कणकवलीत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण.. जिल्हय़ात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय?

सिंधुदुर्ग | कणकवली शहरात गुरुवारी दहावीत शिकणाऱ्या दोन अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. या मुलींचे अपहरण झाले अशी त्यांच्या पालकांची तक्रार आहे. तशी तक्रार त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त की, दोन अल्पवयीन मुली गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याचा सुमारास विद्यामंदिर येथे गेल्या होत्या. तेथून आपण रिक्षाने भालचंद्र महाराज यांच्या मठाजवळ जावून नंतर त्यांच्या एका मैत्रीणकडे जाणार असल्याचे त्यांनी घरी सांगितले होते. मात्र, रात्री दोघीही घरी न परतल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घ्यायला सुरुवात केली मात्र त्या दोघी कुठे सापडल्या नाहीत. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात जावून कोणीतरी अज्ञात इसमाने त्या दोघींचे अपहरण केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात भादंवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
जिल्हय़ात मुलांचे अपहरणकर्त्यांची टोळी सक्रिय? 
चार दिवसांपूर्वी याच तालुक्यातील सावडाव येथे सहा शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच जिल्ह्याच्या ईतर भागातून पण या बाबतच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची भीती आता नागरिकां मध्ये निर्माण होत आहे. 

Loading

Facebook Comments Box

खुशखबर! कोकण रेल्वेमार्गावरील ‘या’ विशेष गाडीचा जून -२०२३ पर्यंत विस्तार…..

संग्रहित फोटो

KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा जून -२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या  संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.

02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special

आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ३१/०३/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०२ जून २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.

02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special

आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०३/०४/२०२३  पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०५ जुन २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.

या गाड्यांचे मडगावपर्यंत कोकणातील थांबे 

  1. पनवेल,रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली,कुडाळ, थिवीम, मडगाव

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

ब्रेकिंग – ‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला!

Breaking News :केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने ज्या बहुमतावर शिंदे हेच खरे शिवसेनेचे नेते आणि त्यांच्याच गटाला धनुष्यबाण दिले आहे ती आकडेवारी पुढीलप्रमाणे 

 

Loading

Facebook Comments Box

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेमार्ग; घोडे नेमके अडले कुठे?

सिंधुदुर्ग | मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वे जोडणारा प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग मागील दहा वर्षांपासून रखडला आहे.  या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली असून त्याचा समावेश 2011-12 च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आला होता. कोकण रेल्वे मंडळाने या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही सादर केला होता. प्रस्तावित  सर्वेक्षणानुसार कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग व्यवहार्य असल्याची नोंद आहे.  मात्र त्यावर अद्याप कोणतेही काम झालेले नाही. हा रेल्वे मार्ग झाल्यास हा 107 किलोमीटरचा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे.
काय आहेत अडथळे?
या मार्गाचे काम कठीण असले तरी कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यास वेळ लागणार नाही. कारण असे कठीण कामे कोकण रेल्वे मंडळाने या आधी केली आहेत. पण हा  प्रकल्प कोकण रेल्वेकडे न देता मध्य रेल्वेमार्फत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.  सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे निधीचा. या मार्गास रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्य शासनाकडून निधी मंजूर होत नाही आहे.२०१७ च्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३४३८.४९ कोटी एवढा आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के निधी रेल्वे मंत्रालय आणि उर्वरित महाराष्ट्र सरकार देणार आहे. २०१६ च्या अर्थसंकल्पातील  २५० कोटीची तरतूद वगळता अजूनपर्यंत कोणतीही तरतूद त्या पुढच्या अर्थसंकल्पात केली गेली नाही आहे.  निधीअभावी फक्त सर्वेक्षण वगळता कोणतेही काम चालू झाले नाही आहे. या मार्गाकरिता  683 हेक्टर भूसंपादन गरजेचे आहे, पण अजूनपर्यंत काहीच भूसंपादन झाले नाही आहे. २०१८ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कामास गती देण्याचा प्रयत्न केला गेला होता. २०२२ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल असे जाहीर करण्यात आले होते. पण त्यानंतर काहीच प्रगती झाली नाही. मिळाल्या फक्त पुढच्या तारखा!
या रेल्वेमार्गाचा फायदा 
कोल्हापूर आणि कोकणातील उद्योग, व्यापार वाढीच्यादृष्टीने हा रेल्वेमार्ग उपयुक्त आहे. 107 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील अतिशय मागास म्हणून ओळख असलेल्या या तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. कोल्हापुरातील शेती व इतर पूरक उत्पादने बाय रोड पाठवायची ठरवल्यास प्रचंड पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो. येथील कंटेनरना न्हावाशेवा बंदरामध्ये चार-चार दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्याचे भाडे भरावे लागते. मात्र हाच माल जयगडच्या बंदरापर्यंत रेल्वेने पोहचवला तर तो लवकर पाठवता येऊ शकेल. त्याचबरोबर या बंदराचा दुहेरी फायदाही होऊ शकतो. या बंदरावर कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. कोल्हापूर परिसरातील साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्लँटमध्ये १५ टक्के कोळसा वापरता येऊ शकतो. तसेच येथील इंडस्ट्रिजसाठीही हा कोळसा मिळू शकेल. सध्या कोल्हापुरात आणण्यात येणारा कोळसा ट्रक वाहतुकीने कारखान्यांपर्यंत आणणे प्रचंड खर्चिक आहे. रेल्वेचा हा नवीन मार्ग सुरु झाल्यास आयात व निर्यात व्यवसायासाठी मोठा फायदा होऊ शकतो. कमी खर्चामध्ये ही वाहतूक होऊ शकते.

Loading

Facebook Comments Box

आकेरी येथील श्री देव रामेश्वर देवस्थानाचा प्रसिद्ध वार्षिक रथोत्सव १९ फेब्रुवारीला

सिंधुदुर्ग |आकेरीतील श्री देव रामेश्वर देवस्थानाचा प्रसिद्ध वार्षिक रथोत्सव रविवारी १९ फेब्रुवारीरोजी संपन्न होत आहे. तसेच १८ फेब्रुवारीला महाशिवरात्र उत्सव साजरा होणार आहे. या निम्मिताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
१८ फेब्रुवारी 
  • पहाटेपासून अभिषेक,दर्शन, नवस बोलणे/फेडणे, 
  • रात्री  भजन गायनाचा कार्यक्रम 
  • पालखी मिरवणूक
  • आड दशावतार 
  • भजनाचे कार्यक्रम 
१९  फेब्रुवारी 
  • पहाटेपासून अभिषेक,दर्शन.
  • सायंकाळी गायनाचा कार्यक्रम 
  • रात्री पूर्ण, पालखी आणि श्रींची सवाद्य भव्य मिरवणूक 
  • दशावतार नाट्यप्रयोग
भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे. 

Loading

Facebook Comments Box

पॉलिश करण्याच्या बहाण्याने सव्वा तीन लाखाचे दागिने लंपास

रत्नागिरी | उजाला पावडरच्या जाहिरातीबाबत माहिती देण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी सोन्याचे दागिने साफ करुन देतो सांगत दागिने लंपास केल्याची घटना गोळप विवेकानंद येथे घडली. याप्रकरणी अज्ञात दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शोभा श्रीकांत पाटील (57, गोळप विवेकानंदनगर, गारवा घर नं. १३१९ रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात दिली.

नक्की काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शोभा पाटील यांच्या घरी दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी उजाला पावडरचे जाहिरातीबाबत माहिती दिली. त्यानंतर सोन्याचे दागिने साफ करुन देतो असे सांगितले. शोभा यांनी दागिने दिल्यानंतर त्यांनी गॅसवरील कुकरमध्ये साफ करण्यासाठी टाकले आहेत असे भासवले. शोभा या दागिने पाहण्यासाठी गेल्या असता दोघे तरुण दागिने घेऊन फरार झाले. कुकरमध्ये दागिने सापडलेच नाहीत. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच पूर्णगड पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. पोलिसांनी दोन अज्ञातावर भादविकलम 419, 420, 34 गुन्हा दाखल केला आहे.

Loading

Facebook Comments Box

रत्नागिरी येथे मानवी वस्तीत आढळले खवले मांजर

रत्नागिरी : खेडशी नाका येथे खवले मांजर आल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर एक पथक त्या ठिकाणी दाखल होऊन त्या खवले मांजराला जीवनदान देण्यात आले आहे. पथकाने खवले मांजर ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करून ते सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यात आली त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

खेडशी नाका येथे खवले मांजर आल्याची माहिती केतन साळवी यांनी दूरध्वनीद्वारे दिली होती. या बचाव कार्यात पालीचे वनपाल एन.एस.गावडे, रत्नागिरीचे वनरक्षक प्रभू, साबणे, जाकादेवी वान रक्षक शर्वरी कदम यांनी सहभाग घेऊन खवले मांजर ताब्यात घेतले आणि नंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहायक वन रक्षक रत्नागिरी आणि चिपळूण सचिन नीलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले.

खवले मांजरा विषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

खवले मांजर भारतात हिमालय आणि ईशान्येकडील भाग वगळता सगळीकडे आढळतं. पण शिकारीमुळे बहुतेक भागात ही प्रजाती नष्ट झाली आहे. भारतात भारतीय खवले मांजर आणि चिनी खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात. या प्राण्याच्या संपूर्ण शरीरावर खवले असतात त्यामुळे धोक्याची सूचना मिळाली की ते आपल्या शरिराचे वेटोळे करून घेते. हल्ला न करता स्वतःचं संरक्षण करण्याची वृत्ती निसर्गाने त्याला बहाल केलीये. साधारण पाच फूट लांब आणि मोठी शेपटी असलेल्या या प्राण्याला दात नसतात पण शिकार करण्यासाठी एक फुट लांब जीभ असते. खवले मांजर आपल्या या एक फूट लांबीच्या चिकट जीभेने मुंग्या, वाळवी आणि डोंगळे खावून जगते.

तस्करीसाठी वापर
खूप पूर्वी स्थानिक लोक आणि आदिवासी जंगली प्राण्यांची शिकार करून खायचे. पण पुढे त्यांना इतर पर्याय उपलब्ध झाल्याने आणि वन्यजीव संरक्षणाचा कायदा आल्याने यावर निर्बंध आले. पण गेल्या काही वर्षांमध्ये तस्करीच्या उद्देशाने भारतात खवल्या मांजराची शिकार वाढल्याचं दिसतं. खवले मांजरांची बिळं शोधून त्यांना बाहेर काढलं जातं आणि त्याची खवलं काढण्यासाठी उकळत्या पाण्यात टाकलं जातं. या खवल्यांची किंमत आंतरराष्ट्रीय तस्करीत लाखोंमध्ये असते.

या खवल्यांचा उपयोग
ही खवलं पारंपरिक चीनी औषध आणि जडीबुटीमध्ये वापरली जातात. त्यात दमा आणि संधीवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो.

हेही वाचा – देवगड येथे सापडले आगळे वेगळे आणि विलक्षण मानवाकृती कातळशिल्प

तस्करी रोखण्यासाठी उपाय.
आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने International Union for Conservation of Nature (IUCN) जाहीर केलेल्या रेड डेटा लिस्ट म्हणजेच धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आलाय. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत या खवले मांजराचा पहिल्या श्रेणीत समावेश करण्यात आलाय. स्थानिक पातळीवर सुद्धा काही प्राणीमित्र संस्था या प्रजातीला वाचविण्यासाठी पुढे सरल्या आहेत.

 

Loading

Facebook Comments Box

देवगड येथे सापडले आगळे वेगळे आणि विलक्षण मानवाकृती कातळशिल्प

सिंधुदुर्ग | देवगड तालुक्यातील बापर्डे रेडेटाका येथे एक मोठे विलक्षण मानवाकृती कातळशिल्प सापडले आहे. चार दिवसांपूर्वी या परिसरातील इतर कातळचित्राचा अभ्यास करण्यासाठी  कातळशिल्पे अभ्यासकांना दाखवण्यासाठी रणजित हिर्लेकर व अजित टाककर हे या भागात गेले असता त्यांना श्री. श्रीकांत नाईकधुरे यांच्या कलमाच्या बागेत हे कातळशिल्प सापडले आहे.

या सापडलेल्या कातळशिल्पाची वैशिष्ट्ये
रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांच्या माहितीनुसार…

  • कोकणातील कातळचित्राच्या दुनियेत हे कातळचित्र अतिशय वेगळे आहे.
  • मानवाकृती कातळचित्र हे आता पर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमधे अतिशय विलक्षण व अलंकार तोरणांनी अलंकृत आहे.
  •  जवळपास विस ते पंचविस कातळचित्रांचा एकत्रित समुह आहे.
  • यातील मानवाकृती कातळचित्र हे आता पर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमधे अतिशय विलक्षण व अलंकार तोरणांनी अलंकृत आहे.
  • जवळपास पंधरा ते सहा फुट रुंदीच्या आयाताकृती चौरसात सर्व जागा व्यापेल अशी ही मानवाकृती आहे.
  • आतापर्यंत देवगड तालुक्यात सापडलेल्या मानवाकृती कातळचित्रात ही सर्वात मोठी मानवाकृती आहे.
  • ही संपुर्ण फेम विविध प्रकारे सजवली नटवली आहे.
  • पहाताक्षणी मानवी मनाला धक्का बसेल व ही भव्याकृती पाहुन तो त्यापुढे नम्र होईल, इतकी विलक्षण मोठी ही आकृती आहे.
  • आजवरच्या कातळचित्रां विषयीच्या संशोधनाला धक्का देईल, इतके वेगळेपण या आकृतीत पहायला मिळते.
  • जवळ पास चाळीस ते पन्नास चौरस फुटात ही विविध कातळचित्रे कोरलेली आहेत.
  • ही सर्वच कातळचित्रे आतापर्यंत दिसणाऱ्या कातळचित्रांपेक्षा वेगळी आहेत.

लगेचच या कातळचित्रांची साफसफाई व डाँक्युमेंटेशन करण्यासाठी नाईकधुरे यांच्याशी बोलुन टाककर व हिर्लेकर यांनी नव्या मोहीमेची योजना केली. सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळीच या जागी पोहोचुन त्याची साफसफाई करण्यात आली. या कामी साक्षी राणे, गौरव सोमले व निना हिर्लेकर या देवगड काँलेजच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

हेही वाचा – रत्नागिरी येथे मानवी वस्तीत आढळले खवले मांजर

देवगड इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या कातळचित्र संशोधन व संवर्धनाच्या कामा बाबत माहीती देताना श्री. अजित टाककर म्हणाले, “गेल्या वर्षभरात आम्हाला तिस ते चाळीस नविन कातळचित्रे सापडली आहेत. आता देवगड तालुक्यात सोळा- सतरा ठिकाणी साठ पासष्टहुन अधिक कातळचित्रांची नोंद आम्ही घेतली आहे. या विषयीचा रिपोर्ट व संशोधन लेख येत्या १७ फेब्रुवारी रोजी ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयात भरणाऱ्या कोकण इतिहास परीषदेच्या बाराव्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला जाणार आहे.

 

Loading

Facebook Comments Box

कणकवलीत ५६ हजार रुपयांची धाडसी चोरी….

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यात आज फिल्मी स्टायल ने चोरी करण्यात आली. बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्‍या कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्याला लुबाडल्‍याची घटना आज बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेत घडली. दोन महिलांनी तब्‍बल ५६ हजार रूपये हातोहात लंपास केले.
नक्की काय घडले ?
नगरपंचायतीचे कर्मचारी संजय राणे हे दुपारी बाराच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेत पैसे भरण्यासाठी गेले होते. त्‍यावेळी बँकेमध्ये दाेन महिला घुटमळत होता. बँकेत पैसे भरत असताना या महिला राणे यांच्या मागे उभ्या राहिल्या. त्‍यानंतर कॅश काऊंटरवर व्यवहार होत असताना यातील एका महिलेने राणे यांच्या बॅकेत हात घालून आतील ५६ हजार रूपयांची रोकड .लांबवली यानंतर लागलीच या महिला पसार झाल्या. राणे यांच्याकडे सुमारे २ लाख ५६ हजार रूपयांची रोकड होती. बँकेत पैसे भरताना यातील ५६ हजार रूपये गायब झाल्‍याचे लक्षात आल्‍याने त्‍यांनी gबँकेकडील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची विनंती केली.यावेळी त्‍या महिलांनी ही रक्‍कम लांबविल्‍याचे लक्षात आले. यानंतर नगरपंचायत अधिकाऱ्यांनी बँकेत धाव घेतली होती. तसेच त्‍या महिलांचाही शोध कणकवली पोलीसांनी सुरू केला आहे.
बॅग मधील दोन बंडल ५६ हजार ४१० रुपये काढत धाडसी चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी भा. द. वी. कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. महिला चोरी करताना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

Loading

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्हय़ात धावणार ‘पिंक ऑटोरिक्षा’; पुढील महिन्यापासून शुभारंभ…

 

सिंधुदुर्ग :महिलांना रोजगाराच्या व आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणण्यासाठी  सिंधुदुर्ग बँकेने ‘अबोली ऑटोरिक्षा’ ही महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्याची घोषणा मंगळवारी आमदार तथा जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक नितेश राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केली. या योजनेसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीचा व्याजदरात अर्थसहाय्य, प्रशिक्षणासह बॅच परमिट चा खर्च करणार असल्याची ही माहिती आमदार नितेश राणे यांनी या पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या नाविन्यपूर्ण योजनेची  माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळशेकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.पिंक ऑटो रिक्षा म्हणून रेल्वे स्थानके जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये अशी रिक्षा सेवा सुरू व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेने ही योजना हाती घेतली आहे.

 आमदार नितेश राणे यांचे आवाहन

जिल्ह्यात रोजगाराला चालना मिळावी तसेच आता येत असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाबरोबरच सुरू झालेल्या विमानसेवा जिल्ह्यातील पर्यटकांचा ओघ यासाठी या विकासाला सहाय्य करणारी सेवा जिल्ह्यातील महिलांनी पुढाकार घेऊन यशस्वी करावी व या योजनेत जिल्ह्यातील महिला व तरुणीनी पुढाकार घ्यावा व या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

जिल्हा बँकेकडून या योजनेसाठी नऊ टक्के सवलतीचा व्याजदर आकारण्यात येणार आहे. एकूण किमतीच्या 85% कर्जपुरवठा जिल्हा बँक करणार आहे.

पाहिल्या पाच महिला रिक्षाचालकांना विशेष सवलत 

कोणत्याही क्रांतीची सुरवात करताना कोणीतरी सुरवात करणे महत्त्वाचे असते. हीच सुरवात करण्यासाठी नितेश राणे यांनी पहिल्या पाच अर्जदारांसाठी स्वतः काही सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलती पुढीलप्रमाणे असतील. 

उर्वरित पंधरा टक्के कर्ज पुरवठा (Down Payment) स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत. 

ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचा तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच परमिटचा खर्च देखील ते करणार आहेत.

पहिल्या पाच महिलांना जागतिक महिला दिनाच्या 8 मार्च रोजी होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमात पिंक रिक्षांचे वितरण लाभार्थी महिलांना होणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

महिला अधिकारी नमिता खेडेकर यांची नियुक्ती.
जिल्ह्यातील महिलांच्या या योजनेसाठी सिंधुनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील नमिता खेडेकर यांचे खास नियुक्ती करण्यात आली असून इच्छुक महिला व युवतीने या पिंक ऑटो रिक्षा अबोली योजनेसाठी नोंदनों णी करावी व जिल्ह्याच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार नितेश राणे यांनी केले आहे. संपर्कासाठी 9421149421 हा श्रीमती नमिता खेडेकर यांचा मोबाईल नंबर ही जाहीर करण्यात आला 

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search