Mumbai Goa Highway Accident: महामार्गावरील अपघातप्रकरणी अधिकारी व ठेकेदारांना सहआरोपी करा; जनआक्रोश समितीची मागणी

   Follow us on        माणगाव : मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव येथे झालेल्या अलीकडील अपघातानंतर अधिकारी व ठेकेदारांना सहआरोपी करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जनआक्रोश समितीने माणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. निवृत्ती बोऱ्हाडे साहेब यांची भेट घेतली.

समितीने यावेळी गेल्या १७ वर्षांतील अपघातांचे आकडे समोर ठेवत सांगितले की, महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे आजपर्यंत ४५०० पेक्षा जास्त कोकणकरांचा मृत्यू, तर १० हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. “अनेक दुर्घटनांमध्ये रस्त्यावरील त्रुटी स्पष्ट असतानाही ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही; प्रत्येकवेळी चालकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले,” अशी नाराजी समितीने व्यक्त केली.

अपघातात शिवशाही बस चालकाची चूक असल्याचे प्राथमिक मत स्थानिक प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी नोंदवले असले, तरी महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर अचानक दुपदरी रस्ता होणे, इशारा फलकांचा अभाव, धोकादायक ठिकाणांचा सूचना ही प्रशासकीय व ठेकेदारांची गंभीर चूक असल्याचे समितीने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत अधिकारी व ठेकेदार यांनाही जबाबदार धरणे आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली.

यावर बोऱ्हाडे साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर बाजू तपासण्याचे आश्वासन दिले. तसेच माणगाव परिसरातील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करण्याचे आदेश त्यांनी तत्काळ दिले. या पाहणी अहवालाच्या आधारे NHAI व PWD यांसारख्या संबंधित यंत्रणांना निर्देशित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यापुढे महामार्गावरील त्रुटींमुळे अपघात झाल्यास अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे नोंदवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस स्थानिक माणगावकर, जनआक्रोश समितीचे सदस्य तसेच माणगावमधील सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाजघटक एकत्र आल्यास महामार्गावरील दुर्लक्षाविरुद्धचा आवाज आणखी बुलंद होईल, असा विश्वास जन आक्रोष समितीने व्यक्त केला.

Facebook Comments Box

हिवाळी विशेष गाड्यांना थांबे द्या – रेल्वे प्रवासी सेवा समितीचे निवेदन

   Follow us on    

 

 

► खेड (ता.) कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हिवाळी विशेष गाड्यांच्या थांब्यांमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे तालुके पुन्हा एकदा दुर्लक्षित झाल्याचा आरोप करत अखिल कोंकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र यांनी मध्य रेल्वेला निवेदन दिले आहे. ०११४१/०११४२ मुंबई-करमळी, ०१४५१/०१४५२ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुअनंतपुरम उत्तर तसेच भविष्यात जाहीर होणाऱ्या सर्व हिवाळी विशेष गाड्यांना माणगाव, महाड, खेड, राजापूर, वैभववाडी व सावंतवाडी या तालुक्यातील स्थानकांवर थांबे देण्यात यावेत, अशी मागणी समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे.

 

अतिरिक्त थांबा न देण्याचा निर्णय अयोग्य…

समितीने नमूद केले आहे की, ख्रिसमस व नवनव्या वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान गेल्यावर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील पर्यटकांनी मोठी वर्दळ असेल. त्याचबरोबर शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जातात. नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्ण भरलेले असल्याने प्रवाशांची अपेक्षा विशेष गाड्यांवर होती; मात्र महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांना थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाल्याचे समितीने सांगितले.

रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या पट्ट्यात एकाही विशेष गाडीला थांबा नाही. या गाड्या नेमक्या कोणासाठी सोडल्या जातात? असा प्रश्नही समितीने उपस्थित केला आहे. तिरअनंतपुरम विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे १५-२० किमी अंतरावर थांबे घेते, परंतु महाराष्ट्र कोकणातील अतिरिक्त थांबा न देण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे समितीचे मत आहे.

त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त

कोकणातील पर्यटक, व्यापारी, शिक्षण आणि रोजगारासाठी हे तालुके महत्त्वाचे असून विशेष गाड्या थांबा नसल्यामुळे स्थानिकांना मोठी गैरसोय होते. अनेकांनी तिकिटे रद्द केली आहेत. समितीने वैयक्तिक राजकारण सोडून, खेडवाडी रोड आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर तातडीने थांबे सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रवासी सेवा समिती रेल्वे प्रशासनाकडून याबाबत त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: डिजिटल तक्रार प्रणालीमुळे हरवलेले ७५ वर्षीय आजोबा कुटुंबीयांकडे सुखरूप परत

   Follow us on    

 

 
५ डिसेंबर, २०२५

दिनांक ४ डिसेंबर रोजी तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस (गाडी क्रमांक १९५७७) ने प्रवास करणारे ७५ वर्षीय वृद्ध प्रवासी चुकीने चिपळूण येथे उतरल्याने हरवले होते. मात्र त्यांच्या मुलाने ‘रेल मदद’वर तात्काळ तक्रार नोंदवल्यानंतर कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) जलद आणि समन्वयित शोधमोहीम राबवली.

चिपळूण स्थानकात गस्त घालत असताना RPF पथकाच्या लक्षात एक वृद्ध प्रवासी प्लॅटफॉर्मवर भांबावलेल्या अवस्थेत फिरताना दिसले. पथकाने त्यांच्याशी संवाद साधला असता, ते चुकून गाडीतून उतरल्याचे आणि स्वतःचे गंतव्य नीट सांगू न शकण्याच्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर ‘रेल मदद’वरील तक्रारीतील तपशीलांची पडताळणी करून RPF पथकाने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला व त्या वृद्ध प्रवाशाला सन्मानपूर्वक त्यांच्या परिवाराकडे सुरक्षितपणे सोपवले.

कुटुंबीयांनी RPF चे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेतून कोकण रेल्वेची डिजिटल तक्रार नोंद, वेगवान प्रतिसाद आणि मैदानातील समन्वयित कार्यप्रणाली वृद्ध व असुरक्षित प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किती प्रभावी ठरते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Facebook Comments Box

Mumbai Local: ‘एआय’ निर्मित नकली रेल्वे पास आणि तिकिटे – अजून काही प्रवाशांवर कारवाई

   Follow us on    

 

 

Mumbai Local: मध्य रेल्वेने बनावट तिकिटांच्या प्रकरणांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवत ३ प्रवाशांना बनावट युटीएस (UTS) सिझन तिकिटांसह पकडले. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी १८.४५ वाजता निघालेल्या परळ–कल्याण एसी लोकलमध्ये घडली. मुंबई विभागातील प्रवासी तिकीट निरीक्षक (TTI) प्रशांत कांबळे यांनी नियमित तपासणीदरम्यान तिकिटांमध्ये संशयास्पद गोष्टी आढळल्याने हे प्रकरण उघड झाले.

मोबाईलमधील ‘My Files’ मध्ये तिकीट पाहून संशय

तपासणीदरम्यान एका तरुणीने आणि दोन तरुणांनी अधिकृत UTS अॅपऐवजी मोबाईलच्या “My Files – Documents” फोल्डरमधून सिझन तिकिटे दाखवली. तिकीट तपासल्यावर तिन्ही तिकिटांवर एकच क्रमांक — XOOJHN4569 — असल्याचे आढळले. प्रत्येक UTS तिकिटाचा क्रमांक वेगळा असणे आवश्यक असल्याने अधिकाऱ्यांना मोठा संशय आला.

तिकिटिंग सिस्टीममध्ये पुष्टी – तिकीटच नाही!

तिकिटिंग प्रणालीतून पडताळणी केली असता प्रवाशांनी दिलेल्या कोणत्याही मोबाइल क्रमांकावर अशी तिकिटे जारीच झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिन्ही तिकिटे बनावट असल्याचे निश्चित झाले.

तीन जण ताब्यात – एआयच्या मदतीने बनावट तिकीट तयार

पकडलेल्या प्रवाशांची नावे अशी आहेत :

  • निरज तलरेजा

  • अथर्व बाग

  • अदिती मंगळूरकर

मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तिघांना त्वरित कुर्ला येथील रेल्वे पोलीस (GRP) यांच्या ताब्यात दिले. पुढील तपासात समोर आले की बनावट तिकिटे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा वापर करून तयार केली होती.

मध्य रेल्वेने प्रवाशांना सूचना दिली आहे की अधिकृत UTS अॅपमधूनच तिकिटे बुक व सादर करावीत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.

Facebook Comments Box

कोकणाच्या विकासकामांकडे दुर्लक्ष: मतदारांनी सजग राहावे – समाजसेवक आकाश पोकळे

   Follow us on    

 

 

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना कोकणातील विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी न मिळणे या प्रश्नांकडे समाजसेवक आकाश पोकळे यांनी लक्ष वेधले आहे. मतदारांनी विकासाच्या निकषावर मतदान करून कोकणाचे हित जपावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोकळे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई–गोवा महामार्गाचे काम रखडले असून कोकणातील नागरिकांना या समस्येमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विविध प्रकल्पांबाबत स्थानिकांमध्ये असंतोष असून आंदोलने करताना नागरिकांना पोलिसांच्या काठ्यांचा सामना करावा लागणे ही खेदजनक बाब असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यातही कोकणातील लोकप्रतिनिधी प्रभावीपणे पुढाकार घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रेल्वे स्थानकांवरील स्टॉल, लहान व्यवसाय आणि सेवा क्षेत्रातील रोजगारात स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

कोकणाचा सर्वांगीण विकास आणि स्थानिकांच्या हिताच्या दृष्टीने सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगत पोकळे यांनी मतदारांना “विचारपूर्वक मतदान करा आणि कोकणाचे संरक्षण करा” असे आवाहन केले.

Facebook Comments Box

कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे घरातून पळून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा शोध लागला

   Follow us on        

रत्नागिरी │ २० नोव्हेंबर २०२५
कोकण रेल्वे महामंडळातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कता, तात्काळ निर्णयक्षमता आणि समन्वयाच्या मदतीने रेल्वेतून पळून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा शोध लावण्यात येऊन त्याला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस (क्र. १२६१९) मध्ये प्रवास तपासणी करताना मुख्य प्रवासी तिकीट तपासनीस (एचडी टीई) श्री. प्रदीप झेड. शिरके यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) जनरल कोचमध्ये तिकीटाविना प्रवास करणारा विद्यार्थी वेशातील अल्पवयीन मुलगा आढळला. त्याच्याकडे शाळेची पिशवी असल्याने संशय निर्माण झाला. चौकशीदरम्यान मुलगा घरातून पळून आल्याची माहिती मिळताच श्री. शिरके यांनी तातडीने कमर्शियल कंट्रोलला कळवून रत्नागिरी स्थानकात रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) सहाय्याची मागणी केली.

काही वेळातच RPF पथकाने रत्नागिरी येथे हजर राहून मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले. पुढील पडताळणीत संबंधित मुलगा गोवा येथील वास्को-द-गामा येथील शाळेतून बेपत्ता झाल्याचे उघड झाले असून, त्याच्या पालकांनी शोधासाठी माहिती सर्वत्र प्रसारित केली होती.

मुख्य तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची जागरूकता, कमर्शियल कंट्रोल विभागाचा तातडीचा प्रतिसाद आणि RPF च्या समन्वयातून मुलाचा शोध लागला व त्याचे कुटुंबीयांशी सुरक्षित पुनर्मिलन शक्य झाले, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाने प्रसिद्धीपत्रकात दिली.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वेवर 5Gचा वेग – रेल्वे स्थानकांवर लवकरच सेवा उपलब्ध

दि. 19 नोव्हेंबर 2025 | नवी मुंबई

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि ब्ल्यू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्स लिमिटेड (BCSSL) यांनी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला असून, कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन सेवा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे. हा करार 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबई येथे करण्यात आला.

या संयुक्त उपक्रमाअंतर्गत, प्रारंभी तीन स्टेशन — मडगाव जंक्शन, रत्नागिरी आणि उडुपी — येथे सेवा चाचणी तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. ब्ल्यू क्लाउड कंपनी अत्याधुनिक 5G तंत्रज्ञान, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर व सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणारी अग्रणी संस्था असून या सहकार्याद्वारे स्टेशन परिसर आणि रेल्वे डब्यांमध्ये 5G Fixed Wireless Access (FWA) सेवा तसेच इन-स्टेशन आणि इन-ट्रेन डिजिटल मनोरंजन प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या प्रकल्पाचा उद्देश प्रवाशांना जलद इंटरनेट सेवा, वास्तविक वेळेतील माहिती आणि उच्च दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करणे आहे. यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि आधुनिक होण्याची अपेक्षा आहे.

POC (Proof of Concept) दरम्यान दोन्ही संस्थांकडून तांत्रिक व कार्यप्रणालीची क्षमता तपासली जाईल, तसेच भविष्यात सेवा विस्ताराचे नियोजन सुलभ होईल. मॉडेल यशस्वी ठरल्यास या सुविधांचा विस्तार कोकण रेल्वेच्या इतर स्थानकांवरही करण्यात येईल. तसेच हा प्रकल्प दीर्घकालीन महसूल-वाटप (Revenue Sharing) पद्धतीवर व्यावसायिक स्वरूपात राबवला जाईल.

या प्रसंगी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा म्हणाले:

“ब्ल्यू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्ससोबतची भागीदारी आमच्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन प्रणालींच्या माध्यमातून कोकण रेल्वेला आधुनिक करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल उचलत आहोत. या सहकार्यामुळे प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक समृद्ध होईल आणि भारतीय रेल्वे क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला जाईल.”

Facebook Comments Box

नांदेड–पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाची खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे मागणी

बदलापूर, १०: मुंबई–कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड–पनवेल एक्सप्रेसचा मार्ग कल्याणमार्गे सावंतवाडी रोडपर्यंत वाढवण्याची मागणी बदलापूर येथील रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाने खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे केली.

या मंडळाच्या प्रतिनिधींनी खासदारांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कल्याण आणि कोकणदरम्यान थेट दैनंदिन रेल्वेसेवेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड–पुणे–पनवेल एक्सप्रेसला कल्याण जंक्शनमार्गे वळवून ती सावंतवाडीपर्यंत वाढवणे अत्यावश्यक आहे. या निर्णयामुळे पुणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध होईल.

तसेच सावंतवाडी टर्मिनसचे दुसऱ्या टप्प्याचे काम अपुऱ्या निधीअभावी थांबले असून, ते अमृत भारत स्टेशन योजनाअंतर्गत पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या अंतर्गत नवीन प्लॅटफॉर्म, शेड, पाण्याची आणि बसण्याची सुविधा तसेच फूटओव्हर ब्रिजचा विस्तार करावा, अशी सूचना देण्यात आली.

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरण किंवा क्षमतावृद्धीचा कोणताही सक्रिय प्रकल्प सध्या अस्तित्वात नाही; माहिती अधिकारातून धक्कादायक खुलासा

कोकण रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ म्हणून अस्तित्व हेच तिच्या विकासातील मुख्य अडथळा

   Follow us on    

 

 

Konkan Railway: अखंड रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तराच्या आधारे कोकण रेल्वेच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरण किंवा क्षमतेवृद्धीचा कोणताही सक्रिय प्रकल्प अस्तित्वात नाही.

२३ ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जास कोकण रेल्वे महामंडळाने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या उत्तरानुसार पुढील बाबी स्पष्ट झाल्या :

  • रोहा–वीर हा सुमारे ४७ किमीचा भाग वगळता इतर कोणत्याही विभागाच्या दुपदरीकरणास मान्यता नाही.

  • ठोकुर–मुकांबिका रोड आणि वैभववाडी–माजोर्डा विभागांचे व्यवहार्यता परीक्षण सुरू असून, कोणताही सक्रिय प्रस्ताव तयार नाही.

  • नवीन स्थानक बांधणीसाठी कोकण रेल्वेकडे निधी उपलब्ध नाही.

  • २०२३ नंतर दुपदरीकरणासाठी राज्य सरकारांसोबत रेल्वे मंत्रालयाचा कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.

या उत्तरानुसार सध्या कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरण किंवा क्षमतेवृद्धीचा कोणताही प्रत्यक्ष प्रकल्प प्रगतीपथावर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७-१८ मध्ये तयार केलेला क्षमतावृद्धीचा प्रस्ताव २०२३ मध्ये आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरल्याने नामंजूर करण्यात आला असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

महापदी यांनी नमूद केले की, कोकण रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ म्हणून अस्तित्व हेच तिच्या विकासातील मुख्य अडथळा ठरत आहे. स्वतंत्र रचनेमुळे या महामंडळाला केंद्रीय अर्थसंकल्पातून थेट निधी मिळत नाही. त्यामुळे दुपदरीकरण, सिग्नलिंग आणि नवीन स्थानके उभारणीसारख्या भांडवली प्रकल्पांना पुरेसा वित्तपुरवठा करणे शक्य होत नाही.

समितीने सुचवले आहे की, कोकण रेल्वे मार्गाचा भारतीय रेल्वेत समावेश करूनच या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होऊ शकते.
यासाठी –

  • रोहा–मडूरे विभाग : मध्य रेल्वेत

  • पेडणे–ठोकुर विभाग : दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) रेल्वेत
    अशा प्रकारे विलीनीकरण करण्याची मागणी समितीने केली आहे.

विलीनीकरणानंतर दुपदरीकरणासाठी रेल्वे अर्थसंकल्पातून थेट निधी उपलब्ध होईल, कोकण मार्गाला राष्ट्रीय व्यस्त मार्ग (High Density Route) दर्जा मिळेल तसेच स्थानकांचा विकास, प्रवासी सुविधा आणि गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.

महापदी यांनी पुढे म्हटले की, “कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. स्वतंत्र अभ्यासांवर आणि पुनर्परीक्षणांवर वायफळ खर्च करण्याऐवजी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.”

शेवटी त्यांनी नमूद केले की, कोकण रेल्वे हा देशाच्या पश्चिम किनारपट्टीचा धोरणात्मक दुवा आहे. मात्र सध्याच्या रचनेत दीर्घकालीन विकास शक्य नाही. त्यामुळे भारतीय रेल्वेशी विलीनीकरण हा अनिवार्य, व्यावहारिक आणि शाश्वत मार्ग आहे, असे मत अखंड रेल्वे प्रवासी सेवा समितीने व्यक्त केले आहे.

Facebook Comments Box

‘मेक इन लातूर’; ‘वंदे भारत’चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल-दुरुस्ती राजस्थानात होणार

   Follow us on    

 

 

जोधपूर : देशातील पहिला ‘वंदे भारत स्लीपर कोच’ आता मराठवाड्यातील लातूर येथे तयार केला जात आहे. ही रेल्वे कोच निर्मिती भारतातील मोठा औद्योगिक टप्पा मानला जात असून, या कोचची देखभाल आणि दुरुस्ती मात्र राजस्थानातील जोधपूर येथे करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहिल्या स्लीपर कोचचे काम जून २६ पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर हे स्लीपर कोच प्रवाशांच्या सेवेसाठी तयार होतील. सध्या लातूर येथे या कोचचे उत्पादन जलदगतीने सुरू आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या स्लीपर आवृत्तीमुळे देशांतर्गत लांब पल्ल्याच्या प्रवासाला नवीन वेग आणि आराम मिळणार आहे.

देखभाल-दुरुस्ती साठी राजस्थानात डेपो तयार

जोधपूर येथे ‘वंदे भारत स्लीपर कोच’च्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी विशेष डेपो तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या चार नवीन डेपो देशभरात उभारण्याचा प्रस्ताव आहे. हे डेपो दिल्ली, बिजनौर, मंगळुरू आणि मुंबईजवळ तयार करण्यात येतील.

या डेपोंमधून ट्रेनचे नियमित तांत्रिक तपासणी, दुरुस्ती आणि देखभाल केली जाईल. जोधपूर डेपोचे पहिले टप्पेचे काम २०२६ च्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कंपनीकडे कंत्राट

डेपो निर्मितीचे कंत्राट पुण्यातील नामांकित खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. या कंपनीने आधीच प्राथमिक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू केले आहे. जोधपूर डेपोमध्ये कोचची तांत्रिक तपासणी, सफाई, आणि लहान-मोठ्या दुरुस्तींचे काम होईल.

‘मेक इन लातूर’चा अभिमान

लातूर रेल कोच फॅक्टरीमध्ये तयार होणाऱ्या ‘वंदे भारत स्लीपर कोच’ला ‘मेक इन लातूर’ अशी ओळख मिळाली आहे. देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे कोच बनवले जात आहेत. या कोचमध्ये उत्तम गुणवत्ता, जास्त सुरक्षा आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी सुविधा देण्यात आल्या आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, पहिल्या टप्प्यात ११० स्लीपर कोच तयार होणार असून, दुसऱ्या टप्प्यात ही संख्या २०० पर्यंत वाढवली जाणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत देशभरात वंदे भारत स्लीपर ट्रेनचे जाळे मजबूत होईल.

एकंदरीत, लातूर येथे तयार होणारे स्लीपर कोच आणि राजस्थानात होणारी त्यांची देखभाल ही भारतीय रेल्वेच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेतील मोठी झेप ठरत आहे. ‘मेक इन लातूर’चा हा प्रकल्प मराठवाड्यासाठीही औद्योगिक विकासाचे नवे दार उघडणारा ठरणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search