कर्जत:
ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या राजमाची परिसरात थरारक बचाव मोहीम राबवत रायगड पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता आणि जनसेवेची बांधिलकी सिद्ध केली आहे. ठाणे जिल्ह्यातून कर्जत येथे राजमाची परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या पाच तरुणांपैकी तीन जण घनदाट जंगलात वाट चुकल्याची घटना घडली. मात्र, आपत्कालीन ‘डायल ११२’ हेल्पलाइनवर माहिती मिळताच रायगड पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या तिन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याहून पाच मित्रांचा गट कर्जत तालुक्यातील राजमाची भागात ट्रेकिंगसाठी आला होता. दुर्गम आणि घनदाट परिसरात भ्रमंती करत असताना त्यातील तीन तरुण अचानक मुख्य रस्ता भटकले आणि जंगलात भरकटले. सायंकाळच्या वेळी अंधार पडू लागल्याने आणि आजूबाजूला घनदाट झाडी असल्याने तरुणांमध्ये घबराट पसरली. या परिस्थितीची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने ‘डायल ११२’ या पोलीस हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून मदतीची याचना केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जत पोलीस ठाण्याच्या पथकाने कसलाही विलंब न लावता तातडीने राजमाची परिसराकडे धाव घेतली. मुसळधार पाऊस, दाट धुके, प्रतिकूल हवामान आणि अंधार अशा भीषण आव्हानांचा सामना करत पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि ट्रेकर्सच्या सहकार्याने शोधमोहीम सुरू केली. मध्यरात्रीच्या सुमारास जंगलाचा कोपरा अन् कोपरा पालथा घालत पोलिसांनी अत्यंत शिताफीने या तिन्ही तरुणांचा शोध घेतला आणि त्यांना सुरक्षितस्थळी आणले. पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, सुखरूप बचावलेल्या तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी रायगड पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
दरम्यान, या यशस्वी बचाव मोहिमेनंतर रायगड पोलीस प्रशासनाने सर्व पर्यटकांना आणि ट्रेकर्सना सुरक्षेचे आवाहन केले आहे. “राजमाचीसारखा परिसर अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ आहे. पावसाळ्यात किंवा अंधार पडल्यानंतर येथे वाट भटकण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना अननुभवी मार्ग निवडून जिवाला धोका निर्माण करू नका. स्थानिक वाटाड्यांची मदत घ्या आणि हवामानाचा अंदाज घेऊनच ट्रेकिंगचे नियोजन करा,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


