Author Archives: Kokanai Digital

मालवण | ‘अळंबी’ शोधताना सापडली कातळशिल्पे

सिंधुदुर्ग : इतिहासप्रेमींसाठी एक खुशखबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून आली आहे. मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. सद्यस्थितीत सड्यावरील कातळावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पांच्या चित्रकृती निदर्शनास आल्या आहेत.
साळेल गावचे ग्रामस्थ परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे हे धामापूर सडा परिसरात ‘अळंबी’ काढण्यासाठी फिरत असताना त्यांना ही कातळशिल्प निदर्शनास पडली. ख्रिस्ती धर्मातील ‘क्रॉस’च्या आकाराची चित्रकृती निदर्शनास आली आहे. त्याच ठिकाणाहून ५०० मीटरवर आणखीन एक भव्य कातळशिल्प कोरलेले आहे. या कातळ शिल्पांच्या भोवताली दगड ठेवून ग्रामस्थांनी ती तात्पुरत्या स्वरूपात संरक्षित केली आहेत.
मालवण तालुक्यात सर्वाधिक कातळशिल्पे!
बहुतांशी कातळ शिल्पे ही उंच अशा माळरानावर म्हणजेच सड्यावरील कातळात कोरलेली असल्याने त्यांना कातळ शिल्पे असे संबोधले जाते. मालवण तालुक्यात आणखी काही ठिकाणी अशा प्रकारची कातळशिल्पे सापडू शकतात. मात्र अशा शिल्पांबाबत ग्रामस्थांमध्ये तेवढी जागरूकता व माहिती दिसून येत नाही. मात्र अशा शिल्पांचा शोध घेणे गरजेचे असून इतिहास संशोधकांची यामध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे.

Loading

सावधान | विश्रांती घेतलेला पाऊस परतणार; ‘या’ जिल्ह्यांना पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

 

Heavy Rainfall Warning : बांगलादेश किनार्‍यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) निर्माण झाले असून ते संध्याकाळपर्यंत खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील २४ तासांत Gangetic WestBengal ओलांडण्याची शक्यता असल्याने पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यताभारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने येत्या ४ दिवसांचा राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून काही विभागांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

आज दिनांक ०१ ऑगस्ट रोजी सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिनांक ०२ ऑगस्ट रोजी या दोन जिल्हय़ाव्यतिरिक्त पुणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

दिनांक ०३ ऑगस्ट रोजी वरील चार जिल्ह्या व्यतिरिक्त ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.

दिनांक ०४ ऑगस्ट रोजी कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला गेला नाही आहे. 

अलर्ट आणि त्यांचे अर्थ 

⊗ ग्रीन अलर्ट – धोका नाही Green Alert

⊗ यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert

⊗ ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert

⊗ रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert

 

 

Loading

समृद्धी महामार्गाच्या कामावेळी मोठी दुर्घटना; क्रेन कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू.

ठाणे : गर्डर मशिन कोसळल्याने समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी आहेत.

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली.घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून जवळपास 10 ते 15 जण तिथं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस आणि चिखलामुळे सध्या मदतकार्यात अडथळे येत असल्याचीही माहिती आहे.

हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, त्याबाबतची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मालेगाव येथून अपघात स्थळी पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला.

Loading

सिंधुदुर्ग | परतीच्या प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षित तिकीट नाही? चिंता नको.. एसटी प्रशासनाने केली ‘ही’ सोय..

सिंधुदुर्ग : गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३०७ एसटी बस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकातून या गाड्या सुटणार आहेत. या बसेसचे आरक्षण कुठूनही करता येणार आहे. तसेच एमएसआटीसी रिझर्व्हेशन ॲप या ॲपच्या माध्यमातूनही हे आरक्षण करता येते. सध्या आरक्षण सुरू असून ज्येष्ठ नागरीक तसेच महिला व मुलींसाठी सवलतीच्या दरात प्रवास सुविधा उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी केले.

पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पाटील म्हणाले, गणेशोत्सवानिमित्त रा.प. महामंडळाने आगावू आरक्षण व्यवस्था उपलब्ध केली असून त्याचा लाभ चाकरमान्यांनी घ्यावा. गतवर्षी सिंधुदुर्ग विभागातून २६६ बसेस मुंबई व पुणेसाठी परतीच्या प्रवासाकरीता उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. रा.प. महामंडळाचे आरक्षण ६० दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार परतीच्या प्रवासासाठी मुंबईकरीता १५३ व पुणेसाठी १५४ बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. दि. २३ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. याशिवाय प्रत्येक दिवशी मुंबई व पुणेला नियमित धावणाऱ्या १३ बसेसही उपलब्ध आहेत..

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने गणेशोत्सवानिमित येणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीची चोख व्यवस्था केली आहे. मुंबई पुणेहून कोकणात सुमारे ५५०० गाड्या येणार आहेत. तर सिंधुदुर्गमधून परतीच्या प्रवासासाठी ३०७ बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बसेससाठीचे आरक्षणही सुरू झाले आहे. जिल्यातील १८ बस स्थानकमधून या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली.आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठीच्या बसेस मुख्य स्थानकांवरून सोडण्यात येत होत्या. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील १८ बसस्टँडवरून या बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील या विविध स्टॅडवरून मुंबई, बोरिवली, भांडूप, ठाणे, कुर्ता ने नगर, निगडी, पुणे, चिंचवड, घाटकोपर, कल्याण, पनवेल अशा ४० मार्गांवर या ३०७ बसेस सोडण्यात येणार आहेत. सन २०१९ मध्ये १५३, सन २०२१ मध्ये २२५ तर सन २०२२ मध्ये २६६ बसेस परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, सिंधुदुर्ग विभागाला १५ ऑगस्टपूर्वी १४ नॉन एसी स्लीपर कोच बसेस कायमस्वरूपी उपलब्ध होणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

 

 

Loading

वंदे भारत एक्सप्रेसला चिपळुणात थांबा मिळावा या मागणीसाठी आ. शेखर निकम यांची रेल्वे राज्यमंत्र्यांशी भेट

 

नवी दिल्ली: कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व खेड अशा दोनच ठिकाणी थांबा आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असल्याने चिपळूण येथे वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सोमवारी सकाळी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.
वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा, यासह अन्य विषयांवर या वेळी आमदार शेखर निकम यांनी ना. रावसाहेब दानवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी अजितदादा पवार राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव, जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आदी उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांच्या निवेदनावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Loading

आता सर्व विषयांसाठी एकच पुस्तक; विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे हलके होणार

संग्रहित छायाचित्र

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझं कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर एक नवीन प्रयोग हाती घेत आहेत. आता विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वर्गात दर तीन महिन्याने सेमिस्टरमध्ये 3 ते 4 पुस्तक एकत्र करुन एकच पुस्तक शाळेत आणावे लागणार आहे. प्रयोग पहिली ते सातवी पर्यंतच्या इयत्तेसाठी असणार आहे

पहिले ते पाचवीतील विद्यार्थ्यांना वर्षातून तीन महिन्याला 1 पुस्तक अशी तीन पुस्तकं असतील. यामध्ये सर्व विषयाचा अभ्यासक्रम एकत्र केला जाणार आहे. तर सहावी आणि सातवीसाठी वर्षभरात चार पुस्तकामध्ये या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण असणार आहे. त्यामुळे वर्षात 3 ते 4 पुस्तकं दर तीन महिन्यात बदलावी जरी लागत असली तरी वर्गात मात्र शिकण्यासाठी एकच पुस्तक घेऊन जावं लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा विषय सातत्याने चर्चेत असतो. न्यायालयाने या मुद्द्यावरुन शिक्षण विभागाला वारंवार फटकारले आहे.

सध्या शाळेचे वेळापत्रक पाहून विद्यार्थी रोज पाच ते सहा पुस्तके , वह्या दप्तरात घेऊन जातात. आता मात्र हा प्रयोग प्रत्यक्षात आला तर विद्यार्थ्यांना दप्तरात एकच पुस्तक न्यावं लागणार आहे.

सुरुवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपाय अमलात येणार आहे. सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करण्याचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल नाशिक मध्ये दिली..

 

 

Loading

बारसु येथील प्रस्तावित रिफायनरी पाकिस्तानात जाणार?

मुंबई :बारसु येथील प्रस्तावित रिफायनरीबाबत एक महत्वाची  बातमी  आहे. बारसु येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानला जाणार असल्याचं वृत्त समोर आले आहे . कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमीही प्रसिद्ध झाल्याचे समजते. याबाबत भारतातील सत्ताधारी पक्षाने अधिकृतरीत्या काहीही जाहीर केले नसले तरी भाजपचे आशिष शेलार यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
आशिष शेलार यांचे आरोप
कोकणात प्रस्तावित असणारी रिफायनरी पाकिस्तानात चालली आहे यासाठी आशिष शेलार यांनी विरोधी पक्षाला या बाबत जबाबदार धरले आहे. गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे.  प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? उद्धव ठाकरे नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली?, असा आरोपच शेलार यांनी केला.

Loading

ब्रेकिंग | सावंतवाडी तालुक्याला भूकंपाचे धक्के | भूकंपाच्या अधिक माहितीसाठी ‘हे’ ॲप डाऊनलोड करा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात रात्री ८ वाजून ५१ मिनीटाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सह्याद्री पट्ट्यातील सांगेली सह माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मोठा आवाज होऊन जमीन हादरली.
तहसीलदार श्रीधर पाटील  यांनी  हा भूकंपाचाच प्रकार असल्याचे  सांगितले. हा ३ रिस्टर स्केल चा हा भूकंप होता. मात्र, त्याचा केंद्रबिंदू नेमका कुठे आहे ते निश्चित झाले नसल्याची माहिती त्यांनी सांगितली. हा भूकंप असल्याचे अधिकृत रित्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे
भूकंपाच्या अधिक माहितीसाठी https://play.google.com/store/apps/details?id=gov.in.seismo.riseq  हे ॲप डाऊनलोड करावे.

Loading

दरडीचा धोका टाळण्यासाठी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे वळवली आणि ४५ प्रवाशांना न घेताच पुढे गेली; नेमका प्रकार काय ?

Express Missed to Passengers : तुमच्या कडे एका गाडीचे आरक्षित तिकीट आहे. गाडी पकडण्यासाठी अर्धा किंवा एक तास आधी तुम्ही स्थानकावर पोहोचता आणि तुम्हाला समजते की तुमची गाडी दीड तास अगोदर निघून गेली. किती मनस्ताप होईल तुमचा? असाच मनस्ताप गुरुवारी मनमाड स्थानकावर 45 प्रवाशांना सहन करावा लागला. कारण त्यांची गाडी त्यांना न घेता दीड तास अगोदरच स्थानकावरून रवाना झाली होती.

वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) वास्को येथून हुबळी, मिरज, पुणे, दौंड, मनमाडमार्गे ती दिल्लीसाठी मार्गस्थ होते. दरम्यान या गाडीची मनमाड रेल्वे स्थानकात येण्याची वेळ सकाळी 10.30 ही आहे. मात्र, गुरुवारी ही रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकात सकाळी 9.30 वाजता आली व पाच मिनीटे थांबून पूढे मार्गस्थ झाली.

रेल्वे गाडी नियोजीत वेळेच्या दीड तास आधीच मार्गस्थ झाल्याने या गाडीच्या प्रवासाचे आरक्षण करणारे 45 पेक्षा अधिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

झालेला प्रकार लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने मुंबईहून हावडाला जाणाऱ्या गितांजली एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात विशेष थांबा देवून गोवा एक्सप्रेसचे आरक्षण केलेल्या 45 हून अधिक प्रवाशांना गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. यावेळी गोवा एक्सप्रेसला जळगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आले होते. गीतांजली एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांना गोवा एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले.

दरडी कोसळत असल्याने मार्गात बदल

सतत पडणाऱ्या पावसामुळे कर्नाटकातील हुबळी भागातीलल रेल्वे मार्गावर दरडी कोसळत आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या नियमीत मार्गाने न जाता रत्नागिरी-रोहा-पनवेल-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बदलण्यात आल्यामुळे गोवा एक्सप्रेस दीड तास आधीच मनमाड रेल्वे स्थानकात पोहचली.

“गोवा एक्सप्रेस नियोजित वेळेआधीच पोचल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. मार्ग बदलण्यात आल्याने वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकात दीड तास आधीच पोचली. ही रेल्वेच्या संबंधित विभागाची चूक असल्याचे लक्षात आले असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल” अशी माहिती शिवराज मानसपुरे एका वृत्तवाहिनीला दिली.

Loading

Mumbai Goa Highway | कंत्राटदाराचे निकृष्ट दर्जाचे काम; परशुराम घाटातील नवनिर्मित रस्त्याला भेगा

चिपळूण | मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर येत आहे. महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही ठिकाणच्या भेगाही रूंदावल्या आहेत. विशेष म्हणजे हे काँक्रीट नुकतेच घातले होते. यावरून या महामार्गावरील काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे हे समोर आले आहे

परशूराम घाट वाहतुकीसाठी खूपच धोकादायक बनत चालला आहे. रस्त्यांना पडलेल्या भेगा वाढताना दिसत आहेत. घाटातील प्रत्येक टप्प्यावर दरडी कोसळल्या आहेत.एकेरी मार्गावर मोठ्या प्रमाणात डोंगराची माती आली असून, ती अद्याप हटवलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू असून, वाहतूकदारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search