Category Archives: कोकण

प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्‍या परप्रांतीय फेरीवाल्यांचे परवाने त्वरित रद्द करावेत-शौकतभाई मुकादम

चिपळूण, दि. १९ फेब्रु.:चिपळूण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना खाद्यपदार्थ विक्रेत्यांसंबंधीत जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, ही गोष्ट लांछनास्पद आहे. मला अनेक प्रवाशांचे फोन आले तेव्हा मी खात्री केल्यानंतर वस्तुस्थिती खरी आहे हे समजले. प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्‍या परप्रांतीय फेरीवाल्यांचे परवाने त्वरित रद्द करावेत, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या फेरीवाल्यांना कुणी दिला. या पूर्वी एक फेरीवाला पावाच्या लादीवर पाय ठेवून झोपला होता. तर दुसर्‍या फेरीवाला फलाटावरील बाकडयावर झोपला असून त्याच्याकडील भजी ट्रेसहीत पडलेली दिसत आहेत. व ती भजी प्रवाशांनी जाब विचारताच पुन्हा ट्रेमध्ये गोळा करून घेताना दिसत आहे. प्रवाशांनी व आरपीएफच्या जवानाने हटकताच ती कचर्‍याच्या डब्यात टाकली. हा प्रकार करणार्‍या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की अन्य भेसळ अधिकारी तसेच पोलीस झोपा काढत आहेत का? फेरीवाल्यांची सहा महिन्याची मेडिकल टेस्ट करावी लागते, ती झालेली आहे की नाही. ज्या स्टॉलधारकांचे फेरीवाले आहेत त्यांच्या स्टॉलचा परवाना रद्द करण्यात यावा व प्रवाशांच्या जीवाशी खेळून खाद्यपदार्थ विकणार्‍या परप्रांतीयांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.

‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’; दीपक केसरकर यांच्या विरोधात लावलेले बॅनर चर्चेत

सिंधुदुर्ग, दि. १८ फेब्रु.:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात वेंगुर्लेमधील पाट परुळे भागात लावण्यात आलेले बॅनर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’, अशा आशयाचे बॅनर दिपक केसरकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी लावले आहेत.दीपक केसरकर यांच्याबद्दल गावकऱ्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

मालवणी बोलीभाषेतून या बॅनरवरील सर्व मजकूर लिहिण्यात आला आहे. लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मात्र हे बॅनर खरंच गावकऱ्यांनी लावले की विरोधकांनी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण बॅनवर फक्त केसरकरांनी न केलेल्या कामांचाच पाढा वाचण्यात आला आहे.

बॅनरमधील मजकूर काय आहे ?

“प्रिय दिपकभाई,

म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.

मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.

तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.

आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??

भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.”

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगाब्लॉक; ‘या’ दोन गाड्या उशिराने धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ०९:३० वाजेपर्यंत सावर्डा ते रत्नागिरी विभागांदरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 12617 Ernakulam – H. Nizamuddin Express 
या गाडीचा दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव ज.  – रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५  मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. .
२) Train no. 20923 Tirunelveli – Gandhidham Express
या गाडीचा दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव  ज. – रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. .

गणपतीपुळे येथे सुरु होणार देशातील पहिले ऐतिहासिक प्राणी संग्रहालय; पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी :देशातील पहिले ऐतिहासिक प्राणी संग्रहालय संग्रहालय गणपतीपुळे जवळील मालगुंड मालगुंड मध्ये सुरू होणार असल्याची घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मालगुंड येथे केली आहे. मालगुंड गावच्या सुकन्या तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती साधनाताई साळवी यांच्या वाढदिवसाला पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली उपस्थिती दाखवली होती यावेळी ते बोलत होते.
या प्राणिसंग्रहालयाची  जागा एक दोन दिवसांतच निश्चित होऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचे काम सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच हे प्राणिसंग्रहालय मालगुंड येथे झाल्यानंतर आमचा असा अंदाज आहे की गणपतीपुळे येथे दरवर्षी 22 लाख पर्यंत भेट देतात मात्र त्याहीपेक्षा 30 लाखापर्यंत मालगुंड मध्ये पर्यटक भेटी देऊन मालगुंडच्या विकासाचा कायापालट होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर सोमवारी धावणार २ विशेष मेमू गाड्या

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आणि मागणीच्या आधारावर  (TRAIN  ON  DEMAND) या तत्वावर मध्य रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दोन विशेष मेमू गाड्या चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. या गाड्या आठ डब्यांच्या असून पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाच्या असणार आहेत.
१) गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल विशेष अनारक्षित मेमू (TOD)
सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी ही गाडी चिपळूण येथून दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी  सुटेल ती पनवेल येथे  रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.
या गाडीचे थांबे : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे.
2) गाडी क्रमांक ०११५९ पनवेल – रत्नागिरी विशेष अनारक्षित मेमू (TOD)
सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी ही गाडी पनवेल येथून रात्री ९ वाजता  सुटून रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी  पोहोचेल.
या गाडीचे थांबे : सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

Video: कोकण रेल्वेच्या स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार; जमिनीवर पडलेली भजी उचलून……

रत्नागिरी कोकण रेल्वेच्या एका स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा वडापावच्या ट्रे वर पाय ठेवून झोपण्याचा प्रकार ताजा असताना येथे एक असाच किळसवाणा प्रकार दुसर्‍या एका विक्रेत्याकडून घडला आहे. याबाबतचा एक विडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

चिपळूण स्थानकावर एका विक्रेत्याच्या हातातून भज्यांच्या ट्रे निसटला आणि सर्व भजी जमिनीवर पडली. त्या विक्रेत्याने सर्व भजी पुन्हा त्या ट्रे मधून भरली आणि विकायला पुन्हा निघाला असे त्या विडिओ मध्ये दिसत आहे. एका प्रवाशाने हा विडिओ चित्रित केला आहे.

या प्रकारांमुळे सामान्य लोकांच्या आरोग्याचे या विक्रेत्यांना काहीच देणेघेणे नाही हे समोर येत आहे. प्रवासात लहान मुले अशा खाद्यपदार्थाचा नेहमीच आग्रह धरतात. मात्र अशा प्रकारांमुळे हे पदार्थ मुलांना द्यावेत की न द्यावेत हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तो विक्रेता खरोखरच ‘ती’ भजी फेकून देणार होता का?

पडलेली भजी भरून झाल्यावर तो विक्रेता तिथून निघाला; मात्र जागरूक प्रवाशांनी त्याला हटकले आणि ती भजी टाकून देणार आहे की नाही ते विचारले. तेव्हा तो विक्रेता हो बोलून पुढे चालायला लागला. मात्र तेथील प्रवाशांनी आरपीएफ कर्मचाऱ्याच्या मदतीने तिथेच जवळ असलेल्या कचराकुंडीत ती भजी फेकायला लावलीत. जर त्या विक्रेत्याला भजी फेकायचीच होती तर ती त्याने तिथेच बाजूला असलेल्या कचराकुंडीत न फेकता पुढे का घेऊन गेला? हा प्रश्न समोर आला आहे.

प्रवाशांचे आणि आरपीएफ अधिकार्‍याचे कौतुक

आपल्या समोर असा अनुचित प्रकार घडताना गप्प न बसता त्या विक्रेत्याला त्याच ठिकाणी जाब विचारला. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ अधिकाऱ्याने आपले कर्तव्य पार पाडून त्याला ताब्यात घेतले. या सर्व घटनेत जागरूकता दाखवल्याबद्दल त्या प्रवाशांचे आणि आरपीएफ अधिकार्‍याचे कौतुक होत आहे.

–Video 👇🏻

 

आमदार वैभव नाईक शिवसेना (शिंदे) गटाच्या वाटेवर? रवींद्र चव्हाणांसोबत घेतलेल्या गुप्त भेटीनंतर चर्चांना उधाण

सिंधुदुर्ग :भाजपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे (उबाठा) आमदार वैभव नाईक यांनी  सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक ही गुपचूप भेट घेतली. वैभवनाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे. या भेटीचे नेमके कारण समजले नाही. मात्र या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.वैभव नाईक हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या अफवा याआधी येत होत्या. मात्र या भेटीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा चालू झाली आहे.

Konkan | स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद

रत्नागिरी : कोकणातील आंबा व्यावसायिकांसाठी एक दिलासा देणारी  बातमी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र आंबा बोर्डासाठी २०० कोटीं रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आठ दिवसांत त्याबाबत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे.
आंबा बागायतदारांसाठी रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना करण्याची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे. त्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. बोर्डाच्या समितीवर शासकीय अधिकाऱ्यांबरोबर अशासकीय सदस्य म्हणून बागायतदारांच्या संघटनेतील दोन सदस्यांना घेण्यात येणार आहे. शेतीमालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, यासाठी आयोगाकडे जाऊन मागणी केली आहे. त्यामुळे आंब्याचा लवकरच शेतमालात समावेश होईल.
आंब्यावर फळमाशी पडून मोठे नुकसान होते. त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाईल. माकडापासून होणाऱ्‍या नुकसानीवरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. आंबाफळाच्या सुरुवातीपासून ते निर्यातीपर्यंत संरक्षण देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आंबा मंडळाच्या प्राथमिक प्रक्रियेत हे मुद्दे बोर्डाच्या अजेंड्यावर राहणार आहेत.

रेल्वेकडून ‘या’ कालावधीत राबवली जाणार विशेष तिकीट तपासणी मोहीम; योग्य तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन

मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वे कडून ३१ मार्च पर्यंत २ टप्प्यात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम १२ ते २५ फेब्रुवारी आणि १५ ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट काढून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणीसह द्वितीय श्रेणी डब्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना धक्काबुक्की प्रवास सहन करावी लागते. परिणामी, याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. धावत्या वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात तिकीट तपासणी करण्याची सूचना प्रवाशांकडून करण्यात आली. त्यानंतर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यासह आता भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह वाणिज्य अधिकारी आणि विभागीय कार्यालयातील वरिष्ठ पर्यवेक्षकांचे पथक आवश्यकतेनुसार आरपीएफ, दक्षता आणि इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना पाचरण करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे मंडळाकडून भारतीय रेल्वेमधील प्रत्येक विभागाला दिलेल्या सूचना
– पीआरएस तिकिटांच्या तपासणीदरम्यान प्रवाशांचे ओळखपत्र तपासणे, सवलतीचे तिकीट असल्यास त्याबाबतचे वैध पुरावा तपासून घ्यावा.
– आरक्षण केंद्रावर दलालाच्या हालचाली रोखण्यासाठी पथके तयार करून, तपासण्या कराव्यात. तसेच आपत्कालीन कोट्याचा गैरवापर होऊ नये, याबाबत सतर्क राहावे.
– कॅटरिंग कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांकडे योग्य शुल्क घेत आहेत आणि त्यांना योग्य पावती दिली जाते, याची तपासणी करावी. तसेच अनधिकृत विक्रेत्यांना रेल्वेगाड्यांमध्ये बंदी घालावी. खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवर दराचे फलक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री केली जाते का, हे तपासावे.

Nagpur-Goa Expressway Updates: नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्गाचे कोकणात ‘या’ ठिकाणी होणार मिलन

मुंबई :नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या संरेखनास महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली आहे. एकूण ६ लेन असलेला ८०६ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. लवकरच या मार्गासाठी भूसंपादन प्रकियेस सुरवात होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्गाशी जोडणी
हा महामार्ग कोल्हापूर येथून आंबोलीमार्गे तळकोकणात येणार आहे. या महामार्गाची समाप्ती बांदा येथील आरटीओ च्या जवळ होणार आहे. येथेच प्रस्तावित ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्ग या महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

नागपूर येथून सुरु होणार हा महामार्ग एकूण ११ जिल्ह्यातून जाणार आहे. यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पत्रादेवी (उत्तर गोवा) अशी या जिल्ह्यांची नवे आहेत. प्रकल्पाचा अंदाजित एकूण खर्च ८३ हजार ६०० कोटी एवढा आहे. प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नसली तरी २०२८-२९ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search