मुंबई: गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा एक मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.
ही बंदी तीन टप्प्यांत असणार आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे.
5 व 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी राहील.
सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहील.
हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.
मुंबई: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नातून नव्याने चालू करण्यात येणाऱ्या वांद्रे – मडगाव या गाडीचे उद्घाटन दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी होणार असून त्यादिवसापासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे अशी माहिती बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी दिली आहे.
या पूर्वी ही गाडी दिनांक २४ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे पक्ष कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. या गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या इतर विभागांना मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यात वेळ लागत असल्याने या गाडीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक दीड वाजता ही गाडी बोरिवली येथून मडगावसाठी मार्गस्थ करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
त्यानंतर ही २० डब्यांची गाडी वांद्रे – मडगाव दरम्यान आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येणार आहे. आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या उद्घाटन सोहोळ्यास उत्तर मतदारसंघातील कोकणकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पक्षाच्या वतीने सुनील राणे यांनी केले आहे.
राजापूर, दि. २४ ऑगस्ट: अणुस्कुरा घाटात आज शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घाटातील दरड हटवण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पहाटे ५ वाजताच्या सुमारास मातीचा भला मोठा भराव रस्तावर आल्याने हा मार्ग पूर्ण बंद झाला आहे. सुदैवाने पहाटेचा सुमार असल्याने, वाहनांची जास्त वर्दळ नसल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र या घाट मार्गावर वारंवार कोसळणार्या दरडीमुळे येथील हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याचा प्रकार घडला आहे.
प्रास्तावित नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग ८०५ किमी लांबीचा असून तो वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गाचे संरेखन अंतिम करण्यात आले असून आराखडाही तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग मार्गी लावण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीने भूसंपादन प्रक्रियेस सुरुवात केली होती. मात्र कोल्हापूर, सांगली आणि आसपासच्या भागातील शेतकरी, स्थानिक रहिवासी आणि राजकीय नेते या महामार्गास विरोध करीत आहेत. हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी आंदोलन सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर याआधीच एमएसआरडीसीवर भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे. भूसंपादन पूर्णत: बंद असतानाच आता शक्तिपीठ महामार्गास पर्यावरणासंबंधीची परवानगी घेण्यासाठी एमएसआरडीसीकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव आता एमएसआरडीसीने मागे घेतला आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
बदलापूर: दोन चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी आंदोलकांनी साडेदहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला. त्यामुळे मुंबईहून येणारी आणि मुंबईकडे जाणारी अशा दोन्ही रेल्वे सेवेला त्याचा फटका बसला आहे.
मंगळवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन आक्रमक रूप घेत असतानाच यातील काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद पाडली. रेल्वे रुळावर आंदोलक बसल्याने एकाच गोंधळ उडाला त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीची मागणी करत घोषणाबाजी करत आहेत.
Konkan Railway Updates: उत्तर व दक्षिण भारतात लोहमार्ग देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून त्याचा pकोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवरही होणार आहे. काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक १२४५० चंदीगड मडगाव एक्सप्रेस ७, ९, १४ आणि १६ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२४४९ मडगाव-चंदीगड एक्सप्रेस १०, ११, १७ व १८ सप्टेंबर रोजी धावणार नाही.
चंदीगड कोचुवेली एक्सप्रेस ६, ११ व १३ सप्टेंबर रोजी आदर्शनगर, दिल्ली कांट, रेवारी, अलवार, मथुरामार्गे वळवण्यात आली आहे. याच मार्गाने कोचुवेली चंदीगड एक्सप्रेस ७, ९ व १४ सप्टेंबर रोजी धावेल. कोचुवेली-अमृतसर आणि अमृतसर-कोचुवेली एक्सप्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीन व निजामुद्दीन-एर्नाकुलम या गाड्याही या मार्गावरून धावणार आहेत.
मडगावहून १६ सप्टेंबर रोजी सुटणारी राजधानी एक्सप्रेस (२२४१३) ४ तास ४० मिनिटे उशिराने म्हणजे दुपारी १२.४० वाजता सुटणार आहे. १० सप्टेंबरची एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस उत्तर मध्य रेल्वेच्या विभागात अर्धा तास थांबवली जाणार आहे.