Author Archives: Kokanai Digital




Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेनचे कोचही वाढण्यास सुरुवात केली असून काल ९ ऑगस्ट रोजी देशात पहिल्यांदाच २० डबे असलेली वंदे भारत ट्रेन धावली. अहमदाबाद येथून आज सकाळी ७ वाजता या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान २० कोच असलेल्या पहिल्या वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन सुरू झाली आहे.
२० कोच असलेली पहिली वंदे भारत ट्रेन ताशी १३० किलोमीटर वेगाने चालवली जात आहेआत्तापर्यंत देशातील मोठ्या शहरांमध्ये १६ कोच आणि लहान शहरांमध्ये ८ कोच असलेली धावते. आतापर्यंत अहमदाबाद ते मुंबई दरम्यान प्रत्येकी १६ कोचच्या दोन वंदे भारत ट्रेन धावत होत्या. मात्र, आजपासून अहमदाबाद ते मुंबई दरम्यान २० कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनची ट्रायल सुरू झाली आहे. वंदे भारत ट्रेनच्या या चाचण्या यशस्वी झाल्या तर कालांतराने लोकांना २० कोच असलेल्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा लाभ मिळणार आहे. सध्याच्या १६ कोचच्या ट्रेनमध्ये ११२८ प्रवासी असतात, ज्यामध्ये प्रत्येकी ५२ सीट आहेत. नवीन २० कोचच्या ट्रेनची क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे अधिक प्रवासी एकत्र प्रवास करू शकतील.याशिवाय वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवणे हा देखील या चाचणीचा उद्देश होता , सध्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी १२०-१३० किमी आहे, तो ताशी १६० किमीपर्यंत वाढवण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता कोकण रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाने यासाठी ९१ लाख ७० हजारांचा निधी मंजूर केला असून १५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती करण्यात येणार आहे. शासनाच्या गृह विभागाने याबाबतचा अद्यादेश शुक्रवारी जारी केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीच्या प्रमाणाला आळा बसणार आहे.
कोकणातील रोहा, कणकवली आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी लोहमार्ग पोलीस ठाणी प्रस्तावित होती त्यापैकी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी रेल्वे सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील स्थानके, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अखत्यारित आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द सीएसएमटी ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकीहिलपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. याहद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडीत कोकण रेल्वे स्थानकांदरम्यान एखादा गुन्हा घडल्यानंतरही त्याबाबतची तक्रार प्रवासी मुंबईत आल्यानंतर करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून कारवाई करावी लागते. आपल्या हद्दीतील स्थानके, तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” भूमिपूजन होवूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले त्याला” सावंतवाडी रोड ” असा फलक लावण्यात आला आहे त्याला सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष निवेदनाद्वारे वेधले आहे.
सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,सागर तळवडेकर आदींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक,सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आदींचे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात म्हटले आहे,सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन दि.२७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते तर पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” नावाची भूमिपूजन कोनशिला आवारात बसविण्यात आली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले. तेथे “सावंतवाडी रोड” अशा स्वरूपाचा सुशोभीकरणानंतर फलक लावण्यात आलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे बाह्य सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटन या आठवड्यात अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानक परिसरात नाव फलक लावण्यात आला आहे त्यावर “सावंतवाडी रोड” असा उल्लेख करण्यात आला आहे, जो काही अंशी चुकीचा आहे, कारण त्या ठिकाणी टर्मिनस चे उद्घाटन झालेले आहे आणि कोकण रेल्वेच्या दफ्तरी देखील सावंतवाडी टर्मिनस असा उल्लेख कागदोपत्री करण्यात येत असल्याचे निर्दशनास आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे नामकरण हे कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. प्रा. मधु दंडवते यांचा नावे करावे, अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे, त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.सावंतवाडी रेल्वे टर्मिनस दर्जा ची कामे व्हावीत. तसेच अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा,पाणी भरण्याची सुविधा आणि इतर प्रवासी सुविधांची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र निवेदन दिली आहेत. तसेच आंदोलन छेडले, जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केली आहे. यासाठी यापुढेही आंदोलने छेडण्यात येणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वारावरील त्या फलकावरील नावाची दुरुस्ती करून ‘सावंतवाडी टर्मिनस’ असे न केल्यास ‘घंटानाद’ आंदोलन छेडण्याचा ईशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.
सिंधुदुर्ग: पुणेकर चाकरमान्यांसाठी एक खुशखबरआहे. चिपी- पुणे या रूटसाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी ही विमानसेवा Fly 91 कंपनी तर्फे सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकर चाकरमान्यांना यंदाच्या गणेश चतुर्थीला विमानाने कोकणात उतरण्याची संधी मिळणार आहे.
सुरवातीला प्रत्येक शनिवार आणि रविवारी चिपी-पुणे -चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. याबाबत पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळण्यासाठी अडचण येत होती. याबाबत खासदार नारायण राणे यांनी हवाई मंत्री आणि संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. या नंतर दोन दिवसांसाठी विमान सेवा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले. या बाबतची माहिती आज माजी सभापती निलेश सामंत यांनी खा.नारायण राणे यांची भेट घेऊन दिली. तसेच त्यांचे आभार मानले. सदर विमानसेवा संपूर्ण आठवडाभर सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन ना. राणे यांनी दिले. यावेळी आमदार नितेश राणे, भाजप जल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर आदी उपस्थित होते.