रत्नागिरी, दि. ०८ : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड-आंबडवे रस्त्यावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास सावरे फाटा ते घोसाळे फाटा यादरम्यान आंबडवे-मंडणगड-नालासोपारा एसटीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही आहे मात्र वाहकासह 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर आंबडवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.या अपघातात एसटी बस पलटी झाली आहे. मंडणगड-आंबडवे या रस्त्याचे अपूर्ण कामामुळे येथे अपघात होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
राजापूर : राजापूर तालुक्यातील मौजे.कोदवली साईनगर येथे दुर्मिळ जातीचा पिसोरी हरीण हा वन्यप्राणी आढळून आला आहे. येथील श्री राजन मधुसूदन गोखले यांचे राहत्या घराच्या पडवीत हा वन्यप्राणी आढळून आला आहे.
या प्राण्याची माहिती प्रशांत करांडे यांनी वनविभागाला दिल्या वर वनपाल राजापूर सदानंद घाटगे, वनरक्षक विक्रम कुंभार तसेच रेस्कूटीमचे दिपक चव्हाण,प्रथमेश म्हादये,निलेश म्हादये, विजय म्हादये, गणेश गुरव, दिपक म्हादये जागेवर जाऊन सदर पिसोरीस पकडून पिंजऱ्यात सुरक्षित केले. त्यानंतर पशू वैद्यकिय अधिकारी राजापूर श्री. प्रभात किनरे यांच्याकडून त्याची तपासणी करून घेण्यात आली. सदरचा पिसोरी वन्यप्राणी हा नर जातीचा असुन त्याचे वय 7 ते 8 महिने असून तो सुस्थितीत असल्याची खात्री करून पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर व मा. परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांचे आदेशा नुसार वन्यप्राण्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2023: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील विविध पदांच्या 334 जागांसाठी सरळसेवा भरती 2023 जाहीर झाली आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती पदाचे नाव/ पदानुसार जागा:
1) आरोग्य पर्यवेक्षक- 01
2) आरोग्य सेवक (पुरूष)- 55
3) आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला)- 121
4) औषध निर्माण अधिकारी- 11
5) कंत्राटी ग्रामसेवक- 45
6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)- 29
7) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 02
8) कनिष्ठ लेखा अधिकारी- 02
9) कनिष्ठ सहाय्यक लेखा- 04
10) मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका- 02
11) पशुधन पर्यवेक्षक- 18
12) प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 02
13) तारतंत्री- 01
14) वरिष्ठ सहाय्यक- 04
15) वरिष्ठ सहाय्यक लेखा- 07
16) विस्तार अधिकारी (कृषि)- 03
17) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)- 27
अर्ज कसा कराल?शैक्षणिकदृष्टीने पात्र उमेदवारांनी दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिकृत वेबसाईट zpsindhudurg.maharashtra.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन शासनाने केले आहे.
जाहिरात
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/सिंधुदुर्ग-जिल्हा-जिल्हापरिषद-भरती-2023.pdf” title=”सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हापरिषद भरती 2023″]
नवी दिल्ली ; “हर घर तिरंगा अभियान 2.0” अंतर्गत घरोघरी भारतीय ध्वज पोहोचवण्याच्या उद्देशाने शासनाने एक नवीन उपक्रम चालू केला आहे. अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे फक्त 25 रुपये या शुल्कात भारतीय ध्वज पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून उपलब्ध केला आहे. पोस्ट ऑफिस च्या संकेत स्थळावर ऑनलाईन ऑर्डर करून हा ध्वज घरपोच मागवता येईल.
येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन च्या निमित्ताने शासनाने हा उपक्रम राबविला आहे. हा ध्वज २० इंच X ३० इंच साईझचा हा ध्वज असणार आहे. ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करता येईल.
Konkan Railway News : केंद्र सरकार ‘अमृत भारत’ योजनेद्वारे देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचे पुनर्वसन करणार आहे. त्यात महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश आहे. आच्छर्याची गोष्ट म्हणजे सर्वात जास्त गरज असताना कोकणातील एकाही रेल्वे स्थानकाचा समावेश नसल्यामुळे कोकणावर पुन्हा अन्याय झाल्याची भावना कोकणवासीयांत निर्माण झाली आहे.
‘अमृत भारत’ या रेल्वे स्थानक विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल २५ हजार कोटी रुपये खर्चून देशातील ५०८ स्थानकांचा विकास विमानतळाच्या धर्तीवर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले; मात्र विकास प्रकल्पांतही कोकणाला नेहमीप्रमाणे वगळले आहे. पहिल्या यादीत कोकण रेल्वेच्या एकाही स्थानकाचा समावेश नसल्याने कोकणातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
कोंकण रेल्वेचे विलीनीकरण करणे आवश्यक
संपूर्ण देशात फक्त कोकण रेल्वेच्या मडगाव या एकमेव स्थानकाचा यामध्ये समावेश केलेला आहे. ही यादी बनवताना कोणते निकष वापरले याबाबत हे पाहणे पण महत्वाचे आहे. एक गोष्ट नेहमीच प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कोंकण रेल्वेला अर्थसंकल्पात स्थान न देणे किंवा केंद्र सरकारच्या अशा योजनांपासून वगळण्यात येणे . कोकण रेल्वे KRCL एक स्वतंत्र आस्थापना Companyआहे. ती बांधा- वापरा- हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर सुरू केली होती. त्यातील ‘बांधा’ हा टप्पा १९९८ ला पूर्ण झाला व तेव्हापासून ‘वापरा’ टप्पा सुरू आहे. सर्व कोकणवासीय आता ‘हस्तांतरित करा’ या टप्प्याची वाट पाहत आहेत. सोयीसुविधा व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात स्थान मिळण्याच्या दृष्टीने या महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच कोकण रेल्वेच्या रोहा-मडगाव मार्गाचे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळात व मडगाव-मंगळुरू मार्गाचे नैर्ऋत्य रेल्वेत विलीनीकरण करणे गरजेचे आहे, असे जाणकारांचे मत आहे. सध्याची स्थिती पाहता कोंकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे आवश्यक आहे. दुहेरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे, त्यासाठी केंद्रसरकारच्या अंदाजपत्रकात तरतूद करणे आवश्यक असल्याने कोंकण रेल्वेचे विलीनीकरण करणे ही काळाची गरज आहे.
रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीमधील कशेडी घाटात आज सकाळी ११:५० वाजता टँकर आणि एसटी बस मध्ये अपघात झाला. या अपघातात ८ प्रवासी जखमी झाले असून त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कशेडी घाटात ठाणे ते चिपळूण जाणारी एसटी बसक्र. MH-14-BT-2635 वरील चालक योगेश दादाजी देवरे वय ३५ वर्षे हे कशेडी घाट उतरत असताना समोरुन वाकवली तालुका दापोली ते मुंबई जाणारा टँकर क्रमांक UP-70-HT-7551 वरील चालक दिनानाथ हिरालाल यादव वय ५५ वर्षे राहणार घाटकोपर, मुंबई यांना डोळआ लागल्याने गाडी चुकीच्या साईडला जाऊन समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातामध्ये सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर आणि पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत अपघात ग्रस्तांना मदत केली.
अपघातामधील एसटी बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. त्यापैकी ८ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या जखमींपैकी अनंत दत्तात्रेय विंचू यांना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याने खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालय इथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी इथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
दापोली: दापोली तालुक्यातील निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण ताजे असताना अजून असेच एक प्रकरण समोर आले आहे.
आंजर्ले जवळील मुर्डी येथून एक ३३ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे .याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास आकांक्षा आनंद बेनेरे( रा. राममंदिर, मुर्डी ) या मुलगी नेहा हिला आंगणवाडित सोडून आंजर्ले येथे कामावर जात असल्याचे घरच्यांना सांगून घराबाहेर पडली. मात्र, सायंकाळपर्यंत घरी न परतल्यान तिच्या घरच्यांनी तिच्या कामावर, गावात तसेच नातेवाइकाकडे शोध घेतला. ती मिळून न आल्याने पती आनंद यांनी रविवारी आकांक्षा हि बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल श्री. मोहिते करीत आहेत.
चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील रखडल्या प्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कोंडमळा येथे महामार्ग रोखत शुकवारी आंदोलन केले होते. याप्रकरणी बेकायदा जमाव केला व महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासह २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरील कोंडमळा येथे भुयारी मार्ग बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. शिवाय शेतकरी, जनावरे, विद्यार्थी, तसेच बाजारपेठ व रेशन दुकानावर ये-जा करताना महामार्गाचा अडथळा निर्माण होत आहे. येथे वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत; तसेच सावर्डे, असुर्डे, वहाळफाटा आदी ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या प्रश्नी राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) विभागाकडे, तसेच ठेकेदार कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र पाठपुरावा करूनही दाद घेतली गेली नाही. त्यामुळे याबाबात शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कोंडमळा येथे महामार्ग रोखत ठेकेदार कंपनीविरोधात जोरदार घोषणा केली.
याप्रकरणी बेकायदेशीर जमाव करून महामार्ग अडवून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तालुकाप्रमुख सावंत यांच्यासह अन्य २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विनोद सहदेव आंबेरकर यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. संदीप शिवराम सावंत (वय ५१), प्रीतम नंदकुमार वंजारी (३२), सागर सुशील सावंत (५६), साहिल संजय शिर्के (२३), संदीप सीताराम राणे (४२), शैलेश पांडुरंग कांबळी (३८), प्रशांत संजय सावंत (२९) या सात जणांसह अन्य २० कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमीपूजन करणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या देशभरातील 508 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे स्थानक पुनर्विकासात महाराष्ट्रातील एकूण 123 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी 44 स्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी आज होणार आहे.
देशभरातील 1309 स्थानकांच्या पुनर्विकासाकरता अमृत भारत स्थानक योजना (Amrit Bharat Station Scheme) ही पंतप्रधानांच्या दृष्टीकोनावर आधारित असलेली योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा भाग म्हणून पंतप्रधान 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. 24,470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. शहराच्या दोन्ही बाजूंपासून योग्य अंतरावरील ‘सिटी सेंटर्स’ म्हणून या स्थानकांचा विकास करण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. शहराच्या एकंदर नागरी विकासाच्या समग्र दृष्टीकोनाच्या आधारे या रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबत एकात्मिकतेवर भर दिला जात आहे.
रेल्वे स्थानक पुनर्विकासात काय होणार?
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील 508 रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत विविध अद्ययावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. स्थानक प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहे. विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतिक्षागृह, स्वच्छतागृह, नवीन फूटओवर ब्रीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे.
सावंतवाडी | सागर तळवडेकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची गेल्याच आठवडय़ात दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबाबत चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. अवघ्या 24 तासांत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्नासह स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आवाज उठवणाऱ्या सावंतवाडीकरांच्या मागण्यांच काय झालं ? हा प्रश्न तसाच आहे. की सावंतवाडीकरांना कुणी वाली उरलं नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.
पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच शेवटच रेल्वे स्थानक हे सावंतवाडी आहे. परंतु सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं रखडलेलं काम पूर्णत्वास यावं तसंच मोजक्याच गाड्यांना थांबा असल्यानं अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा. या प्रवासी संघटनांच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनकडून आजवर केवळ केराची टोपलीच दाखवली गेली आहे. सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असूनही उत्पन्नाच्या बाबतीत अग्र क्रमांकावर आहे. मात्र, तरीही केवळ ९ रेल्वे गाड्यांना इथे थांबा दिला गेलाय. तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच फेज-वन च काम होऊन फेज-टू चं काम अद्याप पूर्ण झालेल नाही आहे. ते कधी पूर्णत्वास येईल याबाबत अवाक्षरही कुणी काढत नाही. टर्मिनस तर लांबची गोष्ट रेल्वे गाड्यांना थांबे सुद्धा मिळत नाहीत. रेल्वेनं ये-जा करायला सावंतवाडीकरांना कुडाळवारी करावी लागत आहे. शहरातील नागरिकांना नाहक अर्धा तास यासाठी बायरोड प्रवासात घालवावा लागत आहे. तालुक्यातील इतर गावांतील प्रवाशांबद्दल न बोलेल चांगलं. जर स्वतःची चारचाकी किंवा दुचाकी असेल तर ठीक अन्यथा सरकारी वाहनांचा विचार केला तर प्रवाशांचे होणारे हाल ? ‘अतिथी देवो भव’ म्हणून पाहुण्या चाकरमान्यांना स्थानकापर्यंत सोडायला जाणाऱ्या तासनतास स्थानकावर बसून राहणाऱ्या कोकणीमाणसाचा विचार आमचे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे कधी करणार ? हा एक यक्षप्रश्न बनून राहिला आहे.
कोंकण रेल्वे प्रशासनाला इथल्या स्थानिक जनतेबद्दल, चाकरमानी, तसेच प्रवाशांबद्दल आस्था आहे का ? सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असून ही या स्थानकाचे उत्पन्न हे १३.४ करोड व प्रवासी संख्या ही ३.५ लाख एवढी आहे. उत्पन्नाच्या बाबतीत १० व्या क्रमांकावर असताना येथे ५ दैनिक व ४ साप्ताहिक अशा एकूण ९ रेल्वे गाड्या थांबतात. सावंतवाडी स्थानकावर असा अन्याय का ? उत्पन्न , प्रवासी संख्या असून ही कमी थांबे का ? वारंवार सावंतवाडीवर हा अन्याय कशासाठी? की सावंतवाडीकरांना कुणी वाली राहीलेला नाही ?