Category Archives: सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी अज्ञात चोरट्याने आज पहाटेच्या सुमारास फोडली. यात ४८ हजार रुपयांची रोकड व ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद मालक दिगंबर सदाशिव बोंद्रे यांनी बांदा पोलीसात दाखल केली आहे. ही घटना पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली असावी असा पोलीसांचा अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली खामदेव नाक्यावर श्री गणेश मंदिर समोरील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी फोडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. चोरट्याने खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. कपाटातील तीन काऊंटरमध्ये ठेवलेली सुमारे ४८ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. तसेच सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला.
आज सकाळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकार्यां समवेत घटनास्थळाची पाहणी केली. मालक दिगंबर बोंद्रे व फॅक्टरीमधील कामगार यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली. तसेच कॅश्यु फॅक्टरीमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज तपासण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. एलसीबी तसेच श्वान पथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आल्याची माहिती एपीआय शामराव काळे यांनी दिली.
आंबोली :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला या नोंदीबद्दल कळवले आहे.
यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या आंबोलीमधून नोंदी झाल्या आहेत. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात काळ्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात आले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या बिबटय़ाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात. मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जंगलांमध्ये आढळतात.
- सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही
- सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही
- प्रीमियम /वंदेभारत या गाड्या सावंतवाडीसाठी नाहीत
पनवेल | सागर तळवडेकर : कोकणात रेल्वे यावी यासाठी बापजाद्यांनी राखून ठेवण्यात आलेल्या आपल्या जमिनींचा त्याग करून कोकणवासीयांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. मात्र येथील अनेक स्थानकावर थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करूनही, प्रवासी संख्या असूनही अनेक गाड्यांना येथे थांबा देण्यात आला नाही आहे. एवढे कमी होते म्हणुन की काय आता तर रेल्वे अधिकारी चक्क संतापजनक वक्तव्ये करताना दिसत आहेत.
सावंतवाडी स्थानकात अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आणि येथील टर्मिनसचे रेंगाळलेले काम पूर्ण करावे यासाठी काल दिनांक २४ ऑगस्ट ला ठरल्या प्रमाणे मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या बेलापूर ऑफिस मधे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर श्री वी.स. सिन्हा यांची भेट घेतली.
सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्गातील एक महत्वाचे स्थानक आहे, येथील स्थानकात नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते परंतु अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न असताना देखील येथे गाड्या मात्र हाताचा बोटं मोजण्या इतक्याच थांबत आहेत.सध्या कोकण रेल्वे मार्गावर ४४ गाड्या धावतात त्यापैकी सावंतवाडी स्थानकात एकूण ५ दैनिक आणि ४ साप्ताहिक अश्या ९ गाड्या थांबतात.तसेच सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत तब्बल ४.४ करोड एवढे आहे आणि आता पुढच्याच महिन्यात गणपती चतुर्थी असल्याने दुसऱ्या तिमाहीत देखील हा आकडा वाढण्याची दाट शक्यता देखील आहे असे असून ही सावंतवाडी स्थानकात रेल्वे गाड्यांचे अधिकचे पर्याय उपलब्ध नाहीत. अलीकडेच संगमेश्वर आणि खेड ला अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला, हे सर्व लक्षात घेता रेल्वे अभ्यासक मिहिर मठकर आणि कोंकण रेल्वे समन्वयक समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ रेल्वे अभ्यासक सुरेंद्र नेमळेकर यांनी नियोजन करून श्री सिन्हा यांची भेट घेतली आणि विविध विषयावर चर्चा केली. यावेळी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी या व्हॉट्सॲप ग्रुप च्या माध्यमातून श्री सिन्हा यांना निवेदन देण्यात आले.

सावंतवाडी टर्मिनस चे उर्वरित टप्पा २ चे काम पूर्ण करणे आणि येथील स्थानकाचा विकास केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेतून करावे इत्यादी मागणया यावेळी करण्यात आल्या, येथील स्थानकात प्रवाशांची वर्दळ पाहता मंगलोर,मत्स्यगंधा,वंदे भारत,मंगला,नेत्रावती,गोवा संपर्क क्रांती,एलटीटी दुरोंतो,मरूसागर,त्रिवेंद्रम निजामुद्दीन आदी एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा तसेच कोरोना काळात थांबा काढून घेण्यात आलेल्या राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस आणि नागपूर-मडगाव या गाड्यांचा थांबा तत्काळ चालू करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या विषयाला अनुसरून बोलताना श्री सिन्हा हे सावंतवाडीकरांचा मागण्यांबद्दल अनुत्सुकच दिसले, त्यांनी सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही असे सांगितले, सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही तसेच प्रीमिअम गाड्या ह्या सावंतवाडी साठी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येथे राजधानी तर नाहीच पण नव्याने चालू झालेली वंदे भारतचा थांबा देखील येथे मिळण्याचा आशा धूसर झाल्यात.टर्मिनस संदर्भात श्री सिन्हा यांना विचारले असता सावंतवाडी टर्मिनस करिता कोंकण रेल्वे कडे निधीची तरतूद नाही असे स्पष्ट केले त्यामुळे तमाम कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय असणारा सावंतवाडी टर्मिनस चे भविष्य हे अंधातरीतच आहे असे दिसते. अलीकडेच अनेक प्रवासी संघटना आणि संस्था यांनी या संदर्भात निवेदने सादर केली होती परंतु रेल्वे प्रशासन याची दखल घेत नसल्याची खंत मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी मांडली.
गणेश चतुर्थी ही वीस दिवसांवर येऊन ठेपली असता सोडलेल्या जादाच्या गाड्या ह्या कुडाळ पर्यंतच आणि पुढे मडगाव आणि दक्षिणेकडील आहेत त्यामुळे यावर्षी तरी निदान अजुन गणपती स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडे होत आहे. सध्यातरी सोडलेल्या गाड्या ह्या अपुऱ्या आहेत अजुन गाड्या सोडून गणेश भक्तांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
कोंकण रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळालेली तोंडी उत्तरे ही अपेक्षित नसून याबाबत लवकरच सावंतवाडीकरांना घेऊन भूमिका जाहीर करू असे मिहिर मठकर यांनी सांगितले.दिलेल्या निवेदनात मिहिर मठकर, सुरेंद्र नेमळेकर आणि सागर तळवडेकर यांनी सह्या केल्या होत्या.
सिंधुदुर्ग: हागणदारी मुक्त अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यानं बाजी मारली आहे. राज्यातल्या 351 तालुक्यामध्ये सर्वप्रथम स्वच्छतेतील पंचतारांकित मानांकन मिळवणारा कुडाळ हा पहिला तालुका ठरला आहे. याआधीच सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारी मुक्त अभियानात संपूर्ण राज्यात सर्वात प्रथम संपूर्णपणे हागणदारी मुक्त झाला आहे. श्रावण महोत्सवात स्वच्छ्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी ही घोषणा केली.
कुडाळ पंचायत समिती आयोजित ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचा सांगता समारंभ काल संपन्न झाला. तसेच यावेळी श्रावणमेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या श्रावण महोत्सवाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी कुडाळ तालुक्यातल्या ६० गावांमधली माती दिल्लीला पाठवण्यात येणाऱ्या कलशात एकत्र करुन तो कलश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला.
सिंधुदुर्ग | सागर तळवडेकर :रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना काही थांबे प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केले आहेत. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकावर मंगला तसेच एलटीटी कोचुवली एक्सप्रेसला तर संगमेश्वरवासियांची दीर्घ काळ मागणी असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर केला आहे, या मधे सावंतवाडीकरांची मागणी असलेली मंगला,मंगलोर,वंदे भारत,नागपूर – मडगाव,मत्स्यगंधा,नेत्रावती आणि कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या त्रिवेंद्रम राजधानी आणि गरीब रथ एक्सप्रेस संदर्भात काहीच निर्णय झाले नसल्याचे उघड झाले आहे.एकंदरीत सावंतवाडीकरांचा मागण्यांना केराची टोपली दाखवली असेच दिसते.
कोकण रेल्वेच्या संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी चिपळूण संगमेश्वर फेसबुक समूहा च्या माध्यमातून संगमेश्वरवासियांना सोबत घेऊन पत्रकार संदेश जिमन यांनी वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. संगमेश्वरवासियांच्या या दीर्घ लढ्याला अखेर यश आले आहे. रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवरील गाड्यांना जे काही प्रायोगिक थांबे दिले आहेत त्यात संगमेश्वरवासियांच्या नेत्रावती एक्सप्रेसला थांबा देण्याच्या मागणीचाही समावेश झाला आहे.
याचबरोबर मुंबई ते मडगाव या मार्गावर अलीकडेच वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मिळालेल्या खेड स्थानकाला रेल्वेने आणखी एक भेट दिली आहे. एर्नाकुलम -हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणारी मंगला एक्सप्रेस तसेच एलटीटी ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला खेड थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खेडवासीयांना आणखीन दोन गाड्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे या साठी जल फाउंडेशच्या अक्षय महापदी यांनी विशेष प्रयत्न केले होते.
रेल्वे बोर्डाने त्या त्या झोनला पाठवलेल्या पत्रात प्रायोगिक थांबा मंजूर केलेल्या गाड्यांना नवीन थांब्यावर थांबवण्याची अंमलबजावणी त्या त्या ठिकाणच्या सोयीनुसार शक्य तितक्या लवकर करण्याबाबत सूचित केले आहे.
सावंतवाडीकरांच्या पदरी मात्र उपेक्षाच.
अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न आणि प्रवासी संख्या असूनही सावंतवाडीकरांवर अन्याय सुरूच आहे. पहिल्यांदा झीरो टाईम टेबलच कारण देऊन त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि एलटीटी कोचुवेली गरीबरथ एक्सप्रेसचे थांबे काढून घेण्यात आले, त्यानंतर नागपूर मडगाव या स्पेशल गाडीचा थांबा देखील या स्थानकातून काढून घेण्यात आला.या स्थानकात दोन महिन्यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा देखील नाकारण्यात आला होता, येथील टर्मिनसच काम देखील ठप्प आहे, या सर्व बाबींवर अलीकडेच काही प्रवासी संघटनांनी देखील पाठपुरावा केला होता परंतु रेल्वे बोर्डाने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत असेच चित्र येथे पाहायला मिळते. या स्थानकात स्वर्गीय डी के सावंत यांचा पुढाकाराने मंगला आणि मंगलोर एक्सप्रेसला थांबा कोकण रेल्वे चे संचालक श्री गुप्ता यांनी तत्वतः मान्य केला होता, तसेच येथे वंदे भारत, नेत्रावती, मत्स्यगंधा, नागपूर मडगाव, मंगलोर, मंगला या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून सर्वजण प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी आवश्यक पाठपुरावा देखील सुरू आहे परंतु प्रवासी आणि प्रवासी संघटनांची उदासीनता देखील या थांब्याना येथे मंजुरी न मिळणे कारणभूत असू शकते असेच दिसते.
कोल्हापुर :सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. उद्या बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर किशोर तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे.
के. मंजूलक्ष्मी हे सध्या सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून ते सिंधुदुर्ग मध्ये सर्वाधिक प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. ते सिंधुदुर्ग येथे दोन वर्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तीन वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.के.मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या त्यानंतर दोन वर्षानी २० मे २०२० रोजी त्यांची जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली होती. कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट काम केले होते.तर सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला होता यामुळे त्यांचा दिल्लीत सत्कार ही झाला होता .
