सावंतवाडी, दि. १० एप्रिल : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगप्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि गंजिफा कलेला केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जीआय मानांकन Geographical Indication (GI) दिले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला संरक्षण प्राप्त झाले असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला महत्व येणार आहे.
सावंतवाडीच्या राजघराण्याने हे मानांकन मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. लाकडी खेळणी आणि सावंतवाडी लॅकर्स वेअर संस्थेच्या गंजिफा कलेला सावंतवाडीच्या राजघराण्याने नेहमीच संरक्षण दिले आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या संदर्भात संस्थानचे बाळराजे आणि युवराज लखमराजे भोसले आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.
जी. आय. मानांकन म्हणजे काय?
हे एक मानांकन आहे. हे मानांकन त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. या मालाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच असतो.
जी. आय. मानांकन हे एखादी वस्तू/पदार्थ/उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवा व्दितीय असल्याची पावती आहे.थोडक्यात कुठल्याही वस्तूला जीआय मानांकन मिळण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष असतात. एक म्हणजे ती वस्तू एका विशिष्ट भौगोलिक भागात एका विशिष्ट पद्धतीने बनविली गेली असली पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्या वस्तूचा विशिष्ट दर्जा किंवा गुण हा ती त्या भागात बनल्यामुळे असला पाहिजे. तर आणि तरच त्या वस्तूला जी आय मानांकन दिला जातो. आणि जीआय हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे. विशेषत: शेतीमाल असेल तर (आंबे, द्राक्षे, चिकू, तांदूळ इ.) किंवा हाताने बनविली जाणारी वस्तू किंवा पदार्थ असेल तर (हातमागावर विणली जाणारी वस्त्रे, हाताने बनविली जाणारी खेळणी किंवा इतर वस्तू). कारण शेतात उगवणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात त्या त्या भागातली माती, हवामान, पर्जन्यमान यांसारख्या गोष्टींमुळे. तर हाताने बनविल्या जाणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात तिथल्या कारागिरांचा अनुभव, परंपरागत कौशल्ये, पिढीजात कला यांसारख्या गोष्टींमुळे. आणि म्हणूनच अशा काही गोष्टींबाबत त्या कुठे बनल्या हे फार महत्त्वाचे असते. आणि आपण कित्येकदा पाहतो की त्या जागेनुसार त्या वस्तूचा भाव आणि दर्जा ठरत असतो.