Category Archives: रत्नागिरी
मुंबई – बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा होणारा विरोध हा तीव्र वळण घेत आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. विकासाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असण्याचे कारण नाही मात्र विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बारसू रिफायनरी प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाविषयी मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. एखाद्या प्रकल्पातून परिसरात कायमचे नुकसान होणार असेल किंवा भावी पिढी बरबाद होणार असेल तर जरूर त्या गोष्टीला विरोध करायला हवा परंतु त्यातून फायदा होणार असेल तर त्या दृष्टीकोनातूनही विचार केला पाहिजे, असे अजितदादा म्हणाले.
रत्नागिरी – एकीकडे सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये बारसू रिफायनरी प्रकल्पावरून जुंपली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बारसूची जागा केंद्र सरकारला लिहिलेल्या एका पत्राद्वारे सुचवली असल्याचे समोर आले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहाल होतं. 12 जानेवारी 2022 रोजी ही पत्र लिहण्यात आलं होतं. बारसूमध्ये 13 हजार एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवली होती. त्याचबरोबर याठिकाणची बहुतांश जमीन ही ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं. या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहण्यात आलं होतं की ही जागा ओसाड आहे.
यामुळे आता ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहताना बारसूमधील लोकांना विश्वासात घेतलं होतं का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Barsu Refinery News – बारसू रिफायनरी सर्वेसाठी स्थानिकांचा विरोध वाढला असून आंदोलक आक्रमक झाले असल्याचे चित्र दिसत आहे. विरोधकांनी पोलिसांच्या गाड्या अडवून विरोध केला आहे. आता या सर्व प्रकरणाची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दखल घेतली आहे.
शरद पवार यांनी मंत्री उदय सामंत यांना फोन केला आहे. सर्व्हे थांबवून आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका घ्या, नाहीतर प्रकल्प अडकेल.त्यामुळे चर्चा करावी आणि ज्यांना अटक केली त्यांना सोडून द्यावे असे त्यांनी उदय सामंत यांना सांगितल्याचे समजते.
उदय सामंत यांनी या प्रकरणी शरद पवार यांना आश्वस्त केले आहे की ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि निर्णय घेतील.
रत्नागिरी – काल बुधवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर कोदवली येथे कोदवली उपकेंद्र नजीक खाजगी आराम बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन एक भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आराम बसला मुंबईकडून गोवा दिशेकडे जाणारा खाजगी कारचालक समोरून जोरदार धडकला त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी पाठवण्यात आले आहे.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये योगेश ज्ञानदेव मुंडे, साहिल स्वप्नील मुंडे, स्वप्निल राजू मुंडे , साक्षी योगेश मुंडे, अर्चना स्वप्नील मुंडे, कृष्णा गणेश दराडे रा. जालना यांचा समावेश आहे. या अपघाताचे वृत्त कळतात अनेक स्थानिकानी अपघात स्थळी धाव घेतली व जखमीना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या रुग्णांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित मीना डॉ. लक्ष्मण शर्मा डॉ. मोनिका व उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले.
या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी हलविण्यात आले आहे या अपघाताचे वृत्त कळतात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे
रत्नागिरी-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा मार्गाच्या पूर्णत्वाची डेडलाइन दिल्यापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. कोकणवासीयां साठी ही एक चांगली बातमी म्हणावी लागेल. या महामार्गाचा एक धोकादायक भाग म्हणुन ओळखल्या जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील काम सुद्धा जलदगतीने सुरू आहे. या घाटावरील डोंगर कटाईचे काम चालू असल्याने वाहतूक अतिशय धोकादायक बनली आहे. या कामा दरम्यान, अधुनमधून रस्त्यावर दगड येत असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
अपघात होऊ नये या साठी दिवसातील काही तास परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवण्याची मागणी होत आहे. तसा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला गेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी अतिशय धोका पत्करून या ठिकाणी वाहतूक सुरू आहे.
वाहतुक सुरू ठेवून खोदकाम करण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी खेड हद्दीतील ठेकेदार कल्याण टोलवेजने परशुराम घाटातील १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याची मागणी केली होती. तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभाग पेणकडून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांना तो अहवाल देण्यात आला आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही आहे. मात्र सद्य परिस्थिती पाहता तो निर्णय घेण्याची शक्यता आहे.