Category Archives: महाराष्ट्र
रायगड: पुणे येथील खासगी कंपनीची बस कोकणात येत असताना रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५५ जण जखमी झाले आहेत, तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात शनिवारी सकाळी अपघात झाला आहे.
माणगांव पोलिस ठाणे हद्दीत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत असताना रस्त्याखली उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला आहे. घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली आहे. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.
वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.





प्रतिनिधी: रेल्वे सुरक्षा दलाच्या RPF ‘जिवन रक्षक अभियानांतर्गत’ रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी एप्रिल ते ऑक्टोबर या काळादरम्यान विविध विभागांमध्ये साहस आणि प्रसंगावधान दाखवून चुकीच्या पद्धतीने गाडी पडणाऱ्या ६६ प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत.
यात मुंबई विभागातील १९, भुसावळ विभागातील १३, नागपूर विभागातील १४,पुणे विभागातील १५ तर सोलापूर विभागातील ५ प्रवाशांचा समावेश आहे.
रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, “अमानत” या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, रोख, दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू परत मिळवून दिल्या आहेत.
यंदा एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफने ८५७ प्रवाशांचे सामान परत मिळवले आहे. त्याची किंमत २.७७ कोटी रुपये आहे. इतर विभागांवर परत मिळवलेल्या प्रवाशांच्या सामानाचे मूल्य आहे. भुसावळ विभाग १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाख किमतीचे सामान नागपूर विभाग १६८ प्रवाशांचे ३६.९७ लाख किमतीचे सामान, पुणे विभाग ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख किमतीचे सामान तर सोलापूर विभागात ७२ प्रवाशांचे १३.९९ लाख किमतीच्या सामानाचा सामावेश आहे.
मध्य रेल्वेचे आवाहन
रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा इत्यादी सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. प्रवाशांनी त्यांना सहकार्य करावे तसेच प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू किंवा उतरू नये असे आवाहन केले आहे.
पनवेल: पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास सौम्य हादरे होऊन कंप झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक इमारती हालल्याचं बोललं जात आहे. तसंच घरातील समानदेखील काहीसं हलताना दिसून आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. भूकंपाच्या 2.9 रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता.
हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचं जाणवलं. मात्र हा धक्का सौम्य असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. अरबी समुद्रात भूकंपाचं केंद्र होतं. दुपारी वेधशाळेने माहिती दिल्यानंतर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात काही सेकंदांसाठी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता. काही सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले होते. काहींना हा नक्की भूकंप होता का अशी शंका आल्याने त्यांनी खिडक्याही उघडून पाहिल्या. दरम्यान प्रशासनालाही नेमकं काय झालं होतं याची माहिती मिळवण्यासाठी वेळ लागला. अखेर वेधशाळेने खात्रीशीर माहिती दिल्यानंतर पालिकेने अधिकृतपणे भूकंप आल्याचं जाहीर केलं.