Konkan Railway: रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये दलालांकडून होणाऱ्या ऑनलाईन घोटाळ्यांबाबत रेल्वे विभागाकडे सातत्याने अनेक तक्रारी दाखल होत होत्या. हे दलाल बेकायदेशीरपणे ऑनलाईन तिकिटे हडप करून प्रवाशांना ती चौपट दराने विकत असल्याचा दाट संशय होता. याच पार्श्वभूमीवर, तिकीट खिडकीवर (Ticket Window) रात्रभर रांगेत उभे राहणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना प्राधान्याने तिकीट मिळावे, या उद्देशाने आज ऑनलाईन बुकिंग सुरुवातीची पहिली १० मिनिटे जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे रात्रभर रांग लावणाऱ्या अनेक सामान्य प्रवाशांना आज तिकिटे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ऑनलाईन तिकिटांची आस धरून बसलेल्या प्रवाशांच्या हाती निराशाच लागली.
हा उपाय आहे की सामन्यांची डोकेदुखी?
दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने योजलेला हा उपाय कितपत योग्य आहे, यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एजंट स्वतः रांगेत उभे न राहता, भाड्याने आपली माणसे रात्रभर तिकीट खिडकीच्या रांगेत उभी करून तिकिटे मिळवतात. रेल्वेच्या या नव्या प्रकारामुळे दलाल आता ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन रांगेत अधिक माणसे उभी करतील आणि काळाबाजार सुरूच ठेवतील, अशी रास्त भीती व्यक्त होत आहे.
सर्वच उपनगरीय स्थानकांवर आरक्षित खिडक्या नाही आहेत. नोकरदार वर्ग, महिला आणि सर्वसामान्य लोकांसाठी तिकीट खिडकीवर रात्रभर रांग लावणे शक्य आणि सोयीचे नसते. त्यामुळे या वर्गाला ऑनलाईन तिकीट बुकिंगवरच अवलंबून राहावे लागते. ऑनलाईन तिकीट न मिळाल्यास त्यांना पुन्हा त्याच दलालांच्या दारात जावे लागेल. याचाच फायदा घेत दलाल चौपट दराने तिकिटांची विक्री करतील आणि रात्री रांग लावण्यासाठी भाड्याची माणसे आणखी वाढवतील. त्यामुळे दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने असे उपाय अमलात आणणे हास्यास्पद आहे. अशा सामान्य प्रवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या आणि वरवरच्या उपायांवर अवलंबून न राहता इतर प्रभावी, तांत्रिक आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. तसेच, सामान्य प्रवाशांचा होणारा हा आर्थिक आणि मानसिक छळ त्वरित थांबवावा, अशी आग्रही मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.


