Author Archives: Kokanai Digital

धक्कादायक! मुंबई-गोवा महामार्गावर कासरडे येथे उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

   Follow us on        

कणकवली:मुंबई-गोवा महामार्गावरील कासरडे ठिठा येथे शनिवारी (९ मे २०२६) उड्डाणपुलाच्या मधल्या भागातील काँक्रीट स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे पुलाच्या बांधकामातील लोखंडी सळ्या (रॉड) उघड्या पडल्या असून, पुलाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली असून, प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे.

​विशेष म्हणजे, यापूर्वीही याच पुलाचा स्लॅब दोनदा कोसळल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार प्रमोद जठार यांनी तत्काळ महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

​मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच अशा प्रकारे उड्डाणपूल कमकुवत ठरत असल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या भागाची तातडीने दुरुस्ती करावी आणि वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी केली आहे.

Konkan Railway: ‘समर स्पेशल’ गाड्या पनवेल पर्यंतच का?

   Follow us on        

पनवेल:उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मडगाव ते पनवेल दरम्यान ‘समर स्पेशल’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांच्या फायद्याऐवजी डोकेदुखीचाच अधिक ठरल्याचा आरोप कोकणी चाकरमान्यांकडून केला जात आहे.

गाडी क्रमांक ०११०५ (पनवेल – मडगाव साप्ताहिक स्पेशल) या गाडीच्या वेळेवरून प्रवाशांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या गाड्यांपासून प्रवाशांना अपेक्षित दिलासा मिळाला नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

ही गाडी पनवेल स्थानकावरून पहाटे ०५:४५ वाजता सुटणार आहे. प्रवाशांच्या मते मुंबई आणि उपनगरातून इतक्या पहाटे पनवेल स्थानकावर पोहोचणे सामान्य प्रवाशांसाठी जवळपास अशक्य आहे. पहाटेच्या वेळी लोकल सेवांची उपलब्धता कमी असल्याने आणि टॅक्सी किंवा रिक्षाचा प्रवास खर्चिक असल्याने प्रवाशांना अशा गाड्यांचा लाभ घेणे कठीण जात आहे.

“कोकणी चाकरमान्यांना सवयीने पनवेल स्थानकापर्यंत मर्यादित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का?” असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

जर ही विशेष ट्रेन पनवेल ऐवजी दादर किंवा सीएसएमटी (CSMT) पर्यंत नेली असती, तर त्याचा फायदा मुंबईतील मुख्य भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झाला असता. तसेच, यामुळे सकाळच्या वेळी सुटणाऱ्या ‘मांडवी एक्सप्रेस’मधील प्रचंड गर्दी विभागण्यास मोठी मदत झाली असती. मात्र, गाडी केवळ पनवेलपर्यंतच मर्यादित ठेवल्यामुळे तिचा काहीच फायदा झाला नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

अलीकडे मध्य रेल्वे राज्यांतर्गत प्रवासी सेवेला दुय्यम स्थान देत असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

प्रशासनाने अशा ‘स्पेशल’ गाड्यांचे नियोजन करताना प्रवाशांच्या सोयीचा आणि कनेक्टिव्हिटीचा विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

 

विनातिकीट प्रवाशांना चाप: मुंबईत आता रात्रीही फिरणार ‘बॅटमॅन’ पथक

   Follow us on        

​मुंबई: मुंबईतील लोकल गाड्यांमधून रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आता धाबे दणाणले आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांविरुद्ध एक विशेष मोहीम उघडली असून, आता रात्रीच्या वेळीही ‘टीएसी’ (Ticket Checking) कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने हा कठोर पाऊल उचलले आहे.

​या विशेष मोहिमेअंतर्गत रात्री ९ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत चर्चगेट ते विरार दरम्यान लोकल गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली जाणार आहे. यासाठी ‘बॅटमॅन’ (Be Aware TTE Manning At Night) नावाची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके रात्रीच्या शेवटच्या लोकलपासून ते सकाळच्या पहिल्या लोकलपर्यंत डब्यांमध्ये गस्त घालतील. एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेने विक्रमी कारवाई करत ३ लाख ६० हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडले होते. या पार्श्वभूमीवर, तिकीट तपासणीची ही प्रक्रिया आता चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी रात्रीच्या वेळी तिकीट तपासणी होत नसल्याचा फायदा घेऊन विशेषतः एसी लोकलमध्येही विनातिकीट प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. दिवसा होणारी गर्दी पाहता तिकीट तपासणीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी रात्रीची स्वतंत्र पथके अधिक प्रभावी ठरतील. पश्चिम रेल्वेवर दररोज १४१४ फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात; या प्रवासादरम्यान शिस्त पाळली जावी आणि रेल्वेचा महसूल बुडू नये, यासाठी ही ‘बॅटमॅन’ टीम आता रात्रीच्या अंधारातही सक्रिय राहणार आहे.

रेल्वेच्या ‘विदेशी पर्यटक कोट्याचा’ गैरवापर; मध्य रेल्वेकडून मोठी कारवाई

   Follow us on        

​मुंबई: मध्य रेल्वेने विदेशी पर्यटक (FT) कोट्याचा गैरवापर करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसतानाही अनेक प्रवाशांनी या राखीव कोट्यातून प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे. ३१ गाड्यांमधील १७४ पीएनआर (PNR) तपासल्यानंतर रेल्वेने ३९ संशयास्पद बुकिंगवर कारवाई केली असून, सुमारे ३.५६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या प्रकरणामागे एजंटांचे संघटित जाळे असण्याची शक्यता असून रेल्वेने आता त्यादिशेने तपास सुरू केला आहे.

​ही बाब सर्वप्रथम ‘संघमित्रा एक्सप्रेस’मधील नियमित तिकीट तपासणीदरम्यान उघड झाली. विदेशी कोट्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे जेव्हा तपासणी पथकाने कागदपत्रांची मागणी केली, तेव्हा अनेक प्रवासी विदेशी पासपोर्ट किंवा वैध व्हिसा दाखवू शकले नाहीत. विदेशी पर्यटकांना रेल्वे प्रवासात प्राधान्य मिळावे यासाठी हा विशेष कोटा असतो, मात्र त्याचा वापर भारतीय प्रवाशांना कन्फर्म सीट मिळवून देण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले.

​या प्रकारानंतर रेल्वेने २४ एप्रिल ते ११ जून या कालावधीतील सर्व संशयास्पद बुकिंगची बारकाईने तपासणी केली. ज्या प्रवाशांकडे वैध कागदपत्रे नव्हती, त्यांना बर्थवरून उतरवण्यात आले आणि त्या जागा आरएसी (RAC) तसेच वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना देण्यात आल्या. या संपूर्ण गैरप्रकारात आयआरसीटीसी (IRCTC) कडून तांत्रिक माहिती मागवण्यात आली असून, अधिकृत एजंट किंवा मध्यस्थांचा यामध्ये सहभाग आहे का, याचा शोध रेल्वे सुरक्षा दल आणि वाणिज्य विभाग घेत आहे. आगामी काळात अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबवून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत

सातबारा उतारा बंद होणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने जमिनीच्या नोंदींबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील ज्या गावांचा समावेश नव्याने नगरपालिका किंवा महानगरपालिकांच्या हद्दीत झाला आहे, त्या भागांतील जमिनींसाठी आता ‘सातबारा उतारा’ (7/12 Extract) बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी, संबंधित जमिनींच्या मालकी हक्कासाठी आता ‘प्रॉपर्टी कार्ड’ (Property Card) म्हणजेच ‘मालमत्ता पत्रक’ उपलब्ध करून दिले जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले असून, लवकरच याचे अधिकृत आदेश जारी केले जाणार आहेत.

​ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होणाऱ्या गावांचे स्वरूप पूर्णपणे बदलते. शेती जमिनीचा वापर हळूहळू निवासी, व्यावसायिक किंवा नागरी कारणांसाठी होऊ लागतो. अशा परिस्थितीत, शहरी मालमत्ता व्यवस्थापनासाठी सातबारा उताऱ्यापेक्षा प्रॉपर्टी कार्ड हे अधिक कायदेशीर आणि सोयीचे मानले जाते. या निर्णयामुळे जमीन नोंदींमधील गुंतागुंत कमी होऊन कामकाजात सुसूत्रता आणि स्पष्टता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. भविष्यातील जमिनींचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

​या नवीन प्रणालीचा शेतकऱ्यांना आणि शहरी नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. प्रॉपर्टी कार्ड लागू झाल्यामुळे मालमत्तेचे हस्तांतरण करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होईल. तसेच, बँकांकडून कर्ज घेताना कागदपत्रांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर होतील. जमिनीच्या नोंदी अधिक अचूक आणि सुसंगत पद्धतीने ठेवल्या जाणार असल्याने, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. महापालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाला या निर्णयामुळे अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती; २४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

   Follow us on        

नवी मुंबई: रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने विविध विभागांमधील ज्युनिअर स्केल एक्झिक्युटिव्ह (गट-ब) पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे सिव्हिल इंजिनीअरिंग, मेडिकल, आयटी, आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन यांसारख्या विभागांत पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता:
भरती प्रक्रियेत खालील प्रमुख पदांचा समावेश आहे:

असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल)- १ जागा. पात्रता: किमान ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी आणि २०२३, २०२४ किंवा २०२५ चा वैध GATE स्कोअर आवश्यक.

असिस्टंट मेडिकल ऑफिसर: ३ जागा. पात्रता: MBBS पदवी आणि राज्य वैद्यकीय परिषदेची नोंदणी.

 

असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर (ऑपरेटिंग आणि कमर्शियल): ४ जागा. पात्रता: पदवी आणि किमान ६०% गुणांसह MBA/MMS. उमेदवाराकडे २०२३ नंतरचा किमान ८० पर्सेंटाईल असलेला CAT स्कोअर असणे आवश्यक आहे.

 

इतर पदे: यामध्ये असिस्टंट मॅनेजर (IT), असिस्टंट मेकॅनिकल इंजिनीअर, असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनीअर, असिस्टंट सिग्नल आणि टेलिकॉम इंजिनीअर, असिस्टंट फायनान्शिअल ॲडव्हायझर, असिस्टंट पर्सनल ऑफिसर आणि असिस्टंट डेप्युटी जनरल मॅनेजर या पदांचा समावेश आहे

इतर अटी

  • उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे.
  • SC उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि OBC-NCL उमेदवारांसाठी ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
  • कोकण रेल्वेच्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी उच्च वयोमर्यादेत ४५ वर्षांपर्यंत (प्रवर्गानुसार अधिक) सवलत आहे.

निवड प्रक्रिया

AMO आणि AFA पदांसाठी:: लेखी परीक्षा (७०% वेटेज), सादरीकरण (१०%) आणि वैयक्तिक मुलाखत (२०%).
इतर पदांसाठी: GATE किंवा CAT स्कोअरला ५०% वेटेज दिले जाईल, तर सादरीकरण आणि मुलाखतीला प्रत्येकी २५% वेटेज असेल.
उमेदवारांना सादरीकरण आणि मुलाखतीत किमान ६०% गुण मिळवणे अनिवार्य आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ मे २०२६, संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत.

अर्ज पद्धती: उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज (Annexure-A) सर्व आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाने पाठवायचा आहे.

अर्ज जमा करण्याचा पत्ता: सिनियर पर्सनल ऑफिसर/भरती आणि स्थापना, ४ था मजला, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, बेलापूर भवन, प्लॉट नं. ६, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.

अर्ज शुल्क: ५९० रुपये (GST सह). SC, ST, महिला आणि अल्पसंख्याक उमेदवारांना प्रक्रियेनंतर ५०० रुपये शुल्क परत केले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी कोकण रेल्वेच्या **www.konkanrailway.com** या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1Ik6Ckdp_ylzK5KCK2J1VzVhUxKdy0Hkl/view?usp=drive_link

कणकवलीत भीषण कार अपघात; एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू, दोन गंभीर जखमी

   Follow us on        

कणकवली: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारचा आज, ९ मे रोजी सकाळी साडेऊ नऊ वाजता नांदगाव ओटव पुलावर (ब्रिजवर) भीषण अपघात झाला. ही कार वेगात असताना अचानक दुभाजकाला (डिव्हायडरला) जोरात धडकली. या भीषण धडकेत कारच्या मागील सीटवर बसलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

​या अपघातात कार चालकासह पुढच्या सीटवर बसलेली मुलगी देखील गंभीररीत्या जखमी झाली आहे. मुलगी कारमध्ये अडकून पडली होती, तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत

प्रस्तावित मुंबई-पुणे-हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाची प्राथमिक आखणी निश्चित

   Follow us on        

नवी दिल्ली: रेल्वे मंत्रालयाने मुंबई-पुणे-हैद्राबाद या प्रस्तावित हायस्पीड रेल्वेची (बुलेट ट्रेन) प्राथमिक आखणी निश्चित केली असून, हा मार्ग पुणे शहराच्या मुख्य भागातून न जाता शहराच्या बाहेरून पुढे नेण्याचे प्रस्तावित केले आहे. या नवीन आराखड्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवाशांसाठी शहराच्या बाह्य भागात स्थानके उभारली जाणार आहेत, ज्यामुळे शहरी भागातील गर्दी टाळून वेगवान प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.

​पुणे जिल्ह्यातील स्थानकांचा विचार करता, मुंबईहून पुण्याकडे येताना पहिले स्थानक लोणावळ्याजवळील मळवली आणि कामशेत दरम्यान असेल. त्यानंतरचे स्थानक पिंपरी-चिंचवडसाठी कुरुळी येथे नियोजित असून, पुण्याचे मुख्य स्थानक लोणी काळभोर आणि मांजरी बुद्रुक यांच्या दरम्यान प्रस्तावित करण्यात आले आहे. ही सर्व स्थानके मुख्य शहरापासून दूर असली, तरी तेथून शहरात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र कनेक्टिव्हिटीची व्यवस्था करावी लागणार आहे.

​या हायस्पीड रेल्वेमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी क्रांती होणार असून मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. तसेच पुणे ते हैदराबाद हे मोठे अंतर पार करण्यासाठी केवळ १ तास ५५ मिनिटे लागणार आहेत. वेगाच्या या मर्यादेमुळे रस्ते मार्गावरील ताण कमी होऊन आंतरराज्य प्रवासाला मोठी गती मिळणार आहे.

​पुणे स्थानकानंतर हा मार्ग शिंदवणेमार्गे बारामतीकडे वळणार असून बारामती शहराबाहेर त्याचे स्थानक असेल. पुढे हा मार्ग पंढरपूर आणि सोलापूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे. जरी ही स्थानके शहराच्या मूळ ठिकाणापासून काही किलोमीटर दूर असली, तरी या प्रकल्पामुळे सोलापूर आणि पंढरपूर सारख्या शहरांच्या परिसराचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे.

​सध्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे काम सुरू असतानाच केंद्र सरकारने सात नवीन हायस्पीड मार्ग जाहीर केले असून त्यात महाराष्ट्रातील या दोन मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रथमच या मार्गांची आखणी ‘रेल्वे ॲटलास’मध्ये दर्शविली आहे. या संपूर्ण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाल्यावरच स्थानकांची निश्चिती आणि जमिनीचे आरक्षण यांसारख्या तांत्रिक बाबी अधिक स्पष्ट होणार आहेत.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मडगाव – पनवेल दरम्यान धावणार ‘समर स्पेशल’ ट्रेन

   Follow us on        

रत्नागिरी:उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव आणि पनवेल दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग:

​गाडी क्र. ०११०६ (मडगाव – पनवेल साप्ताहिक स्पेशल): ही गाडी रविवार, १० मे २०२६ रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता पनवेलला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११०५ (पनवेल – मडगाव साप्ताहिक स्पेशल): ही गाडी सोमवार, ११ मे २०२६ रोजी पनवेल येथून पहाटे ०५:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

​गाडीचे थांबे:

​ही ट्रेन प्रवासात करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबेल.

​डब्यांची रचना (Composition):

​या विशेष ट्रेनमध्ये एकूण २३ डबे असतील, ज्यात खालीलप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे:

​AC 3 Tier: ०३ डबे

​Sleeper (शयनयान): ११ डबे

​General (सामान्य): ०७ डबे

​SLR: ०२ डबे

​प्रवाशांना अधिक माहितीसाठी आणि वेळपत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे किंवा ‘KR Mirror’ ॲप वापरण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ठाणे आणि मुलुंड स्थानकावरील गर्दी कमी होणार; प्रस्तावित रेल्वे स्थानकाला मंजुरी

   Follow us on        

ठाणे: मुंबईकरांच्या आणि विशेषतः ठाणेकरांच्या प्रवासातील कोंडी फोडण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशन उभारण्यास ‘इन-प्रिन्सिपल’ (तत्वतः) मंजुरी दिली आहे. २०१९ मध्ये संकल्पित करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्थान ठाणे मानसिक रुग्णालयाजवळील कोपरी बाजूच्या परिसरात प्रस्तावित आहे. या नवीन स्टेशनमुळे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या ठाणे स्टेशनवरील प्रवासी भार ३१ टक्क्यांनी, तर मुलुंड स्टेशनवरील भार २४ टक्क्यांनी कमी होण्याची दाट शक्यता आहे. केवळ गर्दीचे विभाजनच नाही, तर या प्रकल्पामुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गांचे विलगीकरण करणे अधिक सुलभ होणार असून, संपूर्ण मुंबई रेल्वे वाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा होणार आहे.

​या प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनासाठी ठाणे स्मार्ट सिटी आणि ठाणे महानगरपालिका (टीएमसी) यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी भारतीय रेल्वे पार पाडणार आहे. दरम्यान, या निर्णयावर स्थानिक प्रवाशांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला मोठ्या वर्गाकडून गर्दी कमी होण्याच्या शक्यतेमुळे या निर्णयाचे स्वागत होत असताना, दुसऱ्या बाजूला दोन स्टेशनमधील अंतर कमी असल्याने लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावर आणि वेगावर विपरीत परिणाम होईल का, अशी भीती काही प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. तरीही, वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे स्टेशन भविष्यात मध्य रेल्वेचा कणा ठरेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search