पोलादपूर:मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे आज सकाळी शिवशाही बस आणि कार चा भीषण अपघात होऊन २ जण ठार झालेत तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल केले आहे.
जयवंत सावंत;६० वर्ष; अंबरनाथ, किरण धागे;२८ वर्ष; घाटकोपर हे या अपघातात मरण पावले आहेत तर अमित दिगले;30 वर्ष; बदलापूर, जयश्री सावंत, ५६ वर्ष; अंबरनाथ, गिरीश सावंत; ३४ वर्ष; अंबरनाथ हे तिघे ह्या अपघातात जखमी झाले आहेत.
मुंबई :गणेशोत्सव हा सण समस्त कोकणकरांचा महत्वाचा सण आहे. ह्या उत्सवास मुंबई-पुण्यातून अगणित भक्त कोकणातील आपल्या गावी जातात .गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा म्हणून सरकार तसेच पक्ष प्रयत्नशील आहे.पक्षातर्फे ३०० पेक्षा अधिक बसेस ह्या मार्गावर सोडण्यात आल्या आहेत, त्यासोबत मोदी एक्सप्रेस हि सोडण्यात आली आहे. सरकारतर्फे ST बसेस च्या ज्यादा फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत तसेच रेल्वे मार्फत पण अनेक विशेष फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत असे आज देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हणाले.
स्वतः रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावर उतरून ह्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आणि हा रस्ता प्रवासासाठी सुखकर करण्याचे निर्देश दिले आहेत. ह्या महामार्गाचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही पुढील वर्षी पाठपुरावा करून नक्की सोडवू असे ते पुढे म्हणाले आहे.
अंतोदय / प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांचे उत्त्पन्न जास्त आहे त्यांनी ह्या योजनेतून बाहेर पडा असे आवाहनवजा इशारा देण्यात आला आहे, त्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ हि अंतिम तारीख दिली आहे. ह्या लाभार्थ्यांनी दिनांक ३१/०८/२०२२ पूर्वी ह्या योजनेतून बाहेर पडा GIVE IT UP फॉर्म स्वइच्छेने भरून देणे गरजेचे आहे. हा अर्ज भरून तो तहसीलदार, पुरवठा निरक्षण अधिकारी किंवा पुरवठा निरीक्षक ह्यांच्याकडे जमा करायचा आहे.
सदरचा फॉर्म दिनांक ३१.०८.२०२२ भरून देणार नाहीत अशा लाभार्थी बाबत दिनांक ०१.०९.२०२२ पासून तलाठी व मंडल अधिकारी शहनिशा करून अपात्र लाभार्थीवर आजपर्यंत उचल केलेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे रक्कम वसूल करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो असे जाहीर करण्यात आले आहे.
खालील लाभार्थ्यांना हा अर्ज भरणे गजरेचे आहे असे पत्रकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
१.शासकीय नोकर, निमशासकीय नोकर,
२. व्यावसायिक, किराणादुकानदार,
३. पेन्शन धारक,
४. ट्रॅक्टर असणारे बागायतदार शेतकरी,
५. मोठ मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे,
६. साखर कारखान्यात Permenant असणारे कामगार.
७. आयकर भरणारे
८. पक्के (स्लॅपचे) घर असणारे .
९. चार चाकी वाहन (घरगुती किंवा व्यायसायिक) धारक
१०. घरात एअर कंडिशनर (AC ) असणारे
११. कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून ५९,००० हजारापेक्षा जास्त असल्यास.
मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या भक्तांना राज्यसरकारने एक खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव दरम्यान कोकणात जाणाऱ्या भक्तांना सरकारद्वारे टोल माफी देण्यात आली आहे. दिनांक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना टोलमाफीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन घ्यावे लागतील. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल. .
पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. या स्पर्धेचा विषय ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ हा आहे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून; तर घरगुती पातळीवर गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्या-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल,ह्या हेतूने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
बक्षिसांचे स्वरूप
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :
अ. प्रथम क्रमांक :- ५१,०००/
ब. द्वितीय क्रमांक :- २१, ०००/-
क. तृतीय क्रमांक :- ११,०००/-
ड. उत्तेजनार्थ :- ५००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.
घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :
अ. प्रथम क्रमांक :- ११,०००/
ब. द्वितीय क्रमांक :- ७, ०००/-
क. तृतीय क्रमांक :- ५,०००/-
ड. उत्तेजनार्थ :- १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.
स्पर्धेची नियमावली :
१. सदर स्पर्धा वैयक्तिक (घरगुती गणेशोत्सव सजावट) आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अशा दोन्हींसाठी आहे.
२. सदर स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे :
२.१ मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत.
२.२ प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा.
२.४ ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यावर स्पर्धकाचे नाव येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल.
२.५ चित्रफितीला आवाजाची जोड (व्हाइस-ओव्हर) देऊ शकता.
२.६ ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त १०० MB असावी. तसेच ही ध्वनिचित्रफित mp4 फॉरमॅटमध्ये असावी आणि ती एक ते दोन मिनिटांची असावी.
३. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळाने पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे :
३.१ मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या देखाव्याचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत.
३.२ प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा.
३.३ आपल्या गणेशोत्सव मंडळामध्ये केलेल्या मताधिकार, लोकशाही याविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी.
३.४ ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यांवर मंडळाचे किंवा मंडळातील कुणा व्यक्तीचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल.
३.५ ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त ५०० MB असावी. तसेच ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असावी आणि १० मिनिटांपेक्षा अधिक असू नये.
३.६ गणेशोत्सव मंडळाने सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गूगल अर्जावर स्पर्धक म्हणून गणेशोत्सव मंडळाचे नाव लिहून, त्यानंतर डॅशचे चिन्ह (-) देऊन अध्यक्ष किंवा सचिव यांचे नाव लिहावे (उदा. घोलाईदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – मंदार मोरे) आणि पुढे त्याच व्यक्तीचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक लिहावा.
३.७ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी असलेले पत्र गूगल अर्जावर जोडावे. या पत्राचा नमुना गूगल अर्जावर, जिथे हे पत्र जोडायचे आहे, तिथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
५. ज्या स्पर्धकांना फोटो किंवा ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर), ९९८७९७५५५३ (तुषार पवार) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे.
६. दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ ते ९ सप्टेंबर २०२२ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
७.मतदान, निवडणूक, लोकशाही या विषयांना अनुसरून साहित्य पाठवणाऱ्या सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.
८. आलेल्या देखाव्या-सजावटींमधून सर्वोत्तम देखावे-सजावटी निवडण्याचा तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.
९. निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी / अधिकारी सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही.
१०. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल.
११. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.
मुंबई : पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी आणि AC लोकल्सना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन पाश्चिम रेल्वे प्रशासनाने AC आणि Non-AC फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑक्टोबरपासून 20 AC लोकल्स आणि 10 Non-AC लोकल्स ह्या मार्गावर वाढविण्यात येतील.
सध्या चर्चगेट ते डहाणू ह्या मार्गावर एकूण 1375 लोकल्स फेर्या चालविण्यात येत आहेत त्यामधे 48 फेर्या AC लोकल्स च्या आहेत. ह्या मार्गावर सुमारे 30 लाख प्रवाशी दररोज प्रवास करतात त्यामधे सुमारे 1 लाख प्रवासी AC लोकल्सने प्रवास करतात. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात AC लोकल्सने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या 25% वाढली आहे. मध्य उपनगरीय रेल्वेशी तुलना करता ह्या मार्गावर AC लोकल्सना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ह्या मार्गावर 20 AC लोकल्स वाढवायच्या निर्णय घेतला आहे.
ह्या सर्व वाढिव सेवांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने दादर – सावंतवाडी तुतारी 11003/11004 एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही गाडी नियमित 19 डब्यांसोबत चालविण्यात येते. आता त्यात अतिरिक्त 5 डबे वाढवून त्या आता 24 डब्यांसोबत चालविण्यात येणार आहेत. AC Three Tier 1 डबा + Sleeper Coach 2 डबे + Second Seating 2 असे एकूण 5 अतिरिक्त डबे जोडण्यात येतील.
ही गाडी दिनांक २७/०८/२०२२ ते १२/०९/२०२२ ह्या कालावधीत अतिरिक्त डब्यांसोबत चालविण्यात येतील.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
हंगामाच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना राज्य परिवहन विभागाने इशारा दिला आहे. नेहमीच्या भाड्यापेक्षा दीडपट किंवा दुप्पट प्रवास भाडे आकारत आहे अशी तक्रार आल्यास त्या व्यावसायिकावर कठोर कारवाई केली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात गावी खूप मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जातो. रेल्वे आणि ST बससेवा आपल्या विशेष फेर्या ह्या काळात सोडतात. पण त्या अपुऱ्या पडतात त्यामुळे चाकरमानी खाजगी ट्रॅव्हल्स चा पर्याय निवडतात. ह्या मजबुरीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक घेतात आणि दुप्पट भाडे आकारतात असे निदर्शनास आले आहे. ह्या काळात 700/800 असणारे प्रवासभाडे 1500/2000 च्या घरात जाते आणि ह्याचा फटका चाकरमान्यांचा खिशाला बसतो.
असे प्रकार आढळल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या 10 सेवा AC लोकल्स मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात येत आहे. त्या १० सेवा २५.०८.२०२२ पासून आधी पूर्वीप्रमाणे Non AC स्वरुपात चालविण्यात येतील. AC सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख पुनरावलोकनानंतर कळविण्यात येईल असे आज मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
मागील आठवडय़ात मध्य रेल्वेच्या 10 गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित केल्या गेल्या होत्या. ह्या निर्णयाचा प्रवाशांकडून विरोध झाला होता. कळवा आणि बदलापुरात आंदोलने पण करण्यात आली होती. सोशल मीडियावर पण ह्या संदर्भात विरोध दर्शवला गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पण विधी मंडळात ह्या विरुद्ध आवाज उठवला होता. ह्या गाड्या पुन्हा सामान्य स्वरुपात चालविण्यात याव्यात म्हणुन प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी निवेदने दिली. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.