Konkan Railway: ‘समर स्पेशल’ गाड्या पनवेल पर्यंतच का?

   Follow us on        

पनवेल:उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मडगाव ते पनवेल दरम्यान ‘समर स्पेशल’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांच्या फायद्याऐवजी डोकेदुखीचाच अधिक ठरल्याचा आरोप कोकणी चाकरमान्यांकडून केला जात आहे.

गाडी क्रमांक ०११०५ (पनवेल – मडगाव साप्ताहिक स्पेशल) या गाडीच्या वेळेवरून प्रवाशांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या गाड्यांपासून प्रवाशांना अपेक्षित दिलासा मिळाला नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

ही गाडी पनवेल स्थानकावरून पहाटे ०५:४५ वाजता सुटणार आहे. प्रवाशांच्या मते मुंबई आणि उपनगरातून इतक्या पहाटे पनवेल स्थानकावर पोहोचणे सामान्य प्रवाशांसाठी जवळपास अशक्य आहे. पहाटेच्या वेळी लोकल सेवांची उपलब्धता कमी असल्याने आणि टॅक्सी किंवा रिक्षाचा प्रवास खर्चिक असल्याने प्रवाशांना अशा गाड्यांचा लाभ घेणे कठीण जात आहे.

“कोकणी चाकरमान्यांना सवयीने पनवेल स्थानकापर्यंत मर्यादित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का?” असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

जर ही विशेष ट्रेन पनवेल ऐवजी दादर किंवा सीएसएमटी (CSMT) पर्यंत नेली असती, तर त्याचा फायदा मुंबईतील मुख्य भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झाला असता. तसेच, यामुळे सकाळच्या वेळी सुटणाऱ्या ‘मांडवी एक्सप्रेस’मधील प्रचंड गर्दी विभागण्यास मोठी मदत झाली असती. मात्र, गाडी केवळ पनवेलपर्यंतच मर्यादित ठेवल्यामुळे तिचा काहीच फायदा झाला नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

अलीकडे मध्य रेल्वे राज्यांतर्गत प्रवासी सेवेला दुय्यम स्थान देत असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

प्रशासनाने अशा ‘स्पेशल’ गाड्यांचे नियोजन करताना प्रवाशांच्या सोयीचा आणि कनेक्टिव्हिटीचा विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search