महत्वाची बातमी! महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार; ऑनलाईन कसा चेक कराल?

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) घेतलेल्या बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. यासंदर्भात मंडळाने अधिकृत माहिती दिली असून, निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी उद्या सकाळी ११ वाजता बोर्डाची अधिकृत पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर स्वतःचा निकाल पाहता येईल.

​विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी त्यांचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) ही माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे. निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येईल:

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

results.digilocker.gov.in

​यावर्षी बारावीची परीक्षा सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल, जी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी (Verification) करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी रविवार, ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन विहित शुल्क भरून अर्ज करावा लागेल.

​महत्वाची टीप: पुनर्मूल्यांकनासाठी (Revaluation) अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

Facebook Comments Box

विरार-डहाणू मार्गावर पहिली १५ डब्यांची ईएमयू लोकल गाडी धावण्यासाठी सज्ज

   Follow us on        

मुंबई: मुंबईच्या पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक बदल होणार आहे. १ मे २०२६ पासून विरार-डहाणू मार्गावर प्रथमच १५ डब्यांची (१५ कार) ईएमयू लोकल सेवा सुरू होत आहे. आतापर्यंत या मार्गावर केवळ १२ डब्यांच्या गाड्या चालवण्यात येत होत्या, मात्र वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन बदलामुळे चर्चगेट ते डहाणू यादरम्यान एकूण १७ लोकल सेवांचे रूपांतर १२ डब्यांवरून १५ डब्यांमध्ये करण्यात आले आहे. यापैकी ८ सेवा विशेषतः विरार-डहाणू विभागात चालवल्या जातील, तर उर्वरित सेवा चर्चगेट ते विरार दरम्यान धावणार आहेत.

​डब्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे. याचा थेट फायदा वसई, पालघर, डहाणू आणि उत्तर मुंबईतील प्रवाशांना होणार असून, गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची ओढाताण कमी होऊन प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल. विरार स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि नवीन प्लॅटफॉर्मच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यामुळेच या १५ डब्यांच्या गाड्या चालवणे शक्य झाले आहे. दरम्यान, या गाड्यांच्या थांब्यांबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून, या लोकल ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाईन्स स्थानकांवर थांबणार नाहीत, मात्र दादर स्थानकावर या गाड्या दोनदा थांबतील. रेल्वेच्या या निर्णयामुळे उपनगरीय प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Facebook Comments Box

कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर वीकेंडलाच ब्लॉक; लोकल फेऱ्या रद्द, एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

   Follow us on        

कल्याण: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान ३ऱ्या आणि ४थ्या रेल्वे लाईनवरील ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. १ मे आणि २ मे च्या मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार असून, याचा मोठा फटका उपनगरीय लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार आहे.

​ब्लॉकचे सविस्तर वेळापत्रक:

​मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक दोन टप्प्यांत घेण्यात येईल:

​ब्लॉक ‘A’ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र): दि. २ मे २०२६ रोजी पहाटे ०१:४० ते ०३:४० वाजेपर्यंत कल्याण ते अंबरनाथ दरम्यान अप आणि डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर काम चालेल.

​ब्लॉक ‘B’ (शनिवार/रविवार मध्यरात्र): दि. ३ मे २०२६ रोजी पहाटे ०१:३० ते ०३:३० वाजेपर्यंत अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर दुरुस्ती केली जाईल.

​लोकल प्रवाशांची गैरसोय; या असतील शेवटच्या गाड्या:

​ब्लॉकच्या कालावधीत कल्याण ते बदलापूर दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांनी गोंधळ टाळण्यासाठी शेवटच्या आणि पहिल्या लोकलच्या वेळा लक्षात घेणे आवश्यक आहे:

​१ मे (शुक्रवार): CSMT वरून सुटणारी शेवटची बदलापूर लोकल (BL61) रात्री २३:५१ वाजता सुटेल.

​२ मे (शनिवार): CSMT वरून सुटणारी शेवटची कर्जत लोकल (S41) रात्री २३:३० वाजता सुटेल.

​ब्लॉकनंतरची पहिली गाडी: दोन्ही दिवशी कर्जतवरून पहाटे ०३:३५ वाजता सुटणारी (S4) कर्जत-CSMT लोकल ही पहिली गाडी असेल.

​एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल:

​ब्लॉकमुळे खालील तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत:

१. ११०२० भुवनेश्वर – CSMT कोणार्क एक्सप्रेस

२. १८५१९ विशाखापट्टणम – LTT एक्सप्रेस

३. १२७०२ हैदराबाद – CSMT हुसेनसागर एक्सप्रेस

​विशेष सोय: ज्या गाड्यांचा कल्याण स्थानकावर थांबा होता, त्या आता प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे आणि पनवेल स्थानकांवर थांबतील.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी बदललेले वेळापत्रक तपासूनच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

Facebook Comments Box

मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मंजूर

   Follow us on        

संगमेश्वर | २९ एप्रिल २०२६ कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मदार (अजमेर) ते तिरुवनंतपुरम सेंट्रल दरम्यानच्या विशेष गाडीला संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे संगमेश्वर आणि परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

​सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

​यापूर्वी या गाडीला संगमेश्वर स्थानकावर थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’ च्या वतीने कोकण रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच, पद्मश्री गजानन माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे सी.एम.डी. (CMD) संतोष कुमार झा यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा विषय प्रकर्षाने मांडण्यात आला होता. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अखेर या थांब्याचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि वेळ

​रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, ०२ मे २०२६ ते ०६ जून २०२६ या कालावधीत ही सेवा उपलब्ध असेल:

​ट्रेन क्र. ०६०१३ (तिरुवनंतपुरम – मदार जं. स्पेशल): ही गाडी दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर स्थानकावर येईल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ०८:१८ वाजता मार्गस्थ होईल.

​ट्रेन क्र. ०६०१४ (मदार जं. – तिरुवनंतपुरम स्पेशल): ही गाडी दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर स्थानकावर पोहोचेल आणि २३:१२ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

​कोकण रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे संगमेश्वर परिसरातील नागरिक आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे ग्रुपच्या या यशस्वी पाठपुराव्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Facebook Comments Box

कशेडी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; १२ ते १३ प्रवासी जखमी

   Follow us on        

खेड: मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी उशिरा रात्री एक भीषण अपघात घडला. खेड डेपोची खेड-बोरीवली एसटी बस रात्री १० वाजता मार्गस्थ झाली होती. रात्री ११:३० ते १२ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील भोगाव परिसरात पोहोचली असता, बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, या बसने समोर असलेल्या एका बल्कर ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रक चालकासह बसमधील सुमारे १२ ते १३ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

​अपघाताचे ठिकाण हे अत्यंत धोकादायक असून एका बाजूला खोल दरी आहे. सुदैवाने, धडक बसल्यानंतर बस दरीच्या टोकावर थांबली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे, तसेच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, अक्षय भोसले, निखिल चौधरी, समीर मोरे आणि दर्पण दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. पोलादपूर पोलिसांनीही तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

​कशेडी घाटात सध्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असले, तरी स्थानिक गावांसाठी काही एसटी बसेस अजूनही जुन्या घाटातूनच धावतात. भोगाव परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे घाटातील रस्ते सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: मदार-मडगाव दरम्यान ‘वन-वे’ विशेष गाडी

   Follow us on        

मडगाव: उत्तर पश्चिम रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मदार ते मडगाव दरम्यान विशेष ‘वन-वे’ रेल्वे सेवा जाहीर केली आहे. गाडी संख्या ०९६०७, मदार-मडगाव स्पेशल रविवार, दिनांक ३ मे २०२६ रोजी मदार स्थानकावरून सायंकाळी १९.५५ वाजता सुटेल आणि मंगळवारी पहाटे ०४.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

​या प्रवासात ही गाडी राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. या विशेष रेल्वेचे सर्व थांबे खालीलप्रमाणे आहेत:

​प्रवासातील सर्व स्थानके:

मदारहून सुटल्यानंतर ही गाडी अजमेर, विजयनगर, भीलवाडा, चित्तौडगड, नीमच, मंदसौर, रतलाम, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमली या स्थानकांवर थांबेल. त्यानंतर ही गाडी आपल्या अंतिम स्थानकावर म्हणजेच मडगाव येथे पोहोचेल.

​डब्यांची रचना आणि सुविधा:

या गाडीला एकूण २२ डबे असतील, ज्यात २ सेकंड एसी, ६ थर्ड एसी, १ थर्ड एसी इकॉनॉमी, ७ शयनयान (स्लीपर), ४ सामान्य श्रेणी आणि २ पॉवरकार डब्यांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या विशेष रेल्वेमध्ये लिननची (चादर, उशी, ब्लँकेट) सुविधा उपलब्ध नसेल, त्यामुळे प्रवाशांनी स्वतःची व्यवस्था करून प्रवास करावा.

​कोकण रेल्वे मार्गावरून जाणारी ही गाडी विशेषतः दक्षिण भारतात आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सोय ठरणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रकाची नोंद घेऊन आपले आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

तिरुवनंतपुरम – मदार जंक्शन विशेष एक्सप्रेस शनिवारपासून संगमेश्वर स्थानकावर थांबणार

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने संगमेश्वर रोड स्थानकावर तिरुवनंतपुरम मदार विशेष जादा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २ मे २०२६ पासून ६ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

​गाडी क्र. ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर बुधवारी तिरुवनंतपुरमवरून सुटते) दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर पोहोचेल आणि ०८:१८ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. या गाडीला ६ मे २०२६ ते ३ जून २०२६ या कालावधीत हा थांबा मिळेल.

​तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०६०१४ मदार जंक्शन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर शनिवारी मदार जंक्शनवरून सुटते) दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर येईल आणि २३:१२ वाजता मार्गस्थ होईल. या गाडीला २ मे २०२६ ते ६ जून २०२६ या कालावधीत हा जादा थांबा देण्यात आला आहे.

​कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ‘समर स्पेशल’ गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दोन विशेष उन्हाळी गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

पहिली विशेष गाडी क्रमांक ०११०४ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता मडगाव येथून सुटणार असून त्याच दिवशी रात्री १०:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. परतीची गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष गाडी गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

दुसरी विशेष गाडी क्रमांक ०१००४ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता मडगाव येथून सुटणार असून पुढील दिवशी सकाळी ६:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष गाडी सोमवार, ४ मे २०२६ रोजी सकाळी ८:२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०:४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

दोन्ही विशेष गाड्यांमध्ये एकूण २१ डबे असणार असून त्यामध्ये एसी थ्री टियरचा १ डबा, स्लीपरचे ११ डबे, सामान्य श्रेणीचे ७ डबे आणि एसएलआरचे २ डबे असतील. या गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रक व थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडीत २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त; सांगलीतील रॅकेटचा पर्दाफाश

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत भरणा केलेल्या रकमेमध्ये २०० रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सांगली कारागृहातून सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बनावट नोटांचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, याचे धागेदोरे कोकण आणि गोव्यापर्यंत पसरल्याचा संशय पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

​बँकेत एका ग्राहकाने आपल्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणलेल्या २०० रुपयांच्या बंडलमध्ये या बनावट नोटा कॅशियरला आढळल्या. अधिक तपासाअंती, या नोटा सांगली येथे छापण्यात आलेल्या बनावट नोटांच्या कारखान्यातील असल्याचे निष्पन्न झाले. ऑक्टोबर २०२५ मध्ये सांगली पोलिसांनी हा कारखाना उद्ध्वस्त केला होता आणि त्यावेळपासून हे संशयित सांगली कारागृहात होते. पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने सुप्रीत कडप्पा देसाई, राहुल राजाराम जाधव, इब्रार आदम इनामदार, नरेंद्र जगन्नाथ शिंदे, संदीप बाळू कांबळे आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे या सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

​या अटकेमुळे बनावट नोटांच्या व्यापाराचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. हे सर्व आरोपी कोल्हापूर आणि मुंबई परिसरातील असून, त्यांनी चलनात आणलेल्या बनावट नोटांची व्याप्ती मोठी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करत असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

Photo Credit – RBI

Facebook Comments Box

निवडणूक परराज्यात, फटका मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला; डेडलाईन पुन्हा हुकणार?

   Follow us on        

रत्नागिरी:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, उर्वरित काम मे महिन्याअखेर पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या कामाची गती पाहता हे काम पावसाळा संपेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे महामार्गाच्या कामावर असलेले पश्चिम बंगालमधील कामगार मतदानासाठी आपल्या गावी परतले आहेत.

​रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावरील काही उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम अद्याप शिल्लक आहे. या कामाचा ठेका घेतलेली एजन्सी आणि त्यावरील बहुतांशी कामगार हे परराज्यातील, विशेषतः पश्चिम बंगालमधील आहेत. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेथील २९४ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होत असून, २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी ही प्रक्रिया पार पडणार आहे. जर मतदान केले नाही, तर मतदार यादीतून नाव वगळले जाईल किंवा ओळखपत्र रद्द होईल, अशी भीती या कामगारांमध्ये आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कामगार गावी गेल्याने महामार्गासह जिल्ह्यातील इतर खासगी बांधकामांची गतीही मंदावली आहे.

​केवळ महामार्गच नव्हे, तर जिल्ह्यातील शहरांमधील आणि ग्रामीण भागातील इमारतींच्या कामांवरही याचा परिणाम झाला आहे. सेंटिंग, गवंडी काम आणि प्लास्टरच्या कामासाठी बिल्डर आणि ठेकेदार प्रामुख्याने बंगालमधील कामगारांना पसंती देतात, कारण ते कमी पगारात आणि चांगल्या दर्जाचे काम करतात. आता हे कामगार नसल्याने अनेक प्रकल्प ठप्प झाले आहेत. निवडणूक निकालानंतरच हे कामगार पुन्हा परतण्याची शक्यता असून, तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search