Category Archives: सिंधुदुर्ग

मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचा सिंधुदुर्ग दौरा संपन्न

   Follow us on        

मालवण: मानवता विकास परिषद व रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, तसेच राष्ट्रसंत श्री पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्री. श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत यशस्वीरित्या संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष श्री. राजन गिरप यांच्यासह उद्योजक उमेश बिरमोळे, मोहन वराडकर, सागर हडकर, परशुराम पाटकर आणि सामाजिक क्षेत्रातील विलास मेस्त्री, यतीन खोत यांसारख्या मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटींमध्ये ‘मसुरे सर्वांगीण विकास परिषद’ स्थापनेबाबत आणि स्थानिक विकासाच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या दौऱ्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देताना श्रीकांत सावंत यांनी स्पष्ट केले की, कोकणच्या प्रत्येक गावाचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील कार्यांचे नियोजन जर एकात्म आणि सहकार्यपूर्ण पद्धतीने झाले, तर कोकणच्या विकासाची घोडदौड कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, येत्या १४ मे २०२६ रोजी मालवणच्या लीलांजली सभागृहात आयोजित ‘छत्रपती संभाजी महाराज जयंती’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा ‘विशेष दिशादर्शक’ ठरणार असल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.

शिरोडा – बोरिवली एसटी बस सेवा सुरू

   Follow us on        

शिरोडा: कोकणातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शिरोडा बस स्थानकातून बोरिवली (मुंबई) साठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (MSRTC) एसटी बस सेवा पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून बंद असलेली ही सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे शिरोडा आणि परिसरातील चाकरमानी तसेच नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

​बसचा मार्ग आणि थांबे

​ही बस शिरोडा येथून सुटल्यानंतर विविध महत्त्वाच्या शहरांमधून प्रवास करणार आहे. या बसचा मार्ग खालीलप्रमाणे असेल:

​शिरोडा

वेंगुर्ला

कुडाळ

कणकवली

राजापूर

लांजा

संगमेश्वर

चिपळूण

महाड

पनवेल

शीव (सायन)

अधेरी

बोरिवली.

​वेळापत्रक

​प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे:

​शिरोडा स्थानक: संध्याकाळी ०४:३० वाजता सुटणार.

​वेंगुर्ला आगार: संध्याकाळी ०५:०० वाजता.

​बोरिवली स्थानक: सकाळी ०७:०० वाजता (दुसऱ्या दिवशी आगमन/प्रस्थान संदर्भात).

​प्रवाशांना या बससाठी ऑनलाइन आरक्षण (Online Booking) करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने सर्व प्रवाशांना या बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या बसमुळे मुंबई-कोकण प्रवासासाठी आता एक खात्रीशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील डिजिटल कोच इंडिकेटर अवघ्या दोन महिन्यांत बंद

   Follow us on        

​सावंतवाडी: कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी  येथे प्रवाशांच्या सुविधेसाठी बसवण्यात आलेले डिजिटल कोच इंडिकेटर अवघ्या दोन महिन्यांत  बंद पडले आहेत. मागील नऊ दिवसांपासून ही यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांना आपला डबा शोधण्यासाठी पुन्हा एकदा धावपळ करावी लागत आहे.

​प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये या स्थानकावर डिजिटल कोच इंडिकेटर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मोठ्या प्रतिक्षेनंतर ही यंत्रणा कार्यान्वित झाली, मात्र तंत्रज्ञानातील बिघाडामुळे अवघ्या दीड महिन्यातच ती निकामी झाली आहे. सध्या हे इंडिकेटर असून नसल्यासारखेच आहेत.

​स्थानकावरील ही महत्त्वाची सुविधा बंद असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यात सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी यासंदर्भात रत्नागिरी येथील RRM (प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक) कार्यालयात रीतसर तक्रार नोंदवली आहे.

​”रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारली आहे, मात्र तिची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही यंत्रणा तात्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावी,” अशी मागणी मिहीर मठकर यांनी केली आहे.

​कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना कोच इंडिकेटर नसल्यामुळे मोठा फटका बसत आहे. ऐन गर्दीच्या वेळी गाडी आल्यावर डबा कुठे येईल हे समजत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. आता रेल्वे प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन हे इंडिकेटर लवकरात लवकर सुरू करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंबोली: मद्यधुंद टेम्पो चालकामुळे १० वर्षीय मुलीचा मृत्यू; आई गंभीर जखमी

   Follow us on        

सिंधुदुर्ग: आंबोली घाटात रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका टेम्पो चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने १० वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. निकिता प्रसाद राऊत (वय १०, रा. फौजदारवाडी, आंबोली) असे मृत मुलीचे नाव असून, तिची आई चैताली राऊत यांच्यावर उपचार सुरू आहेत.

​अपघातानंतर थरार आणि पळ काढण्याचा प्रयत्न:

मिळालेल्या माहितीनुसार, राऊत कुटुंबीय दुचाकीवरून आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. यावेळी आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या ‘नानापाणी’ जवळ समोरून येणाऱ्या, लादी (फरशी) वाहून नेणाऱ्या टेम्पो चालकाने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की निकिता दुचाकीवरून फेकली गेली आणि तिचा जागीच अंत झाला. अपघातानंतर घाबरलेल्या मद्यधुंद चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही किलोमीटर अंतरावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वळणावर टेम्पो रस्त्याच्या मधोमध उलटला. टेम्पोमधील सर्व फरशा रस्त्यावर विखुरल्या गेल्या, ज्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली होती.

​ग्रामस्थांचा संताप आणि पोलिसांची कारवाई:

या घटनेची माहिती मिळताच आंबोलीतील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर मोठी गर्दी केली. मद्यधुंद चालकामुळे एका निष्पाप मुलीचा जीव गेल्याने नागरिक अत्यंत आक्रमक झाले होते. ‘त्या दोघांना आमच्या ताब्यात द्या’ अशी मागणी करत संतप्त जमावाने संताप व्यक्त केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार रामदास जाधव आणि संतोष गलोले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चालक आणि त्याच्या साथीदाराला (क्लीनर) ताब्यात घेतले. पोलिसांनी योग्यरीतीने परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

धक्कादायक! आकाशातून पडला ५ किलोचा बर्फाचा गोळा; घराचे छप्पर फोडून घरात कोसळल्याने खळबळ

   Follow us on        

मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली-परबवाडी येथे एक अत्यंत अजब आणि धक्कादायक घटना घडली आहे. भर उन्हाळ्यात विजय मधुकर देऊळकर यांच्या घराच्या छपरावर आकाशातून सुमारे ५ किलो वजनाचा बर्फाचा एक भलामोठा तुकडा कोसळला. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास देऊळकर कुटुंब आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक झालेल्या या मोठ्या आवाजाने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. हा बर्फाचा गोळा इतक्या वेगाने आणि शक्तीने पडला की, त्याने घराच्या छपराची कौले आणि लाकडी रिप तोडून थेट स्वयंपाकघरात प्रवेश केला.

​ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा घरातील महिला अर्चना देऊळकर या स्वयंपाकघरातच होत्या. सुदैवाने, बर्फाचा हा तुकडा त्यांच्या अंगावर न पडता बाजूला पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांची मोठी धावपळ उडाली आणि ग्रामस्थांनी देऊळकर यांच्या घराकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, घटना घडली तेव्हा परिसरात कोणत्याही प्रकारचे ढगाळ वातावरण नव्हते किंवा पावसाचे कोणतेही संकेत नव्हते. घरच्या आजूबाजूला कोणताही उंच भागही नाही होता. रखरखत्या उन्हात अचानक आकाशातून एवढा मोठा बर्फाचा तुकडा पडल्याने हे नेमके काय गौडबंगाल आहे, यावर गावात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच देवली गावचे सरपंचांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा तुकडा नैसर्गिक गारांचा प्रकार आहे की विमानातून पडलेला साचलेला बर्फ (Blue Ice), याचा उलगडा होणे आवश्यक आहे. या रहस्यमय घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पुराव्यासाठी देऊळकर यांनी तो बर्फाचा तुकडा सुरक्षितपणे फ्रीजमध्ये जतन करून ठेवला असून, सध्या संपूर्ण जिल्ह्यात या ‘आस्मानी’ संकटाचीच चर्चा रंगली आहे.

शक्तीपीठ महामार्गाच्या फेररेखांकनामुळे कोकणची जैवविविधता धोक्यात

   Follow us on        

सिंधुदुर्ग: शक्तीपीठ महामार्गाचे नवीन फेररेखांकन आता केगड-कुंभवडेतून तळकट, झोळंबेमार्गे डेगवे-बांदा अशा अतिसंवेदनशील आणि जैवविविधतेने नटलेल्या भागातून करण्याचे निश्चित झाले आहे. या प्रस्तावित मार्गामुळे कोकणातील अमूल्य वनसंपदा आणि दुर्मिळ वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे. महामार्गाच्या या नवीन आराखड्यामुळे निसर्गाचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली असून प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

​डॉ. परुळेकर यांनी माहिती दिली की, ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे, तिथे असंख्य मोठ्या वृक्षांची बेसुमार तोड केली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. हा भाग नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असून महामार्गाच्या कामामुळे इथल्या पर्यावरणाचा समतोल ढासळणार आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा हा ऱ्हास स्थानिक पर्यावरण आणि जनजीवनासाठी घातक ठरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला असून या वृक्षतोडीमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले आहे.

​या परिसरातील वन्यजीवांच्या अस्तित्वाचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, नुकतेच सरमळे आणि तळकट यांसारख्या गावांमध्ये अत्यंत दुर्मिळ अशा ‘किंग कोब्रा’ (नागराज) या सापाचे दर्शन घडले आहे. ज्या भागात नागराज, पट्टेरी वाघ, बिबट्या, हत्ती आणि गवे यांसारख्या वन्यजीवांचा मुक्त वावर आहे, तिथे महामार्ग बांधणे पर्यावरणासाठी विनाशकारी ठरेल. वन्यजीवांचे अधिवास नष्ट झाल्यामुळे भविष्यात मानव-प्राणी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

​सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना डॉ. परुळेकर म्हणाले की, किंग कोब्राचे वारंवार दर्शन घडणे हा निसर्गाचा एक मोठा संकेत आहे. मात्र, अघोरी विद्या आणि भोंदू बाबांच्या नादी लागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निसर्गाचे आणि ईश्वराचे हे संकेत कळणार आहेत का, असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे. महामार्गाच्या निमित्ताने होणारी वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे हे आक्रमण स्थानिक जनतेच्या संतापाचे कारण ठरत असून, निसर्गप्रेमींकडून या मार्गाला विरोध दर्शवला जात आहे.

 

Photo Credit – AI

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद; कारण काय?

   Follow us on        

विजयदुर्ग: पालकमंत्री नितेश राणे यांनी होळीच्या कालावधीत मोठ्या गाजावाजात सुरू केलेली रो-रो बोट सेवा गुढीपाडव्याच्या दिवशीच बंद पडली आहे. या बोट सेवेचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने आणि बोटीत मिळणारे खाद्यपदार्थही महाग असल्याने प्रवाशांवर आर्थिक ताण वाढला. परिणामी, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा बंद करावी लागली. यावर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी टीका करत, सुरू केलेले प्रकल्प अल्पावधीत बंद पडणे ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले.

उपरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही सेवा १९ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी थांबवण्यात आली. बोटीचे तिकीट महाग असल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी या सेवेपासून दूर राहिले. तसेच, बोट मुंबईहून सुटत असताना विजयदुर्ग येथे पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. बोटीत शौचालय आणि विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा नसल्याचीही तक्रार करण्यात आली.

याशिवाय, बोटीत खाद्यपदार्थांच्या किंमतीही जास्त असल्याचे समोर आले. उदाहरणार्थ, पोहे १५० रुपये तर पाण्याची बाटली ९० रुपयांना विकली जात होती, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यामुळेच या सेवेचा वापर कमी झाला आणि एका दिवशी ५० पेक्षा जास्त प्रवासीही मिळाले नाहीत, असे उपरकर यांनी नमूद केले

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंधुदुर्ग कोकण रेल्वेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित – सागर तळवडेकर

   Follow us on        

सावंतवाडी: लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा आजही कोकण रेल्वेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी केला आहे. कोकण रेल्वेमुळे गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांना विकासाचा मोठा फायदा झाला असताना महाराष्ट्रातील सिंधुदुर्गकडे मात्र दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुविधांच्या बाबतीत मागे ठेवण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोवा आणि कर्नाटक राज्यांना आधुनिक डेमू आणि मेमू गाड्यांचे जाळे उपलब्ध झाले आहे, तर सिंधुदुर्गमधील प्रवाशांना अद्यापही मर्यादित सेवा आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यातील प्रवाशांना कमी तिकिट दरात सेवा मिळत असली तरी महत्त्वाच्या गाड्यांना थांबे मिळत नसल्याने स्थानिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेक गाड्या जिल्ह्यातून धावत असल्या तरी त्यांचा लाभ स्थानिकांना पुरेसा मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे तळवडेकर यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी टर्मिनस हा केवळ एक प्रकल्प नसून कोकणाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते. मोपा विमानतळ आणि प्रस्तावित पंचतारांकित हॉटेल प्रकल्पांमुळे सावंतवाडी परिसर पर्यटनदृष्ट्या अधिक सक्षम होणार आहे.

मात्र सध्या कोकणातून धावणाऱ्या बहुतांश गाड्या गोवा किंवा दक्षिण भारताकडे वळवल्या जात असल्याने स्थानिक प्रवाशांना आरक्षणाची समस्या भेडसावत आहे. गणेशोत्सव, होळी यांसारख्या सणांच्या काळात ही अडचण अधिक तीव्र होते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन या प्रश्नावर आवाज उठवावा, असे आवाहन सागर तळवडेकर यांनी केले आहे.

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेला सरकारचा मोठा ‘बूस्टर’; मुंबई ते तळकोकण प्रवास आता एका तासात

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र  सरकारने कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणाऱ्या विमानसेवेसाठी १०० टक्के व्हायाबिलिटी गॅप फंडिंग (VGF) मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विमानसेवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार असून, नियमित उड्डाणांना चालना मिळणार आहे.

या निर्णयानंतर मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) हा प्रवास आता केवळ एका तासात पूर्ण होणार आहे. ही सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून, प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल.

कोकणातील पर्यटनासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जलद आणि सुलभ हवाई सेवा उपलब्ध झाल्याने देशभरातील पर्यटकांना सिंधुदुर्ग आणि आसपासच्या पर्यटनस्थळांना भेट देणे अधिक सोपे होईल. त्यामुळे कोकण पर्यटनाचा ‘टेक ऑफ’ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, या निर्णयाचा स्थानिक अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. हॉटेल उद्योग, पर्यटनाशी संबंधित व्यवसाय आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार आहे. यामुळे कोकणातील विकास प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

विधानभवनातील कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या या निर्णयाचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, ही सेवा सुरू होणे ही प्रवाशांची दीर्घकाळाची मागणी होती. त्यामुळे हा निर्णय कोकणवासीयांसाठी दिलासादायक ठरला असून, प्रदेशाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

वाडवडिलांच्या ‘तडजोडी’ ठरत आहेत आताच्या पिढीची ‘डोकेदुखी’!

   Follow us on        

सिंधुदुर्ग: कोकणात वाडवडिलांच्या काळातील तोंडी केलेल्या तडजोडी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार कोणतीही लेखी कागदपत्रे न करता केवळ विश्वासावर केले जात होते. काही ठिकाणी जमिनी कायमस्वरूपी, तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दिल्या जात होत्या. तसेच अदलाबदलीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात झाले होते.

मात्र, या व्यवहारांची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याने संबंधित व्यक्तींच्या मृत्यूनंतर मोठा गोंधळ निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी जमीन एका व्यक्तीच्या नावावर असली तरी प्रत्यक्ष वहिवाट दुसऱ्याच्याकडे असल्याचे दिसून येते. त्यामुळे वादाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.

या पार्श्वभूमीवर गावोगावी भांडणे वाढत असून काही ठिकाणी मारामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांपर्यंत परिस्थिती पोहोचत आहे. जमीन मिळवण्यापेक्षा अहंकाराचे प्रश्न अधिक पुढे येत असल्याचेही निरीक्षण आहे. परिणामी समाजात गटबाजी वाढत असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

या वादांचा गैरफायदा समाजातील विघातक प्रवृत्तींकडून घेतला जात असल्याचीही चर्चा आहे. प्रशासनाकडून या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. न्यायालयात अशा प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे.

शेतात जाण्यासाठीच्या वाटांवरूनही वाद निर्माण होत असून, ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. दोनच दिवसापूर्वी सावंतवाडी येतील ओवळीयेतील महिलेचा अशाच एका वादातून निर्दयी खून करण्यात आला. एकूणच, “कोकणाचा बिहार होत चालला आहे” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या समस्येवर ठोस उपाययोजना करून जुन्या व्यवहारांचे कायदेशीर पुनरावलोकन करण्याची गरज व्यक्त होत आहे

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search