Konkan Railway News: नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये भारतीय रेल्वेला २.४ लाख कोटी रुपयांची भरीव तरतूद केली गेली आहे. पण नेहमीप्रमाणे कोकणरेल्वेसाठी या अर्थसंकल्पामध्ये काहीच तरतूद केली गेली नाही आहे; त्यामुळे कोकणरेल्वेची भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
कोकणरेल्वे महामंडळ ही भारतीय रेल्वेच्या अखत्यारीत येणारी स्वायत्त आस्थापना आहे. कोकणात रेल्वेमार्ग बांधण्यासाठी कोकणरेल्वे महामंडळाची स्थापना जुलै १९९०मध्ये झाली. त्यानंतर आतापर्यंत बाजारपेठेतील वाटय़ावर कोकण रेल्वे महामंडळाला अवलंबून राहावे लागत आहे. याआधी भारतीय रेल्वेने कोकण रेल्वेला मदत करावी, यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले होते. मात्र सुरेश प्रभू हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना झालेली ६०० कोटीची तरतूद वगळता मागील ३३ वर्षात अर्थसंकल्पात कोंकण रेल्वेच्या वाट्याला काहीच आले नाही.
कोकणरेल्वे कॉर्पोरेशन KRCL ही रेल्वे एक रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. तसेच ती एक वाणिज्य आस्थापना Corporate Entity आहे त्यामुळे नफ्यावर तिचा जास्त भर आहे. तसेच ही कंपनी मालवाहतुकीवर जास्त भर देताना दिसते; त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर दुर्लक्ष होताना दिसत आहे. असे मत उत्तर कन्नड रेल्वे सेवा समिती चे सचिव राजीव गावकर यांनी मांडले आहे. त्यांचे हे वक्तव्य वास्तवाला धरून आहे. कारण कोकण रेल्वमार्गासारखा आवाहनात्मक मार्ग ,रो- रो सारखी नवी संकल्पना, जम्मूचा नवा रेल्वेमार्ग हे या कंपनीने यशस्वी केले मात्र प्रवासी वाहतुकीच्या अनेक समस्या अजूनपर्यंत या मार्गावर कमी झाल्या नाही आहेत.
कोकणरेल्वे मार्ग आणि मध्यरेल्वे मार्ग जोडणारा विजयदुर्ग- वैभववाडी-कोल्हापूर हा प्रस्तावित मार्ग निधीअभावी रखडला आहे. वाढता प्रतिसाद पाहता कोकण मार्गाचे दुपदरीकरण आवश्यक आहे. या मार्गावर प्रवासी गाड्यांची संख्या आवशक्यतेपेक्षा खूपच कमी आहे. अनेक स्थानकावरील प्रश्न सुटले नाही आहेत. कोकणरेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण झाल्यास गोवा व कर्नाटक रेल्वेच्या साऊथ झोनमध्ये, तर सिंधुदुर्ग,रत्नागिरी-रायगड सेंट्रल झोनमध्ये जाईल. अशा वेळी कोकण रेल्वेचा चेहरामोहरा बदलून जाईल, कारण त्यामुळे अर्थसंकल्पात या मार्गाला वाटा भेटेल आणि आणि प्रवासी वाहतुकीच्या बऱ्याच समस्या दूर होतील असे तज्ञांचे मत आहे.