Rain Alert : भारतीय हवामान खात्याने आज दिनांक २६ जुलै रोजी कोकण आणि त्याचा लगतच्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून त्या लगतच्या सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या अलर्ट च्या पार्श्ववभूमीवर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे.
रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यत वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना आज बुधवार दि. २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आज दिनांक २६ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी आज २६ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्यांच्या आरक्षणाची तारीख रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. खालील गाड्यांचे आरक्षण दिनांक २७ जुलै रोजी रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात येणार आहेत.
१)गाडी क्र. ०९०१० सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष
२) गाडी क्र. ०९०१७ मडगाव जं. – उधना (साप्ताहिक) विशेष.
३) गाडी क्र. ०९१४९ कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष.
IRCTC Ticket Booking Site Down : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सकाळपासूनच ऑनलाईन रेल्वे तिकीट अॅप आणि संकेतस्थळ आयआरसीटीसी (IRCTC) बंद पडले आहे. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि अॅपवरून प्रवाशांना तिकीट बुकिंग आणि पेमेंटमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत.
आयआरसीटीसीकडून ट्विटर मध्ये पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले की, तांत्रिक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची तांत्रिक टीम समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे. समस्येचे निराकरण होताच, आम्ही त्याबद्दल माहिती देऊ. तो पर्यंत युजर्सनी Amazon, MakemyTrip या सारख्या रेल्वे आरक्षणाची सुविधा देणार्या सेवा वापराव्यात असे आवाहन रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.
याबरोबरच रेल्वे आरक्षणासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्या चालू करण्यात आल्या असल्याचे रेल्वे प्रशासना तर्फे सांगण्यात आले आहे.
Due to technical reasons, the ticketing service is not available on IRCTC site and App. Technical team of CRIS is resolving the issue.
Alternatively tickets can be booked through other B2C players like Amazon, Makemytrip etc.
दोडामार्ग : निसर्गसंपन्नतेचे वरदान असलेल्या तळकोकणातील तिलारी परिसरात काल एक दुर्मिळ ‘तारा’ GEOCHELONE ELEGANS प्रजातीचा कासव सापडला आहे. कासवांची ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून वन्यजीव कायद्याखाली संरक्षित आहे. सध्या हे कासव दोडामार्ग वन विभागाच्या ताब्यात असून लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
दोडामार्ग तालुक्यातील पाळये येथील उद्योजक सुभाष दळवी यांना हे कासव आढळून आले. त्यांनी दोडामार्गचे वनक्षेत्रपाल अरुफ कन्नमवार यांच्याकडे ते सुपूर्द केले. या कासवाच्या पृष्ठभागावर तारे व कुबड्यासारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा वेगळा आहे. पंचनामा व अन्य प्रक्रिया पूर्ण करून या कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वनाधिकारी कन्नमवार यांनी सांगितले आहे.
या प्रजातीबद्दल अधिक माहिती
भारत आणि श्रीलंकेत हे तारा कासव आढळते. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्, केरळ, तामिळनाडू, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा अधिवास आहे. मात्र यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे ते दुर्मिळ प्रजाती असल्याची माहिती प्राणीमित्रानी दिली. या कासवाबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे. हा कासव घरात ठेवल्यास घरात भरभराट अन् नोकरीधंद्यात प्रगती होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळेच ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
प्रजातीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायद्याच्या तरतुदी
इंडियन स्टार कासवे ही वन्यजीव संरक्षण अधिनयानुसार संरक्षित असून त्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी आहे. तसेच ती जवळ बाळगण्यास बंदी आहे. त्यामुळे तारा कासव वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 च्या अनुसूची अंतर्गत संरक्षित आहे. तेथे प्रजाती ताब्यात आढळल्यास त्याला सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे या कासावाच्या पृष्ठभागावर तारे आणि कुबड्यासारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा विशेष आहे.
मुंबई : बारसू येथे रिफायनरी झाल्यास येथील कातळशिल्पांचे अस्तित्व धोक्यात येईल हा मुद्दा धरून रिफायनरीला मोठा विरोध केला होता. मात्र सरकारने यावर तोडगा काढल्याचे दिसत आहे. या रिफायनरीकातळशिल्पाच्या संवर्धनासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनातून बारसू येथील कातळशिल्पे असलेली जमीन वगळण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विलास पोतनीस आणि मनिषा कायंदे यांनी लेखी प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. त्यावरून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तर दिले आहे.
या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, “रत्नागिरी जिल्ह्यातील ७, सिंधुदुर्गातील १ आणि गोव्यातील ९ ठिकाणची कातळशिल्पे यूनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये बारसूच्या ३ कातळशिल्पांचाही समावेश आहे.”बारसू गावातील कातळशिल्पासह एकूण आठ ठिकाणची कातळशिल्पे ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे कातळशिल्पांच्या जतन आणि संवर्धनाची आशा निर्माण झाली. मात्र, आता प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे बारसूच्या सड्यावरील अनेक कातळशिल्पे धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, “रत्नागिरी जिल्ह्यातील ७, सिंधुदुर्गातील १ आणि गोव्यातील ९ ठिकाणची कातळशिल्पे यूनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये बारसूच्या ३ कातळशिल्पांचाही समावेश आहे.”
“पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाने बारसू येथील गावात केलेल्या आतापर्यंतच्या सर्वेक्षणात ६२ कातळशिल्पांची बारसूच्या सड्यावर नोंद केलेली आहे. त्यामुळे या कातळशिल्पाच्या संवर्धनासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनातून बारसू येथील कातळशिल्पे असलेली जमीन वगळण्यात येणार आहे”, अशी माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. म्हणजेच, कातळशिल्पे असलेली जमीन वगळून उर्वरित जागांचे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे.तसंच, रत्नागिरी जिल्ह्यातील १७ ठिकाणच्या कातळशिल्पांचे जतन, संवर्धनाचे काम निविदास्तरावर असल्याचीही माहिती, सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुंबई: कोकणात मूळ असलेले ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे आज २४ जुलै रोजी ठाणे येथे निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला होता. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना आपलीशी करतील अशी विविध पात्र त्यांनी साकारली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून, चाहते आणि मनोरंजन विश्वातील मंडळी या घटनेनंतर शोक व्यक्त करत आहेत.
०३ मे १९३६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये जन्मलेल्या सावरकरांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांनी अनेक वर्ष बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम पाहिले होते. सावरकर यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या, शिवाय त्यांनी ३० हून अधिक हिंदी सिनेमातही काम केले. सावरकर ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. याकरता त्यांची निवड बिनविरोध झाली होती. त्यांच्या अलीकडच्या काही दिवसांमधील कामाविषयी बोलायचे झाल्यास ते काही महिन्यांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी कांचन आजींच्या भावाची भूमिका साकारली. शिवाय ‘समांतर’ या स्वप्निल जोशीच्या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विषेश गाजली
कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे सावट असलेल्या भागातील नागरिकांना सतर्कतेच इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. रविवारी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत होती. पहाटे तीन वाजता ३९ फूट ही इशारा पातळी पंचगंगेने गाठली. जिल्ह्यातील पाण्याखालील एकूण बंधाऱ्यांची संख्या ८२ इतकी झाली आहे. पुराचे पाणी आल्यामुळे शिवाजी पूल – गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुतारवाडा, उलपे मळा, कसबा बावडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आरवली दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या दि. २५ जुलै २०२३ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळच्या ४ वाजेपर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या खालील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) दिनांक 24 जुलैला प्रवास सुरू होणारी कोईमतुर -जबलपूर 02197 ही विशेष गाडी मडगाव ते संगमेश्वर दरम्यान सुमारे अडीच तास थांबवून ठेवली जाईल.
2)दिनांक 25 रोजी प्रवास सुरू होणारी गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी रोड -दिवा एक्सप्रेस ही गाडी सावंतवाडी ते संगमेश्वर दरम्यान २ तास रोखून जाणार आहे.
3)दिनांक 25 रोजी प्रवास सुरू होणारी गाडी क्रमांक 10104 मडगाव -मुंबई सी एस एम टी मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान एक तास थांबवून ठेवली जाणार आहे.
Mumbai Pune Expressway Landslide |पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे डोंगरभागातून मातीचा लगदा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. सुदैवाने दरड कोसळली तेव्हा त्यामध्ये कोणतेही वाहन सापडले नाही. दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.