कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.
वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.