Konkan Railway: फुकट्या प्रवाशांची आता खैर नाही; उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तपासणी तीव्र

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आपल्या मार्गावर विनातिकीट आणि अनधिकृत प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. नुकत्याच संपलेल्या एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात कोकण रेल्वेने ९३४ तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या कारवाई दरम्यान तब्बल ३७,००० विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रेल्वे भाडे आणि दंडापोटी २.९० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच, आर्थिक वर्ष २०२५-२६ या संपूर्ण वर्षभरात रेल्वेने एकूण ११,३९४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या वर्षभराच्या मोहिमेत ४,९९,६७५ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण २७.६८ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

आगामी उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता, कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण मार्गावर ही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वे अधिकारी यांच्या संयुक्त समन्वयाने ही मोहीम राबवली जाणार आहे, जेणेकरून अधिकृत प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि त्रासमुक्त होईल. कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकिटासह सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror App’ डाऊनलोड करावे, असेही रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

 

Facebook Comments Box

मडगाव-पनवेल स्पेशल गाडीच्या डब्याला भीषण आग; घातपाताचा संशय

   Follow us on        

मडगाव, ता. २९: गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी एका मोठ्या दुर्घटनेत मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाडीच्या एका डब्याला दुपारी २:५० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही गाडी पनवेलच्या दिशेने रवाना होणार असल्याने स्थानकाच्या आउटर ट्रॅकवर उभी करण्यात आली होती. अचानक इंजिनलागतच्या डब्यातून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखत १४ अग्निशमन सिलिंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की ती काही वेळातच नियंत्रणाबाहेर गेली आणि यात रेल्वेचा एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने, घटना घडली तेव्हा गाडीत एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

​आग इतर डब्यांपर्यंत पसरू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलत आग लागलेला डबा इतर डब्यांपासून वेगळा केला. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे मार्गावरील २५ केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीजवाहिनी तात्काळ बंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, स्थानक परिसरात अग्निशमन बंबाला थेट आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या. अखेर जवानांनी ईएसआय इस्पितळासमोरील जागेत अग्निशमन बंब उभे केले आणि तेथून लांब पाईप्स जोडून पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.

​दरम्यान, प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नसून, ती कोणीतरी मुद्दामहून लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनीही माध्यमांशी बोलताना या घटनेत घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची कोकण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्याकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वेने स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होईल.

Facebook Comments Box

प्रवाशांना खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावरील अजून एक गाडी नियमितपणे धावणार


   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत स्पेशल ट्रेन (०९०५७ / ०९०५८) आता नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन आता नवीन क्रमांकासह म्हणजेच ट्रेन क्रमांक १९०५७ / १९०५८ सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत (बाय-वीकली) एक्सप्रेस म्हणून आठवड्यातून दोनदा धावणार आहे. या निर्णयामुळे दक्षिण भारत, कोकण आणि गुजरातला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि निश्चित होणार आहे.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १९०५७ सुरत – मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस दिनांक ३ जून २०२६ पासून दर बुधवार आणि रविवारी सुरत स्थानकावरून संध्याकाळी १९:३५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५ वाजता मंगळुरू जंक्शन येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक १९०५८ मंगळुरू जंक्शन – सुरत एक्सप्रेस दिनांक ४ जून २०२६ पासून दर गुरुवार आणि सोमवारी मंगळुरू जंक्शनवरून रात्री २२:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:४५ वाजता सुरत स्थानकावर पोहोचेल.

​या एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे. याशिवाय गुजरात आणि गोव्यातील प्रमुख स्थानकांसह कर्नाटकच्या किनारपट्टीवरील मुरुडेश्वर, भटकळ, उडुपी यांसारख्या ३0 हून अधिक स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे. यामुळे कोकण पट्ट्यातील आणि इतर भागांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​या ट्रेनची रचना एकूण २० डब्यांची असणार आहे, ज्यामध्ये २ टायर एसीचा १ कोच, ३ टायर एसीचे ७ कोच, स्लीपर क्लासचे ६ कोच, जनरलचे ४ कोच आणि एसएलआर/डी चे २ डबे समाविष्ट असतील. प्रवाशांना या ट्रेनचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती मिळवण्यासाठी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Facebook Comments Box

Vande Bharat Express: भारताची ‘वंदे भारत’ परदेशातही धावणार

   Follow us on        

​नवी दिल्ली: कधीकाळी रेल्वे तंत्रज्ञानासाठी जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इंग्लंडसारख्या परदेशांवर अवलंबून असलेला भारत आता जागतिक रेल्वे बाजारपेठेत एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. भारताची स्वदेशी बनावटीची आणि सेमी-हाय-स्पीड ट्रेन ‘वंदे भारत’ आता लवकरच परदेशी रेल्वे मार्गांवर धावताना दिसणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी अभियांत्रिकी सल्लागार कंपनी ‘राईट्स लिमिटेड’ (RITES) केंद्र सरकारसोबत मिळून वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीसाठी एक विशेष रोडमॅप तयार करत आहे. या माध्यमातून भारत रेल्वे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीन आणि जपानसारख्या बलाढ्य देशांना थेट टक्कर देणार आहे.

​सध्या भारतात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन्स या प्रामुख्याने ‘ब्रॉड-गेज’ (Broad-Gauge) ट्रॅकवर चालतात. परंतु, परदेशांमधील रेल्वे नेटवर्क हे बहुतांश करून ‘स्टँडर्ड-गेज’ (Standard-Gauge) ट्रॅकवर आधारित असते. म्हणूनच जागतिक बाजारपेठेची ही गरज ओळखून, राईट्स लिमिटेड आणि भारतीय रेल्वे सध्या स्टँडर्ड-गेजवर चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे डिझाइन विकसित करण्याचे काम वेगाने करत आहेत. या नव्या डिझाइनमुळे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी खर्चात आधुनिक आणि जागतिक दर्जाची रेल्वे उत्पादने पुरवणारा देश म्हणून आपली ओळख निर्माण करता येणार आहे.

​या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सुरुवातीला भारताचे शेजारील देश जसे की बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ यांनी वंदे भारत ट्रेन खरेदी करण्यात मोठी उत्सुकता दर्शवली आहे. याव्यतिरिक्त, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील काही देशांनीही या ट्रेनच्या खरेदीसाठी रस दाखवला आहे, जिथे राईट्स कंपनीचे आधीपासूनच रेल्वे ऑपरेशन्स सुरू आहेत. मेक इन इंडिया मोहिमेचा हा एक मोठा टप्पा मानला जात असून, ही योजना यशस्वी झाल्यास आगामी काळात परदेशी रेल्वे मार्गांवर ‘मेड इन इंडिया’ वंदे भारत ट्रेन दिमाखात धावताना पाहायला मिळेल.

Facebook Comments Box

Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत!

   Follow us on        

नवी दिल्ली: पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. भारतीय रेल्वेने उत्तर भारतातील ‘जिंद-सोनीपत’ या ८९ किलोमीटरच्या मार्गावर या हायड्रोजन ट्रेनला धावण्यासाठी मंजुरी दिली आहे. रेल्वेच्या इतिहासात हा एक नवा ‘हायड्रोजन’ अध्याय मानला जात असून, ही संपूर्ण स्वदेशी रेल्वे रुळांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. हरित क्रांतीचा हा निळा हुंकार भारताला जागतिक महासत्तांच्या पंक्तीत नेऊन ठेवणारा ठरेल.

​प्रगत तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये:

या हायड्रोजन ट्रेनमध्ये १४०० किलोवॅट क्षमतेची अत्याधुनिक ‘हायड्रोजन फ्युएल सेल प्रॉपल्शन प्रणाली’ वापरण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन ताशी १४० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. या तंत्रज्ञानाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यामध्ये हायड्रोजनच्या रासायनिक प्रक्रियेतून वीज निर्माण केली जाते आणि उपउत्पादन म्हणून केवळ पाण्याचे थेंब उत्सर्जित होतात. त्यामुळे ही रेल्वे पर्यावरणपूरक वाहतुकीचे एक आदर्श उदाहरण ठरणार आहे.

​जागतिक पातळीवर भारताचे स्थान:

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भारताने जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांसारख्या प्रगत देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. हायड्रोजन आधारित रेल्वे प्रणाली अजूनही जागतिक स्तरावर प्रारंभिक टप्प्यात असून, अत्यंत कमी देशांकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेचा हा प्रयोग देशाच्या तांत्रिक प्रगतीसाठी मैलाचा दगड मानला जात आहे.

​सुरक्षा आणि मंजुरी:

जिंद येथे स्वदेशी हायड्रोजन साठवण आणि इंधन पुरवठा सुविधा उभारण्यात आली असून; पेट्रोलियम आणि स्फोटक पदार्थ सुरक्षा संघटनेने (PESO) यासाठी आवश्यक परवानग्या दिल्या आहेत. तसेच, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CRS) आणि मानक मंडळाने (RDSO) या हायड्रोजन रेल्वे आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या चाचणीला मान्यता दिली आहे. या प्रणालीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना, नियमित तपासणी आणि प्रमाणित कार्यपद्धतीची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

Facebook Comments Box

Sawantwadi: ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फूड प्लाझा, बोटिंगसह ईतर प्रकल्पांचा आराखडा तयार

   Follow us on        

सावंतवाडी:सुमारे १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि सावंतवाडीची शान असलेल्या ‘मोती तलावाचा’ आता पूर्णपणे कायापालट होणार असून या ऐतिहासिक तलावाला नवसंजीवनी मिळणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तलावाचा ऐतिहासिक लुक कायम ठेवून परिसराचा विकास केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याचे (प्रोजेक्ट) सादरीकरण महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले व युवराज लखमराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. हा दूरदृष्टी आराखडा ‘रतन जे. बटलीबोई कन्सल्टंट्स प्रा. लि.’ आणि ‘ईडन एलएलपी’ यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.

​तलावाच्या सौंदर्यीकरणासोबतच त्याच्या संवर्धनासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. तलाव परिसरातील भिंतींचे संरक्षण करण्यासोबतच, तलावातील पाणी गढूळ होऊ नये म्हणून ‘फिल्टर प्लांट’ बसवण्यात येणार आहे, ज्यामुळे केवळ स्वच्छ पाणीच तलावात जाईल आणि माती आत जाणार नाही. पर्यटनाला चालना देण्यासाठी तलावाच्या खाऊ गल्लीसाठीच्या आरक्षित भागात वाढ करून तिथे भव्य ‘फूड प्लाझा’ आणि ‘बोटिंग प्रोजेक्ट’ उभारला जाणार आहे. याशिवाय, फेस्टिव्हल मार्केटसाठी स्वतंत्र जागा, हँड क्राफ्टसह कलावंतांसाठी राखीव जागा आणि स्थानिक कलाप्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राजवाड्यासमोर ‘ओपन एम्फीथिएटर’ उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

​या प्रकल्पात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटकांसाठी विशेष बैठक व्यवस्था केली जाणार आहे. ऐतिहासिक टच असलेल्या बैठकांसह तलावाच्या काठावर बसून निसर्गरम्य दृश्य पाहता येईल अशी व्यवस्था केली जाईल. गणेश विसर्जनाचा भाग देखील ‘व्ह्यू पॉईंट’ म्हणून विकसित केला जाणार आहे. सुमारे ३१ एकर क्षेत्रात पसरलेल्या या ऐतिहासिक मोती तलावाला ग्लोबल स्तरावर ओळख मिळवून देणे आणि शहराबाहेरून जाणारा पर्यटक सावंतवाडीकडे कसा वळेल यासाठी आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही युवराज लखमराजे भोसले यांनी दिली. तसेच, आपल्या कारकिर्दीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी व्यक्त केला असून, या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Facebook Comments Box

रेल्वे प्रवाशांना आरक्षित जागा नाकारणे पडले महाग; तिकीट दराच्या १० पट दंड भरण्याचे न्यायालयाचे आदेश

   Follow us on        

भोजपूर:’एलटीटी पाटणा एक्सप्रेस’ (LTT Patna Express) मधून विंध्याचल (मिर्झापूर, उत्तर प्रदेश) ते आरा (भोजपूर, बिहार) असा प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांना कन्फर्म तिकीट असूनही संपूर्ण प्रवास उभे राहून करावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रवासी ट्रेनमध्ये चढले तेव्हा त्यांच्या आरक्षित जागांवर आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी ताबा मिळवला होता.

प्रवाशांनी याविरोधात रेल्वे हेल्पलाईन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (रेल्वे सेवा आणि रेल्वे मंत्रालय) वर तक्रार नोंदवली. त्यांना एसएमएसद्वारे तक्रार क्रमांक मिळाला, परंतु प्रवासादरम्यान कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही. पुढे बक्सर स्थानकावर तिकीट तपासनीस (TTE) आल्यावर प्रवाशांनी हा मुद्दा पुन्हा मांडला, परंतु गर्दीचे कारण सांगून त्यांना ‘मॅनेज’ करण्याचा सल्ला देण्यात आला. या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांना तीव्र मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले.

​या प्रकरणी ‘भोजपूर ग्राहक विवाद निवारण आयोगाने’ (Bhojpur Consumer Disputes Redressal Commission) रेल्वे प्रशासनाला मोठा दणका दिला आहे. कृष्णा प्रताप सिंह (अध्यक्ष) आणि कमल किशोर सिंह (सदस्य) यांच्या खंडपीठाने प्रवाशांचे तिकीट, तक्रार नोंदी, मेसेज आणि छायाचित्रे तपासून रेल्वेला दोषी ठरवले.

आयोगाने रेल्वेला तिकीट दराच्या अंदाजे १० पट म्हणजेच २०,००० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, तिकिटाची मूळ रक्कम १,८७६.८० रुपये वार्षिक ८% व्याजासह परत करण्याचे आणि कायदेशीर खर्चासाठी १५,००० रुपये ६० दिवसांच्या आत देण्याचे निर्देश दिले आहेत. जर रेल्वेने ही रक्कम वेळेत दिली नाही, तर प्रवाशांना वार्षिक १०% व्याजासह ती वसूल करण्याचा अधिकार असेल. दरम्यान, रेल्वेने हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगत हा भाग रेल्वे पोलिसांच्या (GRP) अखत्यारीत येत असल्याचा युक्तिवाद केला होता, जो आयोगाने फेटाळून लावला.

Facebook Comments Box

डिझेल वाचवणार्‍या एसटी चालकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; परिवहन मंत्र्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई: वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील एसटी महामंडळाने डिझेलची बचत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जे एसटी चालक योग्य ड्रायव्हिंग तंत्राचा वापर करून इंधनाची बचत करतील, त्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढणाऱ्या डिझेलच्या किमतींमुळे महामंडळावरील आर्थिक भार वाढला असून, सर्व विभागीय नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना आपापल्या आगारांसाठी डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या पुणे शहरात डिझेलचा दर प्रति लीटर ९८.१५ रुपये इतका आहे.

​एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १६,००० बसेस असून, इलेक्ट्रिक बसेसचा समावेश संथ गतीने होत असल्याने अद्याप बहुतांश गाड्या डिझेलवरच चालतात. सध्या ताफ्यात केवळ ७३८ इलेक्ट्रिक बसेस असून, मार्च २०२७ पर्यंत आणखी २,३०० ई-बसेस दाखल होण्याची अपेक्षा आहे. इंधन दरवाढीमुळे महामंडळ भाडेवाढीचा विचार करत असले, तरी सध्या चालकांच्या माध्यमातून खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे. परिवहन मंत्र्यांच्या मते, एक कुशल चालक महामंडळाचे लाखो रुपये वाचवू शकतो. जर प्रत्येक आगाराने दररोज केवळ ५ लीटर डिझेल वाचवले, तरी राज्यभरात रोज १,००० लीटरपेक्षा जास्त डिझेल वाचू शकते, ज्यामुळे दररोज सुमारे १ लाख रुपयांची बचत होईल.

​दुसरीकडे, ज्या चालकांच्या गाड्यांचे मायलेज (KPL – किलोमीटर प्रति लीटर) चुकीच्या ड्रायव्हिंग पद्धतीमुळे कमी येईल, अशा चालकांचे समुपदेशन केले जाईल आणि त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणात योग्य गती राखणे, गिअरचा अचूक वापर, विनाकारण इंजिन चालू न ठेवणे आणि योग्य ब्रेक तंत्राचा वापर यावर लक्ष केंद्रित केले जाईल. याशिवाय, वाहनांमधील तांत्रिक त्रुटी जसे की टायरमधील हवेचा कमी दाब, इंजिन ट्युनिंगमधील बिघाड किंवा ऑइल गळती यामुळेही इंधन वाया जाते; त्यामुळे आगारांना गाड्यांची दैनंदिन तांत्रिक तपासणी आणि वेळेवर दुरुस्ती करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत

Facebook Comments Box

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेने विशेष ब्लॉकचा कालावधी वाढवला; अनेक एक्स्प्रेस गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मेन लाईनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे लागू करण्यात आलेल्या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला रेल्वे प्रशासनाने आता १३ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या कालावधीत निवडक मेल/एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर आणि ठाणे स्थानकांवरच ‘शॉर्ट टर्मिनेट’ (प्रवास आधीच संपवणे) केल्या जातील.

​ब्लॉक वाढवण्याचे कारण काय?

​रेल लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (RLDA) द्वारे सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिकीकरण आणि इतर आवश्यक कामे केली जात आहेत.

​यापूर्वी हा ब्लॉक दिनांक ०१.०२.२०२६ ते २६.०४.२०२६ पर्यंत लागू करण्यात आला होता, त्यानंतर तो १९.०५.२०२६ पर्यंत वाढवला गेला आणि आता कामाची व्याप्ती पाहता ही मुदत १३ जून २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

​या गाड्या धावणार फक्त दादर आणि ठाणे पर्यंतच

​दिनांक १३.०६.२०२६ रोजी प्रवास सुरू होणाऱ्या (JCO) खालील गाड्या सीएसएमटी पर्यंत न जाता आधीच थांबवल्या जातील:

​१. दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या:

​गाडी क्र. १२११२: अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. ११००२: बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस

​गाडी क्र. १२८१०: हावडा – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. ११M२०: भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१४४: बिदर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१०८: लातूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१२०: मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस

​२. ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी:

​गाडी क्र. १२१३४: मंगळूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​रेल्वे प्रशासनाचे आवाहन

“पायाभूत सुविधांची देखभाल, सुरक्षा आणि आधुनिकीकरणासाठी हे ब्लॉक्स अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे,” असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या बदलांचा विचार करून करावे.

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: गोव्यातील पट्ट्यासाठी केंद्राकडून १,८८० कोटी मंजूर

   Follow us on        

गोव्याच्या वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66) अंतर्गत कुंकळिम ते बेंडोरेडेम या टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तब्बल १,८८० कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (DPR) मंजुरी दिली आहे. या मोठ्या निधीमुळे या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे.

गोवा सरकारने केंद्राकडे सादर केलेल्या या महामार्ग प्रकल्पामध्ये केवळ रस्ता रुंदीकरणच नाही, तर इतर आधुनिक सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत कुंकळिम आणि बल्ली या भागांमध्ये आधुनिक बायपास (वळण रस्ते) उभारले जाणार आहेत. वाढती वाहतूक, स्थानिक शहरांमधील वाढती गर्दी आणि प्रवासातील विलंब लक्षात घेता, हा प्रकल्प भविष्यातील वाहतूक गरजांचा विचार करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आला आहे.

केंद्राकडून या भव्य प्रकल्पाला आणि निधीला मंजुरी मिळाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत. केंद्र सरकारच्या या सहकार्यामुळे गोव्याच्या दळणवळण क्षेत्रात मोठे परिवर्तन घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या महामार्ग प्रकल्पामुळे प्रामुख्याने दक्षिण गोव्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. नवीन रस्त्यांमुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्थानिक शहरांमधील मुख्य वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास यामुळे मोठी मदत होणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search