रेल्वेच्या ‘विदेशी पर्यटक कोट्याचा’ गैरवापर; मध्य रेल्वेकडून मोठी कारवाई

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेने विदेशी पर्यटक (FT) कोट्याचा गैरवापर करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसतानाही अनेक प्रवाशांनी या राखीव कोट्यातून प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे. ३१ गाड्यांमधील १७४ पीएनआर (PNR) तपासल्यानंतर रेल्वेने ३९ संशयास्पद बुकिंगवर कारवाई केली असून, सुमारे ३.५६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या प्रकरणामागे एजंटांचे संघटित जाळे असण्याची शक्यता असून रेल्वेने आता त्यादिशेने तपास सुरू केला आहे.

​ही बाब सर्वप्रथम ‘संघमित्रा एक्सप्रेस’मधील नियमित तिकीट तपासणीदरम्यान उघड झाली. विदेशी कोट्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे जेव्हा तपासणी पथकाने कागदपत्रांची मागणी केली, तेव्हा अनेक प्रवासी विदेशी पासपोर्ट किंवा वैध व्हिसा दाखवू शकले नाहीत. विदेशी पर्यटकांना रेल्वे प्रवासात प्राधान्य मिळावे यासाठी हा विशेष कोटा असतो, मात्र त्याचा वापर भारतीय प्रवाशांना कन्फर्म सीट मिळवून देण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले.

​या प्रकारानंतर रेल्वेने २४ एप्रिल ते ११ जून या कालावधीतील सर्व संशयास्पद बुकिंगची बारकाईने तपासणी केली. ज्या प्रवाशांकडे वैध कागदपत्रे नव्हती, त्यांना बर्थवरून उतरवण्यात आले आणि त्या जागा आरएसी (RAC) तसेच वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना देण्यात आल्या. या संपूर्ण गैरप्रकारात आयआरसीटीसी (IRCTC) कडून तांत्रिक माहिती मागवण्यात आली असून, अधिकृत एजंट किंवा मध्यस्थांचा यामध्ये सहभाग आहे का, याचा शोध रेल्वे सुरक्षा दल आणि वाणिज्य विभाग घेत आहे. आगामी काळात अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबवून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search