Category Archives: सिंधुदुर्ग

आंबोली घाटात दरड कोसळली; मोठी दुर्घटना टळली, धोका मात्र कायम

   Follow us on        

आंबोली: पावसाळी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रसिद्ध आंबोली घाटातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी अचानक दोन भलेमोठे दगड (दरड) कोसळले. मुख्य धबधब्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर घाटमाथ्यावरून हे दोन मोठे दगड अचानक खाली आले.

यातील एक भलामोठा दगड थेट मुख्य रस्त्यावरून घरंगळत खाली दरीत कोसळला, तर दुसऱ्या मोठ्या दगडाचे तुकडे होऊन ते रस्त्यावरच विखुरले. दगड थेट खाली दरीत गेल्यामुळे घाटातील संरक्षक कठडा आणि रॅलींग पूर्णपणे तुटली आहे. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नव्हते. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरातील वाहनचालक आणि पर्यटकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.

​दरम्यान, या घटनेनंतरही आंबोली घाटातील धोका अद्याप कायम आहे. घाटाच्या माथ्यावर अजूनही असे अनेक मोठे दगड सैल अवस्थेत अडकलेले आहेत, जे कधीही खाली रस्त्यावर कोसळू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात घडणारा मोठा अनुचित प्रकार किंवा अपघात टाळण्यासाठी वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. घाटमाथ्यावरील धोकादायक ठरू शकणारे सैल दगड आधीच बाजूला करावेत आणि रस्त्यावरील पडलेले दगड हटवून वाहतूक सुरक्षित करावी, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे.

नाहीतर हप्ते बंद होणार! ‘पीएम किसान’ साठी ई-केवायसीची अंतिम तारीख जाहीर

   Follow us on        

सिंधुदूर्गनगरी:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा पुढील हप्ता सुरक्षित ठेवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे अंतिम आवाहन कृषी विभागाने केले आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पीएम किसान’ योजनेचे एकूण १ लाख ९१ हजार लाभार्थी असून, त्यापैकी १ हजार ८४३ शेतकरी अद्याप या प्रक्रियेपासून दूर आहेत. योजनेतील पारदर्शकता वाढवणे आणि केवळ पात्र व जिवंत शेतकऱ्यांपर्यंतच शासकीय मदत पोहोचवणे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने ई-केवायसी सक्तीची केली असून यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

​बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशनचे पर्याय

​शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बायोमेट्रिक पडताळणीसाठी लाभार्थी आपल्या जवळच्या सामूहिक सुविधा केंद्रात (CSC) जाऊ शकतात. तसेच, ज्यांना घरबसल्या प्रक्रिया करायची आहे, ते ‘पीएम-किसान’ मोबाईल ॲप डाऊनलोड करून स्वतःच्या मोबाईलद्वारे ‘चेहऱ्याच्या पडताळणी’ (फेस ऑथेंटिकेशन) माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करू शकतात, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

​वृद्ध व दिव्यांगांसाठी घरपोच सुविधा

​वृद्ध, आजारी अथवा दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्र किंवा सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्यास प्रशासनाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गावपातळीवरील नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी संबंधित शेतकऱ्यांच्या घरी जाऊन फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी काळजी न करता या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

​’ॲग्रीस्टॅक’ नोंदणीही ठरणार महत्त्वाची

​पीएम किसानसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) नोंदणी करून ‘युनिक फार्मर आयडी’ प्राप्त करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख असून, भविष्यात पीक विमा, अनुदान, कर्जमाफी तसेच थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या विविध लाभांसाठी ती अनिवार्य असेल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी ३० जूनपूर्वी ई-केवायसीसोबतच ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीही तातडीने पूर्ण करावी आणि शासकीय योजनांचा लाभ अखंडित ठेवावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

आता शाळांत घुमणार ‘मालवणी’; बालभारतीचे कौतुकास्पद पाऊल

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

महाराष्ट्रातील मातीची अस्मिता आणि संस्कृतीचे प्रतिबिंब असणाऱ्या प्रांतिक बोलीभाषांना शिक्षण क्षेत्रात मानाचे स्थान देण्याचा यशस्वी पायंडा ‘बालभारती’ने चालू ठेवला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नव्या शैक्षणिक वर्षाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये राज्यातील समृद्ध बोलीभाषांचा समावेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने इयत्ता सहावीच्या नव्या पुस्तकात कोकणची शान असणारी ‘मालवणी’ आणि विदर्भाचे वैभव असणारी ‘वऱ्हाडी’ या बोलीभाषांना स्थान देण्यात आले असून, आगामी काळात याचा विस्तार उच्च माध्यमिक (११ वी व १२ वी) स्तरावरही करण्याचा महत्त्वपूर्ण विचार बालभारती करत आहे.

​राज्यात येत्या १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होत आहे. या नव्या वर्षात इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमावर आधारित आकर्षक पाठ्यपुस्तके लागू केली जाणार आहेत. या नव्या पुस्तकांमध्ये ज्ञानरंजनासोबतच स्थानिक संस्कृतीची ओळख करून देण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ‘मालवणी’ आणि ‘वऱ्हाडी’ या बोलीभाषांचा मनमोहक सुगंध दरवळणार आहे. विद्यार्थ्यांची बोलीभाषेशी नाळ जोडली जावी, म्हणून या पुस्तकात या भाषांमधील एक विशेष उतारा (पाठ) समाविष्ट करण्यात आला आहे. यासोबतच, त्या बोलीभाषेतील साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांचा परिचयही विद्यार्थ्यांना करून दिला जाणार आहे.

​बालभारतीच्या नियोजनानुसार, पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्वच इयत्तांच्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये टप्प्याटप्प्याने विविध बोलीभाषांचा समावेश केला जाईल. इतकेच नव्हे, तर अकरावी आणि बारावीच्या स्तरावरही या बोलीभाषांचा विस्तार करण्याचे नियोजन सुरू आहे. बालभारतीच्या या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांना आपल्या मातृबोलीचा सार्थ अभिमान वाटेल, तसेच भाषेतील वैविध्य समजून घेण्यास मदत होईल. ग्रामीण आणि शहरी भागातील दरी मिटवून शिक्षणात अधिक आपुलकी निर्माण करण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे.

​”जुन्या अभ्यासक्रमातही पहिली ते दहावीच्या पुस्तकांत बोलीभाषांमधील कविता व पाठांचा समावेश होता. या प्रयोगाला शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून अत्यंत सकारात्मक आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. याच यशामुळे नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्येही बोलीभाषांचा समावेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”

— सविता वायळ (विशेषाधिकारी, मराठी विषय, बालभारती)

Medical Tourism: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य पर्यटनाला वाव! तीन पर्यटनस्थळे चर्चेत

   Follow us on        

सावंतवाडी:

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा व आंबोली येथे ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ तसेच रेडी-वेंगुर्ला येथे ‘विशेष आयुष केंद्र’ स्थापन करण्याकरिता मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय आपल्या मतदारसंघातील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व इतर रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भातही त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली आहे.

​राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा विचार करता आयुर्वेद, पंचकर्म, योग आणि नॅचरोपॅथी यांसारख्या भारतीय उपचार पद्धतींविषयी परदेशी पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण होत असून, याद्वारे पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी हे महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेले असून, येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच आचरा हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले गाव आहे आणि आंबोली हे वर्षभर पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.

​आयुष मंत्रालयाने सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात वैद्यकीय पर्यटनामध्ये (Medical Tourism) आयुष सेवांचा समावेश करण्याबाबत विशेष भर देण्यात आला आहे. याच अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा व आंबोली येथे ‘स्वास्थ्य केंद्र’ सुरू केल्यास वैद्यकीय पर्यटनाविषयी जनजागृती होईल, तसेच भारतीय व परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कामास त्वरित मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.

आनंदवार्ता! तासाभरात तळकोकणात पोहचता येणार; सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवा सुरू होणार

   Follow us on        

मुंबई (प्रतिनिधी):

नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची बहुप्रतिक्षित विमानसेवा येत्या स्वातंत्र्यदिनापूर्वी, म्हणजेच १५ ऑगस्टपूर्वी प्रत्यक्ष सुरू होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात ‘फ्लाय-९१’ या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चॅको यांच्यासोबत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत या विमानसेवेचा सविस्तर आढावा घेतला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच ही सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे मुंबई आणि कोकणमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे. कोकणाचा सर्वात मोठा सण असलेल्या आगामी गणेशोत्सवासाठी घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना या विमानसेवेमुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

​१०० टक्के ‘व्हीजीएफ’ मंजुरीचा मोठा आधार

​सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून नियमित विमान वाहतूक सुरू राहण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच (१७ मार्च २०२६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत) १०० टक्के ‘व्हीजीएफ’ (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) सुविधेला मंजुरी दिली आहे. प्रादेशिक विमान वाहतूक अधिक परवडणारी व्हावी आणि विमान कंपन्यांना तोटा होऊ नये, यासाठी सरकारकडून हे फंडिंग दिले जाते. यापूर्वी सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे मार्गासाठी असा निधी दिला गेला होता. आता चिपी विमानतळालाही ही १०० टक्के सवलत मिळाल्यामुळे ‘फ्लाय-९१’ कंपनीला कोणताही आर्थिक अडथळा न येता आठवड्याचे सातही दिवस नियमित आणि सातत्यपूर्ण सेवा देणे शक्य होणार आहे. तसेच गणेशोत्सवातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कंपनीतर्फे विशेष अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

​अवघ्या तासाभरात प्रवास; स्थानिक पर्यटनाला मिळणार चालना

​नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) हा हवाई प्रवास सुरू झाल्यामुळे दोन्ही ठिकाणांमधील अंतर अवघ्या तासाभराचे राहणार आहे. मंत्रालयातील या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने कोकणच्या पर्यटन विकासाला आणि दळणवळणाला गती देण्यावर भर देण्यात आला. या नव्या विमानसेवेमुळे हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढेल. परिणामी, येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि हॉटेल व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या विमानसेवेच्या यशस्वी संचालनासाठी आणि तांत्रिक पूर्ततेसाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य, परवानग्या आणि आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले आहे.

मान्सूनची दापोलीपर्यंत धडक; सिंधुदुर्गात दमदार पाऊस

   Follow us on        

सावंतवाडी :

राज्यातील शेतकरी आणि जनतेसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला असून, त्याची मजल आता रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ‘हर्णे’ बंदरापर्यंत पोहोचली आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे.

​हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल ८ जून रोजी मान्सूनची उत्तर सीमा महाराष्ट्रातील हर्णे (दापोली, रत्नागिरी) आणि सोलापूर या भागातून जात आहे. देशाचा विचार केला तर ही सीमा हर्णे, सोलापूर, कलबुर्गी, नंदीयाल, चेन्नई, लखीमपूर या भागांमधून जात आहे. मान्सूनने पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा आणखी काही भाग व्यापत पुढे कूच केली आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

​हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात मान्सून मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. याशिवाय तामिळनाडू, बंगालचा उपसागर, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही मान्सून वेगाने पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनासोबतच दमदार पाऊस सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

कर्करोगाशी झुंजणाऱ्या सावंतवाडीतील मैनाबाई लाखे यांच्या उपचारासाठी कुटुंबीयांची आर्थिक मदतीसाठी हाक!

   Follow us on        

सावंतवाडी:

येथील जिमखाना परिसरातील रहिवासी सौ. मैनाबाई रघुनाथ लाखे (वय ६० वर्षे) या गेल्या काही महिन्यांपासून अंडाशयाच्या (ओव्हरी) कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर सध्या बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, लाखे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने पुढील उपचाराचा खर्च उचलणे त्यांना अशक्य झाले आहे. पैशांअभावी उपचार थांबवण्याची वेळ आल्याने, आपल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी लाखे कुटुंबीयांनी जिल्हावासीयांसह दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थांकडे आर्थिक मदतीचे जाहीर आवाहन केले आहे.

​मैनाबाई लाखे यांना सुरुवातीला पोटदुखी आणि तीव्र अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला होता. अधिक तपासणीसाठी त्यांना गोवा बांबोळी रुग्णालयात नेण्यात आले असता, त्यांना कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच लाखे कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडले. गेल्या मार्च महिन्यापासून त्यांच्यावर बेळगावमध्ये उपचार सुरू असून, दरमहा केमोथेरपी आणि इतर औषधांसाठी सुमारे पाऊण लाख रुपयांचा खर्च येत आहे. घरात शेती किंवा उदरनिर्वाहाचे इतर कोणतेही साधन नसल्याने उपचारासाठी कुटुंबाकडे शिल्लक असलेले सर्व पैसे आता संपले आहेत.

​डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मैनाबाई यांच्या पुढील औषधोपचारासाठी सुमारे ५ लाख रुपयांची तातडीने गरज आहे. लाखे कुटुंबीयांनी आपल्या आईच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे. मदत करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा मुलगा राकेश रघुनाथ लाखे यांच्या खालील बँक खात्यावर किंवा गुगल पे नंबरवर आपली मदत जमा करावी:

​बँक खाते नाव: राकेश रघुनाथ लाखे (Rakesh Raghunath Lakhe)

​बँक खाते क्रमांक: 3777020 10105422

​आयएफएससी कोड (IFSC Code): UBIN0537772

​बँक: युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा – सावंतवाडी (Union Bank of India, Sawantwadi)

​गुगल पे (Google Pay) / फोन पे नंबर: 8806318029

​UPI ID: rakeshlakhe071@okaxis

​या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा थेट संपर्कासाठी 8806318029 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल. आपली छोटीशी मदत या माऊलीला नवीन आयुष्य देण्यासाठी मोठा आधार ठरू शकते.

ऐतिहासिक कामगिरी! ‘जनगणना २०२७’ च्या पाहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात प्रथम; अवघ्या २० दिवसांत १००% उद्दिष्ट पूर्ण

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी, दि. ५ : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या २० दिवसांच्या विक्रमी कालावधीत घरगणनेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध कामकाजामुळे हा मान जिल्ह्याला मिळाला आहे.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहीम १६ मे २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत जिल्ह्यातील ०८ तहसील कार्यालये, ०३ नगरपरिषदा आणि ०५ नगरपंचायती अशा एकूण १६ कार्यालयांचा सहभाग होता. जिल्ह्यातील २६० पर्यवेक्षक आणि १,४६० प्रगणकांनी अथक परिश्रम घेत १,४५१ घरयादी गटांची गणना यशस्वीरित्या पूर्ण केली.

या यशामागे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे सूक्ष्म नियोजन, सातत्यपूर्ण आढावा बैठका, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेले मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींतून समस्यांचे तत्काळ निराकरण यांचा मोठा वाटा राहिला. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनीही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे मोहिमेला गती मिळाली. तसेच प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडणाऱ्या तहसिलदार आणि मुख्याधिकारी यांनीही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले की, घरगणनेचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता गुणात्मक पाहणी आणि अनियमितता दुरुस्तीची प्रक्रिया देखील मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

स्वगणना मोहिमेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

जनगणना प्रक्रियेतील स्वगणना (Self Enumeration) टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात आला होता. या टप्प्यात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डिजिटल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. एकूण २९ हजार ५९१ घरांची स्वगणना पूर्ण झाली असून १७ गावे आणि एका नगरपंचायतीने शंभर टक्के स्वगणनेचे उद्दिष्ट गाठले. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील ‘मूठ’ हे गाव सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले महसुली गाव ठरले. या यशामुळे जिल्ह्यातील नागरिकांची नागरी जबाबदारीची जाणीव आणि डिजिटल साक्षरता अधोरेखित झाली आहे.

प्रगणक-पर्यवेक्षकांच्या परिश्रमांना यशाचे श्रेय

जनगणना मोहिमेच्या यशात जिल्ह्यातील सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, समन्वय, समर्पण आणि टीमवर्कमुळेच ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व प्रगणक, पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याने जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात नोंदविलेली ही राज्यातील अग्रक्रमाची कामगिरी प्रशासनाची कार्यक्षमता, नियोजनबद्धता आणि जनसहभागाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही ती प्रेरणादायी ठरणार आहे.

कुणकेश्वर -कोल्हापूर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

देवगड: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ कुणकेश्वर ते कोल्हापूर अशी थेट एसटी बसफेरी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे प्रशासक महेश ताम्हणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. कुणकेश्वर (ता. देवगड) येथे दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी महाराष्ट्रभरातून, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्याचप्रमाणे देवगड आणि कुणकेश्वर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि रुग्ण हे वैद्यकीय उपचार, व्यापार आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) च्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने कोल्हापूरला जात असतात.

​सध्या कोल्हापूर ते कुणकेश्वर दरम्यान कोणतीही थेट एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना, पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना गाड्या बदलत (कनेक्टिंग प्रवास) करावा लागतो. थेट बस नसल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी, वैद्यकीय आणि शैक्षणिक केंद्र असल्याने या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे, मात्र थेट बसअभावी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

​जर एसटी महामंडळाने कोल्हापूर-कुणकेश्वर अशी थेट बसफेरी सुरू केली, तर प्रवाशांची मोठी सोय होईलच, शिवाय महामंडळाच्या उत्पन्नातही भरघोस वाढ होईल, असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाला लवकरात लवकर ही थेट सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी नम्र विनंती कुणकेश्वर ग्रामपंचायत प्रशासक महेश ताम्हणकर यांनी केली आहे. या मागणीमुळे आता दोन्ही जिल्ह्यांतील प्रवाशांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिंधुदुर्ग ते गोवा रो-रो बोट सेवेसाठी प्रस्ताव सादर

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्हा आणि शेजारील गोवा या दोन्ही प्रमुख पर्यटन क्षेत्रांमधील दळणवळण अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली जात आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जेटीवरून थेट गोव्यापर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात पार पडलेल्या एका विशेष बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला.

​हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास दोन्ही राज्यांमधील पर्यटनाला नवी गती मिळण्यासोबतच प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि वाहतूक सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने बुधवारी मंत्रालयात ‘कॉन्टिनेंटल इंटरलँक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘गोवा (जॉईज) कार रेंटल’ या कंपन्यांचे विशेष सादरीकरण (प्रेझेंटेशन) झाले. यावेळी सिंधुदुर्ग ते गोवा दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ, जलद आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर करण्याच्या विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

​या बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिशे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, चिपी विमानतळाचे मुख्य संचालक कुलदीप सिंग, कॉन्टिनेंटल इंटरलँकचे विकास राजपूत व सतीश येरूनकर तसेच गोवा कार रेंटलचे नाथन वेगास यांच्यासह बंदरे विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रस्तावाच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Important: दिलेला फोटो केवळ नमुन्यासाठी असून, भविष्यातील योजनेची ढोबळ कल्पना देणारा आहे

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search