मुंबई, दि. १४ जुलै: पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान झाड पडल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास झाड पडल्याने धिम्या मार्गावरील लोकल जवळपास तासभर खोळंबली होती. रविवारी सकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास प्रभादेवी-दादर दरम्यान डाऊन दिशेकडील धीम्या मार्गावर झाड पडले.
रेल्वे रुळांवर झाड पडल्याने, बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्या. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी दाखल होऊन झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले. जवळपास तासाभराच्या रखडपट्टी सकाळी ८.२० वाजता झाड बाजूला काढण्यात यश आले. त्यानंतर बोरिवलीच्या दिशेने धीम्या मार्गावरील लोकल सुरू झाल्या.
तर, सकाळच्या सुमारास बोरिवली रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दुरुस्तीची कामे करून सकाळी ९.०५ वाजता बिघाड दूर करून बोरिवली येथील ठप्प झालेल्या तीन मार्गिका सुरू केल्या. तसेच डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा लवकरच सुरू केली जाईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.