Rain Alert : राज्यातील शेतकर्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील बहुतेक जिल्हय़ात पुढच्या ४/५ दिवसात पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत कोकण गोव्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस , तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दिनांक ०४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात तर दिनांक ०५ ते ०७ सप्टेंबर पर्यंत कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
दिनांक ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाची शक्यता आहे.
सावंतवाडी | जिल्ह्यातील शाळेत अजूनही शिक्षक न दिल्याने तसेच डी.एड., बी.एड. बेरोजगारांचे प्रश्न न सोडवल्याच्या निषेधार्थ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडे शिक्षकदिनी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा कुडाळ युवासेनेचे तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे. ५ सप्टेंबरला सकाळी १०. ३० वाजता युवा सेनेचे कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री योगेश धुरी यांनी केले आहे गेले काही महिने जिल्ह्यात शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे डी.एड, बी.एड झालेल्या शिक्षकांना अद्याप पर्यंत नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यामुळे त्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे याच निषेधार्थ शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन केले जाणार आहे असे योगेश धुरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
मुंबई : गणेशोत्सवास मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात गावी जाणाऱ्या कोकणवासीयांची एक खुशखबर आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा (Kashedi Tunnel) वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. सध्या या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट हा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षात नागमोडी वळणाच्या या घाटामध्ये अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. या घाटामध्ये काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित झालेले आहेत. हा घाट पूर्ण करण्यासाठी जवळपास ४५ ते ६० मिनिटांचा कालावधी लागतो यासाठी नागमोडी वळणाच्या या मार्गाला पर्यायी म्हणून या घाटाचा सर्वे करण्यात आला होता. सर्वे केल्यानंतर पर्यायी घाटमाथावरच्या सध्या स्थितीत असलेल्या चालू रस्त्याच्या खाली बोगदा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी आपला सार्वजनिक बांधकाम विभाग दिवसरात्र काम करत आहे. त्यामुळेच कशेडी टनेल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असून, या बोगद्यामुळे रत्नागिरीतील कशेडी ते पोलादपूरमधील भोगाव हे एका तासाचे अंतर दहा मिनिटांत पार करता येईल.… pic.twitter.com/9JaqMWmi4O
सिंधुदुर्ग: वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी पेरून ठेवलेले गावठी बॉम्ब पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोकादायक ठरत आहेत. असाच एक गावठी बॉम्ब खाल्ल्यामुळे सावंतवाडी माळेवाड येथील प्रवीण दत्ताराम नाईक यांच्या म्हशीच्या वासराचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्यांसह स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
मळेवाड परिसरात शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवण्यात येत आहे. त्यामुळे गुरांना तसेच पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला. प्रवीण नाईक यांनी गुरे चरावयास सोडली होती. याच भागात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवले होते. ते बॉम्ब खाल्ल्याने वासराचा मृत्यू झाला. याबाबत वनखात्याने सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Konkan Railway News : गाडी क्रमांक ०२१९७/०२१९८ जबलपूर कोईमतूर या कोकण मार्गे धावणाऱ्या गाडीला कल्याण येथे थांबा देण्यात यावा या मागणीसाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
कल्याण,अंबरनाथ,बदलापूर येथे मोठ्या प्रमाणात कोकणातील चाकरमानी स्थित आहेत. त्यांना कोकणात जाण्यासाठी ठाणे किंवा दादर या ठिकाणी जावे लागते. सध्या गणेशचतुर्थीचा हंगाम असल्याने या स्थानकावरून जाणाऱ्या गाडयांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जबलपूर कोईमतूर ही गाडी कल्याण स्थानकावरून जाते; मात्र या स्थानकावर या गाडीला थांबा नाही आहे. या गाडीला कोकणातील रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानकावर थांबा आहे. या गाडीला कल्याण स्थानकावर कायम स्वरूपी थांबा मिळाल्यास येथील कोकणवासीयांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मंगळवार दिनांक ०५ सप्टेंबर आणि गुरुवार दिनांक ०७ सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतले जाणार आहेत. या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
दिनांक ०५ सप्टेंबर चिपळूण ते करंजाडी दरम्यान रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटे ते ३ वाजून २० मिनिटे असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते वीर दरम्यान सुमारे अर्धा तास उशिराने धावणार आहे.
दिनांक ०७ सप्टेंबर गुरुवारी सेनापुरा ते ठोकूर दरम्यान रोजी दुपारी ३ संध्याकाळी ६ असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१)Train no. 10108 Mangaluru Central – Madgaon Jn. MEMU Express
दिनांक ०७ सप्टेंबर प्रवास सुरु करणारी ही गाडी मंगुळुरु सेंट्रल या सुरवातीच्या स्थानकावरून १ तास १५ मिनिटे उशिराने सुटणार आहे.
Konkan Railway News : पनवेल – वसई रेल्वेमार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून गावावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.तर अनेक गाड्या रद्द, अंशतः रद्द आणि पर्यायी मार्गावरून वळविण्यात आलेल्या आहेत. काल संध्याकाळी ७:३० वाजता त्या मालगाडीचे डबे हटवून मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र अजूनही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली नाही आहे. गाड्या १० ते १२ तास रखडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
अडकलेल्या प्रवाशांना रेल्वेची माहिती देण्यासाठी सीएसएमटी, पनवेल, कल्याण, ठाणे येथे मदतकक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अडकलेल्या प्रवाशांसाठी सुमारे 4000 पाण्याच्या बाटल्या, 4000 बिस्किट/स्नॅक्स/खाण्याच्या पाकिटांची व्यवस्था करून ती प्रवाशांमध्ये वाटण्यात आली. नागोठणे, कळंबोली, तळोजा आदी ठिकाणी काल प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.
यशसावंत | सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्याच आठवड्यात दिली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरून गेल्याचे दिसत आहे. आज दिनांक ०१ सप्टेंबर असूनही अजूनही येथे नियमित सेवा चालू झाली नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवस चिपी विमानतळावर विमानच उतरले नाही.
विमानाची बूकिंग सेवा उपलब्ध करून देणार्या क्लीअर ट्रीप तसेच मेक माय ट्रीप या वेबसाईटवर तपासले असता मुंबई ते सिंधुदुर्ग या दरम्यान एक दोन दिवस आड करून विमान फेरी असल्याचे चित्र दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या जवळील तारखांचे विमान भाडे दहा हजाराच्या वर गेले आहे. त्यामुळे यंदा विमानाने गावी जाण्याचा बेतात असणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला आहे.
.. तर सिंधुदुर्ग विमानतळाचा उपयोग काय?
गणेश चतुर्थी आणि इतर हंगामाच्या दिवसांत सुद्धा अशा अनियमित फेर्या असतील तर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विमान सेवेचा उपयोग तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विमानसेवेच्या तिकीट बूकिंग साठी Dynamic Pricing Strategy चा अवलंब करण्यात येत असतो. तरीपण मुंबई ते गोवा विमानसेवा तिकीट भाडे सर्व चार्जेस पकडून साधारणपणे 1800 ते 2000 रुपये एवढे आहे. हंगाम असल्याने एवढे भाडे देवून कोकणात गावी जाण्यासाठी किती तरी कोकणवासिय उत्सुक आहेत. प्रवासी असूनही विमानसेवा अनियमित असल्याने प्रशासनाला हंगामाचा फायदा घेणे जमत नसल्याचे दिसत आहे. येथील राजकिय पक्ष पण यामध्ये लक्ष घालताना दिसत नाही आहेत. अनियमित सेवेमुळे पर्यटकांनी सुद्धा या सेवेकडे पाठ फिरवली आहे. असेच चित्र राहिले तर एक दिवस हे विमानतळ बंद होईल असे बोलले तर नवल वाटायला नको.
Konkan Railway News: वैभववाडी स्थानकात तेजस एक्सप्रेस आणि एलटीटी- मडगाव एक्सप्रेस या गाडयांना थांबा देण्याबाबत कोकण विकास समितीने केलेल्या निवेदनाला रेल्वे प्रशासनाकडून उत्तर आले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड KRCL ने ही मागणी रेल्वे बोर्डच्या कक्षेत येत आहे असे सांगून आपले हात झटकले आहेत.
वैभववाडी स्थानकात सध्या ५ नियमित गाडयांना थांबा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गणपती/होळी/दिवाळी विशेष गाडयांना येथे थांबा देण्यात येत आहे. यंदाही गणेशोत्सव विशेष गाडयांना वैभववाडी या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या स्थानकावर अधिक गाडयांना थांबे द्यावेत कि नाही याबाबत रेल्वे बोर्ड ठरवणार आहे अशा शब्दात या निवेदनास उत्तर देण्यात आले आहे.
वैभववाडी स्थानकावर वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन या स्थानकावर गाडी क्रमांक २२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक ११०९९/१११०० एलटीटी- मडगाव एक्सप्रेस या गाडयांना थांबा देण्याबाबत कोकण विकास समितीने २३/०६/२०२३ रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याना एक निवेदन सादर केले होते. या निवेदनात मागील १० वर्षात रेल्वेला येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचे आकडे अधोरेखित करून येथे या दोन गाडयांना थांबा दिल्यास प्रवासीसंख्या वाढून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने येथे थांबा मजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती.
Modi Express : आ. नितेश राणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईस्थित कणकवली विधानसभा मतदारसंघातील चाकरमानी गणेशभक्तांसाठी खुशखबर दिली असून गणेशचतुर्थीसाठी स्पेशल मोदी एक्सप्रेस ची मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे..
दिनांक १७ सप्टेंबर रोजी भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून “मोदी एक्सप्रेस” याच दिवशी सोडून तिला स्पेशल बनवण्यात येत आहे. दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता ही गाडी दादरच्या ८ नंबर प्लॅटफॉर्म वरून सोडण्यात येणार आहे. या गाडीची बुकिंग दिनांक ०५ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत होणार असून ज्यांना सीट बुक करायची आहे त्यांनी या कालावधी दरम्यान कणकवली मतदारसंघाच्या मुंबईस्थित मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी या चित्रफितीत केले आहे. या प्रवासादरम्यान प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांची दरवर्षीप्रमाणे जेवण आणि पाण्याची सोय करण्यात अली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.