धक्कादायक! बिअर पिण्याची स्पर्धा जिवावर बेतली; दोन तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

सण साजरा करण्यासाठी आनंदाने घरी आलेल्या दोन तरुण इंजिनिअर्सवर काळाने झडप घातली आहे. संक्रांतीच्या उत्सवात बिअर पिण्याची लावलेली एक जीवघेणी स्पर्धा या तरुणांच्या जीवावर बेतली. अतिमद्यप्राशनामुळे या दोन्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात घडली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मणिकुमार (वय ३५) आणि पुष्पराज (वय २२) अशी मृत तरुणांची नावे आहेत. मणिकुमार हे चेन्नईमध्ये तर पुष्पराज बेंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. संक्रांतीचा सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी ते आपल्या बंदावद्दीपल्ले या गावी आले होते.

​सणाच्या उत्साहात मित्रांसोबत मद्यप्राशन करत असताना, त्यांच्यात बिअर पिण्याची स्पर्धा लागली. ही स्पर्धा जिंकण्याच्या नादात दोघांनीही मर्यादेपेक्षा जास्त मद्यप्राशन केले. काही वेळातच दोघेही जागीच बेशुद्ध पडले.

​रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

​दोघेही बराच वेळ शुद्धीवर येत नसल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शरीरात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अल्कोहोल गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

​गावावर शोककळा, कुटुंबाचा आधार हरपला

​या घटनेमुळे संपूर्ण बंदावद्दीपल्ले गावावर शोककळा पसरली आहे.

​मणिकुमार यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी आणि दोन वर्षांच्या लहान मुलाचा आधार हरपला आहे.

​पुष्पराज हा तरुण अविवाहित होता आणि नुकताच करिअरमध्ये स्थिरावत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला.

​या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेने मद्यप्राशनाच्या अतिरेकाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Facebook Comments Box

”मीरा-भाईंदरचा महापौर मराठीच हवा; अन्यथा…” मराठी एकीकरण समितीचा इशारा

   Follow us on        

मीरा-भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदासाठी मराठी व्यक्तीचीच निवड व्हावी, अशी आक्रमक भूमिका मराठी एकीकरण समितीने घेतली आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला कडक इशारा दिला आहे.

काय म्हणाले गोवर्धन देशमुख?

देशमुख यांनी स्पष्ट केले की, मुंबईप्रमाणेच मीरा-भाईंदरमध्येही मराठी महापौर बसला पाहिजे. जर प्रशासनाने किंवा राजकीय पक्षांनी ‘अमराठी’ व्यक्तीला महापौर बनवण्याचा प्रयत्न केला, तर समिती गप्प बसणार नाही. त्यांनी पुढील मुद्दे मांडले:

रक्त सांडले तरी चालेल: “जर अमराठी महापौर बसवला, तर शहरात तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल किंवा माझे बलिदान द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही,” असे भावनिक आणि आक्रमक आवाहन त्यांनी केले.

पर्याय उपलब्ध: भाजपमध्ये अनिता पाटील, ध्रुवकिशोर पाटील यांसारखे अनेक अनुभवी मराठी चेहरे आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना डावलून अमराठी व्यक्तीला संधी दिल्यास ते सहन केले जाणार नाही.

*दुसरा ‘संयुक्त महाराष्ट्र’ लढा: जर मराठी अस्मितेचा विचार केला नाही, तर मीरा-भाईंदरमध्ये दुसऱ्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यासारखे चित्र पाहायला मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Facebook Comments Box

​’लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांच्या पडताळणीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी e-KYC करताना तांत्रिक चुका केल्या आहेत, अशा लाभार्थ्यांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) केली जाणार आहे. याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

​महाराष्ट्र राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांच्या पोषण आहारात सुधारणा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू राहण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती.

​तथापि, ही प्रक्रिया पूर्ण करताना अनेक लाभार्थ्यांकडून तांत्रिक कारणांमुळे किंवा माहितीअभावी चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक पात्र महिलांच्या अर्जांबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

​क्षेत्रीय स्तरावर होणार पडताळणी

​महिलांची गैरसोय टाळण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने आता प्रत्यक्ष मैदानी पडताळणीचा मार्ग निवडला आहे.

​अंगणवाडी सेविकांची भूमिका: अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन किंवा क्षेत्रीय स्तरावर कागदपत्रांची आणि अर्जातील माहितीची खातरजमा करतील.

​जिल्हाधिकाऱ्यांना आदेश: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या प्रक्रियेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

​”काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

— अदिती तटकरे, मंत्री, महिला व बालविकास विभाग.

​या निर्णयामुळे ज्या महिलांच्या e-KYC मध्ये चुका झाल्या होत्या, त्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Facebook Comments Box

राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा परभणी व नागपूर दौरा संपन्न

   Follow us on        

मुंबई (प्रतिनिधी):
राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्री. श्रीकांत सावंत यांचा परभणी आणि नागपूर जिल्ह्याचा दौरा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

धार्मिक महोत्सवात सहभाग
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील श्री क्षेत्र दत्तवाडी (नैकोटा) येथे प.पू. श्री नारायण दत्तानंद स्वामी आणि प.पू. श्री परमगुरु माधवाश्रम स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे तसेच दत्तवाडी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात श्रीकांत सावंत प्रामुख्याने सहभागी झाले होते.

दौऱ्याचा तपशील:

४ जानेवारी: श्री. सावंत यांनी खडका येथे भेट दिली, जिथे माधवाश्रम स्वामी यांनी जलसमाधी घेतली होती. तसेच येथील आश्रमाचे अध्यक्ष श्रीराम खडकेकर यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली.

५ व ६ जानेवारी: नागपूर येथे आयोजित ‘सुदर्शन क्रिया’ आणि ‘रुद्राभिषेक’ कार्यक्रमात ते सहभागी झाले.

दत्तहोम: ६ जानेवारी रोजी परदेशी नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘ऑनलाइन दत्तहोम’ कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी शंकरानंद यांच्या अधिपत्याखाली करण्यात आले होते.


सत्कार आणि भावना
याप्रसंगी श्री. श्रीकांत सावंत यांचा श्रीफळ आणि प्रसाद देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. “या अतिशय सुंदर महोत्सवात सहभागी होता आले आणि ऋषी देवव्रत व इतर स्वामींचे सानिध्य लाभले, हे माझे भाग्य आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या समाजजागृती आणि राष्ट्रजागृतीच्या कार्यासाठी आपले मार्गदर्शन व सहकार्य सदैव कायम राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

Facebook Comments Box

राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफी, सवलत कोणाला मिळणार? NHAI ने जाहीर केले नियम

   Follow us on    

 

 

NHAI: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल प्लाझावर आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून कोणाला सूट मिळेल आणि कोणाला सवलत मिळेल, याचे नियम स्पष्ट केले आहेत. हे नियम प्रामुख्याने नियम ११ (पूर्ण सूट) आणि नियम ९ (सवलतीचे पासेस) अंतर्गत विभागलेले आहेत.

​१. नियम ११: टोल शुल्कातून पूर्ण सूट (Exemption)

​खालील व्यक्ती किंवा वाहनांना टोल भरण्यापासून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे:

​अ) महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी (Transporting and Accompanying):

  • ​भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान.
  • ​राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री.
  • ​भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश.
  • ​लोकसभा/राज्यसभेचे अध्यक्ष, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री.
  • ​केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल.
  • ​तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (Full General किंवा समतुल्य रँक) आणि लष्करी कमांडर.
  • ​संसद सदस्य (MP), राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्र सरकारचे सचिव.
  • ​परदेशी पाहुणे (अधिकृत राज्य दौऱ्यावर असलेले).
  • ​आमदार आणि विधान परिषद सदस्य (MLA/MLC): संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेले ओळखपत्र दाखवल्यास (त्यांच्या राज्यात).
  • ​वीरता पुरस्कार विजेते: परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्र विजेते (ओळखपत्र आवश्यक).

​ब) अधिकृत कामासाठी वापरली जाणारी वाहने:

  • ​संरक्षण मंत्रालय, निमलष्करी दल आणि गणवेशातील पोलीस.
  • ​कार्यकारी दंडाधिकारी (Executive Magistrate).
  • ​अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिका.
  • ​अंत्यविधीसाठी वापरली जाणारी वाहने.
  • ​दिव्यांग व्यक्तींसाठी खास बनवलेली वाहने.
  • ​महामार्ग पाहणी किंवा देखभालीसाठी वापरली जाणारी NHAI ची वाहने.

​२. नियम ९: टोल शुल्कात सवलत आणि मासिक पासेस (Discounts)

​जे लोक वारंवार प्रवास करतात किंवा टोल प्लाझाच्या जवळ राहतात, त्यांच्यासाठी विशेष सवलती आहेत:

​रिटर्न जर्नी (२४ तासांत): जर तुम्ही २४ तासांच्या आत परत येणार असाल, तर एकूण शुल्काच्या दीडपट (1.5 times) रक्कम भरून परतीचा पास घेऊ शकता.

​मासिक पास (५० फेऱ्या): एका महिन्यात ५० एकेरी फेऱ्यांसाठी एकूण शुल्काच्या दोन-तृतीयांश (2/3) रक्कम भरून पास घेता येतो.

​स्थानिक रहिवाशांसाठी सवलत (२० किमी मर्यादा):

​ज्या व्यक्ती टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या परिघात राहतात आणि त्यांच्याकडे बिगर-व्यावसायिक वाहन आहे, त्यांना सवलतीचा मासिक पास मिळू शकतो.

​ही सवलत तेव्हाच मिळते जेव्हा तिथे पर्यायी रस्ता किंवा सेवा रस्ता (Service Road) उपलब्ध नसतो.

​जिल्हास्तरीय सवलत: संबंधित जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या आणि नॅशनल परमिट नसलेल्या वाहनांना जिल्ह्यातील टोलवर ५०% सवलत मिळू शकते.

​विशेष टीप: जर एखादे वाहन राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग वापरत असेल परंतु टोल प्लाझा ओलांडत नसेल, तर त्या वाहनाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

 

Facebook Comments Box

मोठी बातमी:१० एक्सप्रेस गाड्यांची सेवा आता पनवेल, एलटीटी पर्यंतच; कोकणसह दक्षिणेकडील प्रवाशांचा त्रास वाढणार

   Follow us on    

 

 

मुंबई: मध्य रेल्वे (CR) ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि दादर येथून धावणाऱ्या 10 लांब पल्ल्याच्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. या निर्णयामुळे पीक अवर्समध्ये स्थानिक गाड्यांसाठी अधिक मार्गिका उपलब्ध होतील आणि विलंबात घट होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

यातील ज्या गाड्या एलटीटी टर्मिनस येथे स्थलांतरित करण्यात येणार्‍या चार गाड्यांची नावे हाती आली असून ती खालील प्रमाणे आहेत.

एलटीटी टर्मिनस येथे स्थलांतरित करण्यात गाड्यांची नावे खालीलप्रमाणे 

  • 22629 दादर – तिरुनेलवेली एक्सप्रेस (कोकण रेल्वे मार्गे)
  • 16331 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –तिरुवनंतपुरम (टीव्हीसी) एक्सप्रेस
  • 16351 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोईल एक्सप्रेस
  • 16339 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोईल एक्सप्रेस

या बदलामुळे सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या गर्दीच्या वेळेत सुमारे 40 ते 50 हजार अतिरिक्त प्रवाशांना स्थानिक सेवांचा लाभ मिळू शकतो. सध्या CSMT आणि दादर येथे उशिरा येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे स्थानिक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते, त्यामुळे दररोज अनेक लोकल गाड्या विलंबाने धावतात.

CR च्या योजनेनुसार काही लांब पल्ल्याच्या गाड्या CSMT आणि दादरऐवजी LTT किंवा पनवेल येथे सुरू–समाप्त केल्या जातील. यामुळे CSMT–कसारा/कर्जत मार्गावर सुमारे 15 अतिरिक्त उपनगरीय लोकल सेवा चालवणे शक्य होईल. तसेच काही गाड्यांचे वेळापत्रक 10 मिनिटांपर्यंत बदलण्याचाही विचार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा बदल केवळ टर्मिनस बदलण्यापुरता मर्यादित नसून, काही गाड्यांचे डबे वाढवून प्रवासी क्षमता वाढवण्याचाही प्रस्ताव आहे.

मात्र, प्रवासी संघटनांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. LTT किंवा पनवेल येथे टर्मिनस बदलल्यास लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अतिरिक्त अंतर व वाहतुकीचा त्रास सहन करावा लागू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

Facebook Comments Box

मोडी लिपी मोफत प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात प्रारंभ

   Follow us on    

 

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी संस्कृतीचा अभिमान मानल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या मोडी लिपीच्या संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी “श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल” आणि “शिवस्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोडी लिपी – मोफत शिकवणी वर्गाचा १८ जानेवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. मोडी लिपीचा प्रसार व्हावा आणि तिचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे प्रशिक्षण शिबिर एकूण १० रविवार चालणार असून दर रविवारी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत वर्ग घेतले जाणार आहेत. शिबिराच्या पहिल्याच दिवशी विविध वयोगटांतील मोडी लिपीप्रेमी, इतिहास अभ्यासक तसेच नवशिक्या प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे वर्ग डॉक्टर गायकवाड‘स इन्स्टिट्यूट, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहेत.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये मोडी लिपीची मूलभूत ओळख, अक्षररचना व लेखनपद्धती, प्राथमिक वाचन–लेखन प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासोबतच वैयक्तिक मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. या वर्गांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन वनिता साळुंखे या करत असून त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे प्रशिक्षण अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि प्रभावी ठरत आहे.

या प्रशिक्षण शिबिराच्या प्रारंभप्रसंगी प्रवीण जाधव (शिव स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान संस्था अध्यक्ष) आणि रुपेश पवार (मोडी लिपी आणि इतिहास अभ्यासक) यांची उपस्थिती लाभली. मोडी लिपी शिकणे म्हणजे आपल्या वैभवशाली इतिहासातील बखरी, राजपत्रे, दस्तऐवज व शिलालेखांशी थेट नाते जोडण्याची दुर्मिळ आणि अमूल्य संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. मोडी लिपीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Facebook Comments Box

‘सगुणा बाग’ ते राष्ट्रपती भवन: चंद्रशेखर भडसावळे यांच्या ​’शून्य-नांगरणी तंत्रज्ञांना’ ची मोठी दखल.

   Follow us on    

 

 

मुंबई/नवी दिल्ली:

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष ‘ॲट होम’ (At Home) स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि  सगुणा बाग’चे संस्थापक चंद्रशेखर हरी भडसावळे (कृषिरत्न) यांना विशेष निमंत्रण धाडण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला असून, यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​चंद्रशेखर भडसावळे यांनी गेल्या अनेक दशकांपासून शेती क्षेत्रात अत्यंत नाविन्यपूर्ण आणि शाश्वत प्रयोग केले आहेत. त्यांच्या खालील कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे:

​सगुणा राईस तंत्रज्ञान (SRT): शून्य-नांगरणी (Zero-Till) तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेती कशी फायदेशीर करता येते, याचे यशस्वी मॉडेल त्यांनी जगासमोर ठेवले.

​नैसर्गिक शेतीचा प्रसार: रसायनांचा वापर कमी करून जमिनीचा पोत सुधारण्यावर त्यांनी भर दिला.

​कृषी पर्यटन (Agri-Tourism): शेतकऱ्याला शेतीसोबतच पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नाचा नवा स्रोत मिळवून देण्यात ‘सगुणा बाग’ने दिशादर्शक काम केले आहे.

​जलसंवर्धन आणि ग्रामीण विकास: पाण्याचे नियोजन आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान मोठे आहे.

​’ॲट होम’ समारंभ काय असतो?

​प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवर ‘ॲट होम’ हा भव्य सोहळा आयोजित केला जातो. या कार्यक्रमात राष्ट्रपती आणि पंतप्रधान उपस्थित असतात. यंदा देशभरातील विविध क्षेत्रांत (कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा आणि कृषी) उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक २५० विशेष व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित यादीत भडसावळे यांच्या नावाचा समावेश असणे, ही महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.

​शून्य-नांगरणी तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैशांची मोठी बचत झाली आहे. भडसावळे यांनी केवळ शेती केली नाही, तर ती एक शास्त्र म्हणून विकसित केली. त्यांच्या या निमंत्रणामुळे पारंपरिक शेतीला आधुनिक आणि शाश्वत जोड देणाऱ्या प्रयोगांचा गौरव झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सगुणा बाग ही रायगड जिल्ह्यातील माथेरानच्या पायथ्याशी वसलेली आहे. हे ठिकाण केवळ एक शेती नसून, ते कृषी पर्यटन (Agri-Tourism) आणि शाश्वत शेतीचे (Sustainable Farming) एक मोठे केंद्र बनले आहे. तिथे त्यांनी विकसित केलेले ‘सगुणा राईस तंत्रज्ञान’ (SRT) पाहण्यासाठी देशभरातून शेतकरी आणि पर्यटक येत असतात.

 

Facebook Comments Box

Mumbai Local: मुंबई लोकल वेळेवर धावणार; मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

   Follow us on    

 

 

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील प्रवाशांचा वाढता भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियोजनानुसार, काही एक्स्प्रेस गाड्या आता सीएसएमटीपर्यंत न येता केवळ लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पर्यंतच चालवल्या जाणार आहेत.

​मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या सीएसएमटी स्थानकावर दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते, ज्यामुळे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे मार्गांवर मोठा ताण निर्माण होतो. हा ताण सुसह्य करण्यासाठी आणि गाड्यांच्या वेळापत्रकात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाने ठराविक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे टर्मिनस बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसचा वापर अधिक प्रभावीपणे होईल आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल.

​हा निर्णय विशेषतः उपनगरीय लोकल प्रवाशांसाठीही दिलासादायक ठरू शकतो, कारण एक्स्प्रेस गाड्यांची संख्या सीएसएमटीवर कमी झाल्यामुळे लोकल गाड्यांच्या संचालनात येणारे अडथळे कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या प्रवाशांना थेट दक्षिण मुंबईत जायचे आहे, त्यांना आता कुर्ल्याला उतरून पुढील प्रवास करावा लागणार आहे.

Facebook Comments Box

Shaktipeeth Expressway: ८०४ किमीचा महामार्ग झाला ८४० किमी. मोजणी पूर्ण; आता भूसंपादनाची प्रतीक्षा

   Follow us on    

 

 

नागपूर: राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) ‘शक्तीपीठ’ महामार्गाच्या कामाला आता वेग आला असून, या मार्गाच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारने सांगलीपर्यंतच्या आखणीस आणि भूसंपादनास मान्यता दिली होती, ज्यानुसार आतापर्यंत १५० पेक्षा जास्त गावांमधील जमीन मोजणीचे काम यशस्वीरीत्या पार पडले आहे. या महामार्गाच्या आराखड्यात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, सातारा जिल्ह्यातील काही भागांचा यात नव्याने समावेश करण्यात आला आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून हा मार्ग वळवण्यात आल्यामुळे महामार्गाची एकूण लांबी आता ८०२ किलोमीटरवरून वाढून ८४० किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाने २० हजार ७८७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, एमएसआरडीसीकडून उर्वरित तांत्रिक कामेही पूर्णत्वास येत आहेत.

​हा महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा एकूण १२ जिल्ह्यांतील ३९ तालुके आणि ३७० गावांमधून जाणार आहे. या महामार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे राज्यातील तीन प्रमुख शक्तीपीठे—माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर यांना एकमेकांशी जोडणार आहे. याव्यतिरिक्त परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, पंढरपूर आणि नरसोबाची वाडी यांसारख्या एकूण १८ धार्मिक स्थळांना हा मार्ग जोडणार असल्याने राज्यात धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, कागल यांसारख्या तालुक्यांच्या आखणीची अधिसूचना आधी रद्द करण्यात आली होती, मात्र आता नवीन बदलांसह हा प्रकल्प भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मोजणी पूर्ण झाल्यामुळे आता बाधित शेतकऱ्यांना दिलासा देऊन प्रत्यक्ष जमीन संपादन प्रक्रिया कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search