



कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता रिक्षा प्रवाशांना महानगरातील ‘ओला’, ‘उबेर’ प्रमाणेच प्रवासासाठी घरबसल्या रिक्षा बुकिंग करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने ‘येतंव’ हे प्रवासी रिक्षा अॅप विकसित करण्यात आले आहे. ‘येतंव’ अॅप रिक्षा चालक व प्रवाशांसाठी मोफत आहे.सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने व कणकवली तालुका व्यापारी संघाच्या समन्वयाने सोल्युशन प्रा.लि.यांच्या सहकार्याने हे अॅप विकसित केले आहे. कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते या अॅपचे रविवारी लोकार्पण झाले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, माजी जिल्हाध्यक्ष विजय वळंजू, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, रिक्षा संघटना कोकण विभागाचे अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष नागेश ओरोसकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, झॅपअॅप सोल्यूशन प्रा.लि. कंपनीचे सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे आदी उपस्थित होते.
ऱिक्षा चालकांनी असे वापरावे अॅप
रिक्षाचालकांनी या अॅपवर प्रथम लोकेशन टाकावे. यामुळे प्रवाशांना सर्च केल्यावर त्यांचे नाव व मोबाईल नंबर दिसणार आहेत. या अॅपद्वारे प्रवाशी रिक्षा कोठेही बोलवू शकतात. रेल्वे स्थानकावर थेट रिक्षाचालकांशी संपर्क साधता येणार आहे.
5300 जणांनी डाऊनलोड केले अॅप
गेल्या सव्वा महिन्यात 5300 जणांनी हे अॅप डाऊनलोड केले असून 220 रिक्षाचालकांनी नोंदणी केली आहे. पैकी रिक्षाचालकांना या अॅपवर 1914 कॉल आले आहेत.
‘येतंव’ कसे वापरावे
प्रवाशांनी हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर या अॅपच्या माध्यमातून त्यांना जवळच्या दोन कि.मी. परिसरातील रिक्षा किंवा चारचाकी गाडी हवी असल्यास त्याची उपलब्धता व संपर्क क्रमांक मिळू शकेल. यामध्ये भाडे ठरवण्याची पद्धत पूर्वीप्रमाणेच असून प्रवासी व रिक्षाचालक परस्पर संवादाद्वारे किंवा व्हॉटस् अॅप मॅसेजवरून भाडे निश्चित करू शकतात. त्यात अॅप कोणताही हस्तक्षेप करणार नाही. स्मार्ट फोन नसलेल्या रिक्षाचालक कोणत्याही फोनवरून महासंघाने दिलेल्या 9082408882 क्रमांकावर व्हॉटस् अॅपद्वारे नोंदणी करू शकतात.
हे अॅप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक