराचे फलक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री केली जाते का, हे तपासावे.

Loading

Nagpur-Goa Expressway Updates: नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्गाचे कोकणात ‘या’ ठिकाणी होणार मिलन

मुंबई :नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या संरेखनास महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली आहे. एकूण ६ लेन असलेला ८०६ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. लवकरच या मार्गासाठी भूसंपादन प्रकियेस सुरवात होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्गाशी जोडणी
हा महामार्ग कोल्हापूर येथून आंबोलीमार्गे तळकोकणात येणार आहे. या महामार्गाची समाप्ती बांदा येथील आरटीओ च्या जवळ होणार आहे. येथेच प्रस्तावित ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्ग या महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

नागपूर येथून सुरु होणार हा महामार्ग एकूण ११ जिल्ह्यातून जाणार आहे. यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पत्रादेवी (उत्तर गोवा) अशी या जिल्ह्यांची नवे आहेत. प्रकल्पाचा अंदाजित एकूण खर्च ८३ हजार ६०० कोटी एवढा आहे. प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नसली तरी २०२८-२९ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

Loading

LTT Megablock: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल आठ गाड्यांच्या वेळापत्रकावर, आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये बदल

Konkan Railway News :मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथील कोचिंग यार्डमध्ये पायभूत सुविधा उभारण्यासाठी आजपासून पुढील सात दिवस १८ फेबुवारी २०२४ पर्यत दररोज मध्यरात्रीपासून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे एलटीटी स्थानक येणाऱ्या आणि सुटणाऱ्या अनेक मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेळात बदल करण्यात आलेला आहे.

या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल आठ गाड्यांच्या वेळापत्रकावर, आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये बदल होणार आहे. या बाबत रेल्वे प्रशासनाने दिलेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे .

1)Train no. 22116 Karmali – Lokmanya Tilak (T) Express गुरुवार दिनांक 15/02/2024 या दिवशी प्रवास सुरू करणार्‍या या गाडीचा प्रवास ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. ही गाडी पुढे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणार नाही.

2)Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express

शुक्रवार दिनांक 16/02/2024 तारखेला प्रवास सुरू करणारी ही गाडी पनवेल स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे.

3)Train no. 12620 Mangaluru Central – Lokmanya Tilak (T) Matsyagandha Express.

शनिवार दिनांक 17/02/2024 तारखेला प्रवास सुरू करणारी ही गाडी पनवेल स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे.

4)Train no. 16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central Netravati Express

रविवार दिनांक 18/02/2024 तारखेला प्रवास सुरू करणारी ही गाडी पनवेल स्थानकावरून दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सुटेल.

5)Train no. 12619 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Central Matsyagandha Express

रविवार दिनांक 18/02/2024 तारखेला प्रवास सुरू करणारी ही गाडी पनवेल स्थानकावरून पुनर्नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी सुटेल.

6)Train no. 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express

गुरुवार दिनांक 15/02/2024 या दिवशी पुनर्नियोजित वेळेनुसार सकाळी 04 वाजून 10 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.

7)Train no. 11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express

शनिवार दिनांक 17/02/2024 या दिवशी पुनर्नियोजित वेळेनुसार मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.

 8)Train no. 11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express 

शनिवार दिनांक 17/02/2024 या दिवशी पुनर्नियोजित वेळेनुसार रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून सुटणार आहे.

 

Loading

“सावधान! येथे अपघाताची शक्यता” | सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर गतिरोधकांची नितांत गरज

सावंतवाडी, दि. १२ फेब्रु.: कोणताही अपघात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येते. त्यानंतर  त्या रस्त्यांवर गतिरोधक बसविले जातात. मात्र अपघात होऊ नये यासाठी आधीच काळजी घेतली तर जीव वाचू शकतात. सुसाट वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बाजारपेठेत, गाव वस्तीत, शाळेच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसवून वाहनांच्या वेगावर मर्यादा घालून अपघात टाळले जातात. अशाच तजवीजची गरज  सावंतवाडी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर असेलेला रस्त्यावर करण्याची आवश्यक्यता निर्माण झाली आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशदारासमोर हा रस्ता असून सावंतवाडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनचालक वाहने सुसाट चालवीत असतात. या रस्त्याच्या पलीकडे उपहारगृहे, एटीएम आणि इतर दुकाने आहेत. त्याचप्रमाणे स्थानकावरून बाहेर पडून सावंतवाडी साठी एसटी बस पकडायची असेल तर हा रस्ता ओलांडावा लागतो. कित्येकवेळा बस उभी असताना प्रवासी बस चुकू नये म्हणून घाईघाईने रास्ता ओलांडताना दिसतात. अशा वेळी अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. कित्येकवेळा अपघात होता होता वाचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे दोन ठिकाणी झेब्रा क्रोसिंग मार्किंग पट्टे आखले असले तरीही अपघात टाळण्यासाठी ते अपुरे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे मोठा अपघात होण्याआधीच दोन्ही बाजूने गतिरोधक बसवावे अशी मागणी होत आहे. 
शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसवावेत
गतिरोधक उंच असल्यास त्याठिकाणी दुचाकी वाहनचालक घसरुन पडण्याची शक्यता असते.  तेंव्हा हे गतिरोधक शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून बसवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Loading

काजूला मिळणारा दर यंदाही निराशाजनक; आम्ही जगावे तरी कसे? शेतकर्‍यांचा प्रश्न…

सिंधुदुर्ग :काजू हंगामाला सुरुवात झाली आहे. या वर्षी काजू हंगाम १५ ते २० दिवस उशिराने सुरू झाला आहे. दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये अल्प प्रमाणात काजू बी परिपक्व होऊ लागली आहे. मात्र काजू बीला प्रतिकिलो फक्त १२६ रुपये दर सध्या दिला जात असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. 

नोव्हेंबरमध्ये थंडीचा अभाव होता. त्यामुळे या वर्षी काजूला चांगला मोहर आला नाही. त्याचा परिणाम काजू उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तरीदेखील काजू बीला १२६ रुपयेच दर मिळत आहे. काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळावा, अशी मागणी बागायतदारांकडून सध्या सुरू आहे. 

हंगामाच्या सुरवातीलाच जर असा कमी दर भेटत असेल तर काही दिवसांत आवक वाढली काय अपेक्षा ठेवणार असा प्रश्न काजू उत्पादक शेतकरी विचारताना दिसत आहेत. कारण मागील दोन तीन वर्षे पाहता हा दर शंभर रुपयाच्या खाली गेला आहे. काजूला हमी भाव मिळावा या शेतकर्‍यांच्या मागणीला शासनाकडून नेहमीच केराची टोपली दाखवली जात आहे. 

वन्यप्राणी, माकडे यामुळे ईतर शेती उत्पादन करणे खूप तोट्याचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग काजू बागायती कडे वळला आहे. वडिलोपार्जित तुकड्यांत जेथे जमेल तेथे विकत आणून काजू कलमांची लागवड करणे, त्याला खतपाणी आणि ईतर मशागत करून वाढवून शेवटी मिळणार्‍या उत्पन्नातून मजुरी आणि बाकीचे खर्च सुध्दा निघत नसतील तर आम्ही जगावे तरी कसे असा प्रश्न काजू उत्पादक शेतकर्‍यांकडून विचाराला जात आहे. 

Loading

शिवसेनेला एक कोटी दिल्याचा मंत्री दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा

सावंतवाडी : धनादेशाद्वारे मी शिवसेनेला (ठाकरे गट) एक कोटी रुपये दिले होते आणि ते दिल्याचा माझ्याकडे पुरावा असल्याचा खळबळजनक दावाही दीपक केसरकर यांनी केला. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्याला मंत्री केसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
केसरकर म्हणाले, ‘माझ्या श्रद्धेवर ठाकरे यांनी संशय घेतला. मात्र, मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली होती. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? मला गद्दार म्हणण्याचा ठाकरे यांना अधिकार नाही. त्यांचे कर्तृत्व काय?
माझ्यात कर्तृत्व असूनही मला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २०१४ मध्ये राज्यमंत्री केले; पण नंतरच्या काळात सत्ता आल्यानंतर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री करण्यात आले नाही. याची खुद्द आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीच कबुली दिल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा, आमदारांनाही ते भेटत नव्हते. मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर वाट बघत होतो; पण मला कधी भेटही मिळत नव्हती. मग त्यांच्याकडे लोक थांबणार कसे? मी स्वतःहून नाही, तर मला भाजपकडून निमंत्रण असतानाही ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले, म्हणून मी शिवसेनेत गेलो.’ असे ते पुढे म्हणालेत 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपण पाणबुडी प्रकल्प मंजूर केल्याचा व तो गुजरातला नेण्यात आल्याचे सांगितले; पण वस्तुस्थिती सर्वांनी जाणून घ्यावी. पाणबुडी प्रकल्प मी स्वतः मंजूर केला होता; पण नंतरच्या पर्यटनमंत्र्यांनी तो प्रकल्प पुढे सरकवला नाही. त्यामुळेच तो रद्द झाला; मात्र आताच्या पर्यटनमंत्र्यांनी तो मंजूर केला असल्याचे मंत्री केसरकरांनी यावेळी सांगितले.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची मते लाखांच्या आतमध्ये होती; पण मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हीच मते लाखांच्या बाहेर गेली. त्यामुळेच वैभव नाईक तसेच विनायक राऊत हे निवडून आल्याचा दावाही मंत्री केसरकर यांनी यावेळी केला.

Loading

बहुचर्चित संकेश्वर-बांदा महामार्ग नक्की कुठून जाणार? शासकीय पत्रात भेटले उत्तर…

सावंतवाडी : बहुचर्चित संकेश्वर-बांदा  महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की सातोळी बावळाट मार्गे बांदा शहरात जाणार याबद्दल शासनाने काही निश्चित माहिती दिली नसल्याने येथील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शासनाच्या कार्यालयां दरम्यान होणार्‍या पत्र व्यवहारांत हा मार्गच्या नावात माडखोल-सावंतवाडी-इन्सुली असे नमूद केल्याने हा मार्ग सावंतवाडीहून बांदा शहरात जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

कोल्हापुर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सावंतवाडी बांधकाम विभागाला एक पत्र पाठवले आहे. संकेश्वर ते आंबोली फाट्या पर्यंत रस्त्याच्या रुंदीरकण व मजबूती करणाचे काम सुरू आहे. तो भाग आपल्या विभागाकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी या पत्राद्वारे कोल्हापुर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सावंतवाडी बांधकाम विभागाकडे केली आहे.

नियोजित संकेश्वर-बांदा क्रमांक ५४८ हा महामार्ग नेमका दाणेली-बावळाट मार्गे बांद्यात जाणार की सावंतवाडी शहरातून जाणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत अधिकृत रेकॉर्ड कोणाचकडे नाही. अद्याप पर्यत आंबोलीच्या पुढे या रस्त्याचे सर्व्हे केला गेला नाही आहे. मात्र आज बांधकाम विभागाला रस्ता व त्या संबंधी असलेले रेकॉर्ड वर्ग करण्याबाबत पत्र झाले आहे. त्यात हा महामार्ग माडखोल, सावंतवाडी, इन्सुली येथून जाणार असल्याचे घोषित केल्याचा उल्लेख आहे. मात्र पत्रव्यवहारात असा उल्लेख केला असला तरी शासनाकडून या महामार्गाचा अंतिम आराखडा जाहीर केल्याशिवाय हा महामार्ग नक्की कुठून जाणार हे १००% खात्रीने सांगणे चुकीचे ठरेल. 

सावंतवाडीकरांची मागणी..

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरा बाहेरून नेण्यात आला आहे. पूर्वीचा जुना मुंबई गोवा महामार्ग सावंतवाडी शहरातून जात होता. मात्र वेगवान प्रवासाच्या नावाखाली तो बाहेरून नेण्यात आला. त्याचा शहराच्या विकासावर तसेच पर्यटनावर खूप मोठा परिणाम झाला. त्यात संकेश्वर-बांदा महामार्ग सातोळी बावळाट मार्गे बांदा शहरात नेणार असल्याची चर्चा चालू झाली. मात्र या गोष्टीला सावंतवाडीस्थित नागरिकांकडून विरोध होत आहे. निदान हा महामार्ग तरी सावंतवाडी शहरातूनच नेण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

शक्तिपीठ महामार्गाचे काय? 

समृद्धी महामार्गा पेक्षाही लांबीला मोठा असलेला नागपूर – गोवा महामार्ग तळकोकणातून जाणार आहे. या महामार्गाच्या आरंभीक तथा कच्च्या आराखड्यानुसार हा महामार्गसुद्धा आंबोली मार्गे गोव्याला जाणार आहे. मात्र हा मार्ग आंबोली ते गोवा कोणत्या गावातून /शहरातून जाणार याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. 

 

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय स्थापन होणार 

मुंबई, दि.०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरी येथे एकच सार्वजनिक बांधकाम मंडळ असून, स्वतंत्र मंडळ स्थापन झाल्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या गतीमान कामकाज होणार आहे. या नवीन मंडळ कार्यालयासाठी १७ पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असून यातील १० नियमित पदे आणि ७ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षाची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे.

सद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी मिळून एकच मंडळ कार्यालय रत्नागिरी येथे कार्यरत आहे. अधीक्षक अभियंता, रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रात दापोली पासून दोडामार्ग पर्यंत सुमारे ४०० किलोमीटरचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय मंजुरी मिळाल्याने बांधकाम विभागाचे कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी विकास निधी अधिक प्राप्त होऊन विविध प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पद्धतीने होईल.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी या विभागाकडे मिळून सुमारे २ हजार किलोमीटर लांबीचे राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी सुस्थीतीत आणण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

 

Loading

कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी मेगाब्लॉक; सावंतवाडी दिवा एक्सप्रेस व जनशताब्दी एक्सप्रेस उशिराने धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत आडवली ते आचिर्णे विभागादरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रामुख्याने सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

१) Train no. गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस 
या गाडीचा दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड- कणकवली विभागादरम्यान ९० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. .
२) गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस
या गाडीचा दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी स्थानकादरम्यान १० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून २ विशेष मेमू गाड्या धावणार

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर दोन महिन्यांसाठी दोन विशेष मेमू गाड्या चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. या गाड्या आठ डब्यांच्या असून पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाच्या असणार आहेत. दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी ९ असे मिळून एकूण १८ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
१) गाडी क्रमांक ०११५७ पनवेल – रत्नागिरी विशेष मेमू 
दिनांक ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ही गाडी पनवेल येथून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी  सुटून रत्नागिरी येथे  पहाटे ४ वाजता पोहोचेल.
या गाडीचे थांबे : सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
2) गाडी क्रमांक ०११५८ चिपळूण – पनवेल विशेष मेमू 
दिनांक ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ही गाडी चिपळूण  येथून दुपारी  ३ वाजून २५ मिनिटांनी  सुटून पनवेल येथे  रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल.
या गाडीचे थांबे : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search