Author Archives: Kokanai Digital

… अन्यथा वंदे भारत एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकाच्या पुढे जाऊ देणार नाही; चाकरमान्यांचा रेल्वेला इशारा

कोकण रेल्वेवरील प्रलंबीत मागण्यांसाठी एकवटले चाकरमनी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मुंबईत नवीन कार्यकारणी जाहीर

मुंबई : गेली २५ वर्षे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या अनेक मागण्यांमध्ये प्रामूख्याने सावंतवाडीला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला प्रा.मधू दंडवते यांचे नाव देणे,कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करणे,वसई सावंतवाडी पॅसेंजर व कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे,कोकण रेल्वे वरील गर्दी कमी करण्यासाठी दादर चिपळूण मेमू रेल्वे नेहमीसाठी सुरू करणे,मुंबई रत्नागिरी इंटरसिटी एक्स.सुरू करणे, तर सर्व सुपर फास्ट एक्सप्रेस पुणे मिरज मार्गे मडगावल्या वळवाव्यात अन्यथा त्यांचे रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे जास्तीचे थांबे दयावेत,आणि कोकणातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रेल्वेचे थांबे वाढवावे ह्या मागण्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही त्या मिळत नसल्याने मुंबई,नवी मुंबई,लालबाग परळ,बोरीवली,वसई विरार,डहाणू,ठाणे,कल्याण, डोबींवली,बदलापूर,सावंतवाडी,लांजा,चिपळूण येथील कोकण रेल्वेवर काम करणाऱ्या २२ प्रवासी संघटना / संस्था एकवटल्या असून त्यांनी परळ मुंबई येथे एल्गार सभेचे आयोजन करून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई ची स्थापना केली.

 

नवीन कार्यकारिणी :

नवीन कार्यकारणीत अध्यक्ष : श्री.शांताराम नाईक, प्रमूख कार्यवाहक :श्री.राजू कांबळे,उपाध्यक्ष : श्री. तानाजी परब, उपाध्यक्ष : श्री.दिपक चव्हाण,उपाध्यक्ष : श्री.अक्षय महापदी, सचिव : श्री.यशवंत जड्यार,सहसचिव : श्री.दर्शन कासले,कोषाध्यक्ष : श्री.मिहीर मठकर,उपकोषाध्यक्ष : श्री.राजाराम कुंडेकर,उपकोषाध्यक्ष : श्री.नितीन जाधव,अं. हि. त. : श्री.समीर भोंगे,अं. हि. त. : श्री.मनीष दाभोळकर,सल्लागार : श्री.सुनील उत्तेकर,सल्लागार : श्री.सुभाष लाड,सल्लागार : श्री.श्रीकांत सावंत,सल्लागार : श्री.सुरेद्र नेमळेकर,सल्लागार : श्री.परेश गुरव,कायदेविषयक सल्लागार : ॲड. श्री.संजय गांगनाईक,कायदेविषयक सल्लागार : अँड.श्री.नंदन वेंगुर्लेकर,कायदेविषयक सल्लागार : अँड.सौ.योगिता सावंत, संपर्क प्रमुख : श्री.सागर तळवडेकर,सहसंपर्क प्रमुख : श्री.अभिषेक शिंदे,कार्यकारणी सदस्य : श्री.मिलिंद रावराणे,कार्यकारणी सदस्य : श्री. रमेश सावंत,कार्यकारणी सदस्य : सौ.संगिता पालव यांची नियुक्ती करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात श्री.शांताराम नाईक यांनी आवाहन केले की वरील आमच्या प्रमूख मागण्यापैकी किमान ५ मागण्या २६ जाने.२०२४ पर्यंत कोकण रेल्वे प्रशासनाने मान्य कराव्यात अन्यथा कोकण रेल्वेवर रेलरोको करून वंदे भारत एक्सप्रेस सावंतवाडीच्या पुढे जाऊ देणार नाही असे सांगितले.तर सभेचे सुत्रसंचलन श्री.राजू कांबळे व श्री.यशवंत जडयार यांनी केले.

Loading

महत्वाचे: ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण उद्यापासून सुरु

Konkan Railway News: ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी पनवेल ते मडगाव दरम्यान चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षणाची तारीख रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०१४२८ मडगाव जंक्शन – पनवेल विशेष आणि गाडी क्रमांक ०१४३० मडगाव जं. – पनवेल स्पेशल या गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक  १७/१२/२०२३  रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर सकाळी ८ वाजल्यापासून चालू होणार आहे.
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.

Loading

वर्ष संपत आले तरी महामार्ग पूर्ण होण्याची चिन्हे दिसेनात; जनआक्रोश समितीतर्फे साखळी उपोषण सुरू

पेण: मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु असून १२ वर्षे उलटूनही पनवेल ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी (गोवा सीमा) मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. याबाबत अनेक वर्षे अनेक आंदोलने झाली. माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली. परंतु काम पूर्ण झाले नाही. गणेशोत्सव काळात कामाला गती देण्यात आली होती. त्यामुळे या महिन्यात सदर काम पूर्ण होईल अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, गणेशोत्सवानंतर कामाची गती मंदावली असून डिसेंबर अखेरीस काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

याच मुद्द्यावर कोंकण विकास समितीच्या शिष्टमंडळाने आपली टिप टॉप प्लाझा, ठाणे येथे भेट घेऊन निवेदन दिले होते. आपण त्याच वेळी संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर, स्थानिक नागरिक, शेतकरी व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे दि. १२ डिसेंबर, २०२३ पासून रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पांडापूर, कासू येथे साखळी उपोषण सुरु आहे. त्याची उच्चस्तरीय दखल घेतली असल्याचे दिसत नाही.

तरी, आपण यात लक्ष घालून आपण स्वतः संबंधित मंत्री, वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत सदर ठिकाणी भेट देऊन मागण्यांची नोंद घ्यावी व संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी विनंती जनआक्रोश समितीतर्फे करण्यात आली आहे.

Loading

Konkan Railway | ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी मडगाव ते पनवेल दरम्यान विशेष गाड्या

Konkan Railway News: प्रवाशांसाठी खुशखबर ! ख्रिसमस / नवीन वर्षात गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मडगाव जंक्शन ते पनवेल दरम्यान अजून काही  विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
१) गाडी क्रमांक 01428/01427 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. विशेष:
गाडी क्रमांक 01428  मडगाव जं. – पनवेल विशेष
ही गाडी मडगाव जंक्शन येथून दिनांक 22/12/2023, 23/12/2023, 24/12/2023, 29/12/2023, 30/12/2023 आणि 31/12/2023 रोजी सकाळी 08:00 वाजता सुटून ट्रेन त्याच दिवशी रात्री 20:15 वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01427  पनवेल – मडगाव जं. विशेष
ही गाडी पनवेल येथून दिनांक 22/12/2023, 23/12/2023, 24/12/2023, 29/12/2023, 30/12/2023 आणि 31/12/2023 रोजी रात्री 21:10 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी मडगाव स्थानकावर सकाळी 06:50 वाजता पोहोचेल.
या गाड्या करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा स्थानकांवर थांबतील.
रचना : एकूण 22 एलएचबी कोच : इकॉनॉमी थ्री टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 04 कोच, जनरल – 10 कोच, एसएलआर – 02.
२) गाडी क्रमांक 01430/01429 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. विशेष:
गाडी क्रमांक 01430 मडगाव जं. – पनवेल विशेष 
ही गाडी  मडगाव जंक्शन येथून दिनांक 01/01/2024 रोजी रात्री 21:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 07:20 वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01429 पनवेल – मडगाव जं. विशेष 
ही गाडी येथून दिनांक 02/01/2023 रोजी सकाळी 08:20 वाजता पनवेल येथून  सुटेल ती  मडगाव जंक्शनला त्याच दिवशी रात्री रात्री 21:30 वाजता पोहोचेल.
या गाड्या करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा स्थानकांवर थांबतील.
रचना :एकूण 22 एलएचबी कोच : इकॉनॉमी थ्री टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 04 कोच, जनरल – 10 कोच, एसएलआर – 02.

Loading

आता गाव खेड्यात सुद्धा मिळणार गारेगार प्रवासाचा अनुभव; ९ मीटरची वातानुकूलित मिडी बस लवकरच एसटीच्या ताफ्यात…

MSRTC News: पूर्वी एसटी म्हंटले की डोळ्यासमोर नकारात्मक चित्र उभे राहायचे. जुनी बस, निखळलेली आसने Seats, काचा फुटलेल्या किंवा धुळीने माखलेल्या खिडक्या गळणारे छत आणि चालताना होणारा कर्णकर्कश आवाज. मात्र आता एसटी आपली ओळख बदलताना दिसत आहे. एसटीच्या ताफ्यात आता वातानुकूलित आणि आरामदायक बस दाखल होत आहेत. मात्र या बसेस लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी चालविण्यात येत होत्या. आता एसटीने एक पाउल पुढे टाकले आहे. आता अशा बसेस ग्रामीण भागात पण चालविण्याचा विचार एसटी प्रशासनाने केला आहे.
एसटीने या करिता ५१५० ई – बसेस साठी मोठे टेंडर काढले आणि हे संपूर्ण टेंडर ओलेक्टरा (ईव्ही ट्रान्स) या कंपनीस देण्यात आले आहे. एकूण ५१५० बसेस असलेल्या या श्रेणीत ९ मीटर लांबीच्या २३५० बसेस आणि १२ मीटर लांबीच्या २८०० बसेस, एसटी महामंडळ आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार असून, याबसेसच्या माध्यमातून एसटी एक वेगळी श्रेणी निर्माण करत असल्याचे समजते.
मध्यम लांब पल्ला, शहरी तसेच ग्रामीण भागात या बसेसचे प्रामुख्याने मार्गक्रमण करण्याचे एसटीचे प्रयोजन असून, ३५ + १ (चालक) इतकी (नॉन पुशबॅक) आसन क्षमता असलेली’ओर्डीनरी एसी बस’ अशी एक वेगळी श्रेणी एसटी नव्याने आणू इच्छिते हे बसवरील नव्या रंगसंगतीवरून समजत आहे.सध्या या बसेस ठाण्यात आल्या असून, ट्रायल आणि पासिंग झाल्यावर आपल्या इच्छित मार्गावर लवकर सुरू होतील, अशी आशा आहे.

Loading

कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे दोन डबे घसरले; वाहतूक विस्कळीत

ठाणे : मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ एका पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरून अपघात झाला आहे.  ही घटना आज रविवार, 10 डिसेंबर संध्याकाळी 6:31 च्या सुमारास घडली आहे. 
“कल्याण स्टेशन रोड एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) आणि इगतपुरी स्टेशन रेल्वे एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) मागवण्यात आले आणि अपघातस्थळी हलवण्यात आले,” असे मध्य रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले. अधिक माहितीची प्रतीक्षा करण्यात येत आहे.  

Loading

Video: रानडुकरांच्या शिकारीचा विडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट करणे पडले महागात; ५ जणांना अटक, सावंतवाडी वन विभागाची कारवाई

सावंतवाडी : रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांची निर्दयपणे शिकार करून त्याचा मांसाची तस्करी करणे तसेच इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या रोहित कोळी नामक युवकाला सावंतवाडी वन विभागाने सांगली मधून ताब्यात घेतले.
रानडुक्कर तसेच साळींदर यांची शिकार करून व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी रोहित कोळी याला अटक करण्यासाठी त्याचा माग काढत सावंतवाडी वन विभागाची टीम याबाबत कसून तपास करत होती. या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदरचा युवक हा सांगली येथील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी वन विभागाची टीम रवाना झाली. यानुसार फिरते पथक सांगली यांना सोबत घेऊन सापळा रचण्यात आला व त्यानुसार सोलापूर-सांगली हायवेवर रोहित कोळी व इतर ५ संशयितांना १० जिवंत रानडुकरांसह संयुक्त कारवाई करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदरच्या कारवाई मुळे जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
सदरची कारवाई ही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर(प्रा.) श्री.आर. एम. रामनुजम, उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, फिरतेपथक सांगली वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, महादेव गेजगे, प्रकाश रानगिरे, वाहनचालक रामदास जंगले तसेच मेळघाट सायबर सेलचे वनरक्षक आकाश सारडा यांच्या पथकाद्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

 

Loading

२५ डिसेंबर पासून मुंबई ते कोकण प्रवास जलद; ‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबई: मुंबईकर कोंकणवासियांसाठी  एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा बहुप्रतिक्षित आणि प्रतिष्ठित प्रकल्प ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ 25 डिसेंबर रोजी जनतेसाठी खुला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र एमएमआरडीएकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
MTHL ब्रिज मुंबई ते नवी मुंबई जोडणारा महत्त्वाचा मार्ग असणार आहे. हा मार्ग सुरू होण्याची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना आहे. मात्र आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) पूल लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. डिसेंबरमध्ये एमटीएचएल पुलाचे उद्घाटन होणार असून 25 डिसेंबरपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ या पुलाचे नाव ‘अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावा शेवा अटल सेतू’ ठेवण्यात आले आहे. या पुलामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे 96 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
‘ओपन रोड टोलिंग’ सिस्टिम
मुंबईतील हा MTHL ब्रिज देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. तसेच हा देशातील पहिला पूल असेल ज्यावर ‘ओपन रोड टोलिंग’ (ओआरटी) प्रणाली सुविधा उपलब्ध असेल. या प्रणालीचा उद्देश टोल वसुली प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि वाहतूक सुरळीत आणि सुलभ करणे हा आहे. खुल्या टोल पद्धतीमुळे वाहनांना टोल भरण्यासाठी पुलावर थांबावे लागणार नाही.
शिवडी-चिर्ले अंतर 15-20 मिनिटांत
18 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 6 पदरी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिजची एकूण लांबी 22.8 किलोमीटर आहे. यातील 16 किलोमीटर पूल हा समुद्रात आहे. पूल खुला झाल्यानंतर शिवडीपासून नवी मुंबईतील चिर्लेपर्यंत 15 ते 20 मिनिटांत पोहोचता येईल.
मुंबईचा प्रतिष्ठित प्रकल्प ‘MTHL’, मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा, 25 डिसेंबर रोजी लोकांसाठी खुला होणार आहे,” असे ट्विट भाजप नेते वरुण सोनी यांनी केले आहे. तथापि, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या एजन्सीने अद्याप उद्घाटनाच्या तारखेची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
वाशी पुलावरून प्रवाशांना नवी मुंबईत पोहोचण्यासाठी सध्या एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो. अनेकवेळा ट्रॅफिक जॅम मुळे दोन ते अडीच तासही लागतात, हा मार्ग सुरु झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदराशी कनेक्टिव्हिटी वाढून प्रवास जलद होणार आहे.

 

Loading

शेती: कोकणात होणार सुपारी संशोधन केंद्र

कोकणातील रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पाच एकर जागेत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली आहे. यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड येथे या केंद्रासाठी पाठपुरावा केला होता.
रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती  पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आग्रही होते.
या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Loading

०९ डिसेंबर देवगड दुर्घटना: जबाबदार कोण? बेलगाम तरुणाई, निष्काळजीपणा की अपुरी सुरक्षा व्यवस्था ?

देवगड :काल दिनांक ०९ डिसेंबर रोजी देवगड पर्यटनासाठी पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल आली असताना या समुद्रात गेलेल्या चार विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची आणि एकजण बेपत्ता झाल्याची  दुर्घटना घडली.
अशा घटना घडल्या कि पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे त्या जागेवरील सुरक्षाव्यवस्था. साहजिकच सर्व स्तरावरून अशा येथील प्रशासनास जबाबदार धरले जाते आणि येथून प्रशासन सुरक्षा देण्यास कुठे कुठे कमी पडले त्यावर सर्वच माध्यमावर चर्चा सुरु होते. येथेही काही त्रुटी आढळून आल्यात.
देवगड नगरपंचायतीतर्फे जीव रक्षकांना पगार दिला जातो एवढा खर्च करू नाही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम नाही आहे. देवगड किनारपट्टीवर एक जीव रक्षक यापूर्वीच नोकरी सोडून गेला त्या ठिकाणी दुसऱ्याची नेमणूक अद्यापही करण्यात आलेली नाही. या ठिकाणी नगरपंचायतीचा एक सफाई कर्मचारीही उपस्थित असतो मात्र तोही या दुर्घटनेच्या वेळी नव्हता तो कोठे होता? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. हजारो लाखो रुपये खर्च करून आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालीम करण्यात येतात मात्र आपत्ती आल्यावर ही रंगीत तालीम काहीच उपयोगाची नसते याचा प्रत्यय आजच्या घटनेवरून आला व्यक्ती बुडाल्यावर पोलीस हजर झाले व देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गाने बुडालेल्या  व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले सागरी पोलिसांची एकच नौका देवगड समुद्रात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत होती देवगड मधील मच्छिमार, ग्रामस्थ यांनीच आपत्ती व्यवस्थापन राबवले. पोलीस व देवगड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वगळून कुठल्याही खात्याचे लोक आपत्ती व्यवस्थापनासाठी फिरकले नाहीत
सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आहेत, त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा घटना घडल्यास हानी होता नये.  पण पूर्णपणे अशा घटनेस प्रशासनास जबाबदार धरणे योग्य ठरेल का? मुले जवळपास असली कि पालकवर्ग मुलांकडे लक्ष ठेवून असतो.  तेच पालक मुलांना सहलीसाठी किंवा एका अभ्यास दौऱ्यासाठी शाळेतर्फे किंवा एखाद्या अकॅडेमी तर्फे पाठवत असतात आणि तीच जबाबदारी त्या संस्थेला वर्ग pass करतो. त्यांच्यावर विश्वास ठेवतो.
मात्र कालच्या घटनेत संस्थेतर्फे निष्काळजीपणाचे दर्शन झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही सैनिक अकॅडमी आहे, जेथे शिस्तीला मोठे स्थान आहे. संस्थेच्या शिक्षकांनी सहलीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या नाही होत्या का? विध्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे शिक्षकांची संख्या कमी होती का? त्यांचा विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कृतींवर पुरेसा लक्ष नाही होता का?  या घटनेवरून विद्यार्थी बेलगाम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अकॅडमीच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search