सिंधुदुर्ग : मागील दोन दिवसांत महावितरणमध्ये कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा सावंतवाडी व वेंगुर्ला येथे अपघात घडलेला असून त्यात एक कर्मचारी जीवास मुकला आहे. सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे झालेल्या अपघात प्रकरणात पुन्हा एकदा मृत कर्मचाऱ्यांकडे काम करताना संरक्षक साहित्य नसल्याचे दिसून आले आहे.मागील वर्षभरात ११ अपघात होऊन त्यात ५ कर्मचाऱ्यांचा बळी जाऊन देखील महावितरणचे निर्ढावलेले अधिकारी व ठेकेदार सुशेगात असल्याचा आरोप मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा स्वाभिमान कामगार संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला आहे.कंत्राटदार किंवा महावितरणकडून कामगारांना बूट ,हॅंड ग्लोज ,सेफ्टी बेल्ट, हॅल्मेट आदी संरक्षक साहित्य पुरवले जात नसल्याने कर्मचारी अपघाताचे बळी ठरत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण देऊनच विद्युत वाहिन्यांवरील काम देणे नियमाधीन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणचे अधिकारी व ठेकेदाराची मुजोरी चाललेली आहे.
महावितरणचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी एसी केबिनच्या बाहेर पडून कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करत आहेत हे पहावे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजतील. आणि मर्जीतला ठेकेदार नेमण्यापेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांना संरक्षक साहित्य देणारा ठेकेदार नेमावा असा टोला देखील गावडेंनी लगावला आहे. जिल्हयाचे विद्युत निरीक्षक झोपले आहेत का ? असा सवाल उपस्थित करत ओरोस येथील विद्युत निरीक्षक कार्यालयाला लॉक लावण्याचा इशारा मनसेच्या वतीने गावडे यांनी दिला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुणीही वाली राहिला नसून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे म्हणजे मृतांच्या वारसांनी जणू चेष्टाचं केल्यासारखे आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी मागील वर्षभरातील अपघाती मृत्यू प्रकरणी दोषी असलेला ठेकेदार व महावितरणचे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश द्यावेत व मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई देऊन अपघाती कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना न्याय द्यावा अशी मागणी गावडेंनी केलेली आहे.