Category Archives: सिंधुदुर्ग

मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप;उड्डाणपुलाची मागणी

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा हा मार्ग पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. मात्र, या मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकामुळे प्रवाशांचा मोठा वेळ आणि इंधन वाया जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार, गाडी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर साधारणपणे १० ते १५ मिनिटे हे फाटक बंद ठेवले जाते. गोव्याला जाणाऱ्या गाड्यांची मोठी वर्दळ असल्याने दिवसातून अनेक वेळा हे फाटक बंद असते, परिणामी फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

​या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला बसत असून वेळेवर कामावर पोहोचणे कठीण झाले आहे. या समस्येवर रेल्वे स्थानकामार्फत एक पर्यायी रस्ता उपलब्ध आहे, परंतु तो रस्ता सुमारे २ किलोमीटरचा वळसा घालून जातो. वाढते इंधन दर आणि अतिरिक्त अंतरामुळे वाहनधारक या वळसा मार्गापेक्षा फाटकावर ताटकळत थांबणे पसंत करतात. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधणे हाच एकमेव ठोस उपाय असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन समन्वयाने उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर मे महिन्यापासून टोल वसुली सुरू

   Follow us on        

​मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या टोल वसुलीसाठी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्या असून, २३ एप्रिल ही निविदा भरण्याची शेवटची तारीख आहे. २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जातील आणि त्यानंतर ठेकेदार निश्चित केला जाईल. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास मे २०२६ पासून प्रत्यक्ष टोल वसुली सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​जानवली पूल ते पत्रादेवी या ६० किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ही टोल वसुली केली जाणार आहे. यामध्ये दुचाकी आणि तीन आसनी वाहनांना सवलत देण्यात आली असून, उर्वरित सर्व वाहनांना टोल भरावा लागणार आहे. या मार्गावरून वार्षिक सुमारे ५७.८८ कोटी रुपयांचा टोल जमा होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

​विशेष म्हणजे, यापूर्वी जून २०२३ मध्ये हा टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, टोल विरोधी कृती समिती आणि विविध राजकीय पक्षांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे ही वसुली बंद करावी लागली होती. गेल्या तीन वर्षांपासून या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नव्हती, परंतु आता महामार्गाचे चौपदरीकरण पूर्णत्वाकडे जात असल्याने प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा टोलवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

शक्तीपीठ महामार्ग रधानगरीमार्गे सिंधुदुर्गात आणा

   Follow us on        

सिंधुदुर्ग: प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्ग’ जर राधानगरीमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणला नाही, तर या जिल्ह्याला महामार्गाचा ‘बगल’ मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन आणि स्थानिक व्यापारावर होईल, असा इशारा माजी आमदार संदेश पारकर यांनी दिला आहे.

​पारकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारकडे मागणी केली आहे की, सध्या आखण्यात येत असलेल्या महामार्गाच्या आराखड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला योग्य स्थान मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जर हा महामार्ग जिल्ह्याबाहेरून गेला, तर कोकणातील आर्थिक चक्रावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

​पर्यटनाला मिळणार मोठी चालना

​महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेल्यास गोवा-सिंधुदुर्ग पर्यटन साखळी अधिक मजबूत होईल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवासाची सोय होईल. राधानगरी मार्गे जोडणी मिळाल्यास खालील पर्यटन स्थळांना मोठा फायदा होऊ शकतो:

​किल्ले: सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग आणि रांगणा किल्ला.

​किनारे: तारकर्ली आणि देवबाग.

​थंड हवेची ठिकाणे: आंबोली आणि सावंतवाडी.

​धार्मिक स्थळांचा विकास

​केवळ निसर्ग पर्यटनच नाही, तर धार्मिक पर्यटनालाही यामुळे गती मिळेल. कुणकेश्वर, आंगणेवाडी, मांगरूर दत्त मंदिर आणि वालावल लक्ष्मीनारायण मंदिर यांसारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांवर भाविकांची संख्या वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असेही पारकर यांनी नमूद केले.

​जर महामार्गाने सिंधुदुर्गला वळसा घातला, तर जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आराखड्यात बदल करून राधानगरी मार्गे सिंधुदुर्गचा समावेश करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांकडून केली जात आहे.

देवगड: कुणकेश्वर येथे प्राचीन ‘गंगाकुंड’ सापडले; २५० ते ३०० वर्षे जुने असण्याचा अंदाज

   Follow us on        

देवगड:दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसरात एका प्राचीन ‘गंगाकुंडाचा’ शोध लागला आहे. मंदिरापासून साधारण १ ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कुणकेश्वर-खालचीवाडी येथील ओहोळाजवळ हे पुरातन कुंड असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. हे गंगाकुंड सुमारे २५० ते ३०० वर्षांपूर्वीचे किंवा त्याहूनही प्राचीन असावे, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

​स्थानिक ग्रामस्थ संतोष लब्दे, संतोष लाड आणि शरद वाळके यांनी राबवलेल्या शोधमोहिमेमुळे हे दुर्लक्षित कुंड पुन्हा समोर आले आहे. अनेक वर्षांपासून झाडाझुडपांचा पालापाचोळा आणि गाळ साचल्यामुळे हे कुंड पूर्णतः बुजून गेले होते. या शोधानंतर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली आणि कोकण इतिहास परिषदेचे रणजीत हिर्लेकर यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिकांच्या मदतीने या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

​या कुंडाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून ते जांभ्या दगडात कोरलेले आहे. हे कुंड साधारण ६ बाय ६ फूट आकाराचे असून, त्यात विहिरीसारखी खोदाई करण्यात आली आहे. त्याच्या आत पुन्हा ३ बाय ३ फुटांचा एक खोल भाग असून त्याची खोली अंदाजे ५ ते ६ फूट आहे. विशेष म्हणजे, या कुंडात एका चौकोनी पारावर जांभ्या दगडात कोरलेले देखणे शिवलिंगही आहे. सध्या या कुंडात सुमारे तीन फूट खोलीपर्यंत काचेसारखे स्वच्छ पाणी साचलेले दिसत आहे.

​कोकण इतिहास परिषदेचे रणजीत हिर्लेकर यांनी माहिती दिली की, १९९२ मध्ये श्रीदेव कुणकेश्वर मंदिराच्या ‘वज्रलेपा’साठी याच गंगाकुंडातील पवित्र पाण्याचा वापर करण्यात आला होता. हे गंगाकुंड प्राचीन काळातील उत्कृष्ट पाणी व्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे. स्वच्छता केल्यामुळे या ऐतिहासिक वारशाला आता पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली असून, या शोधामुळे कुणकेश्वरच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे.

सावंतवाडी: सोनू उर्फ अमित निवजेकर तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी: सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी परिसरातील गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आरोंदा येथील रहिवासी सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१) याला कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश मंजूर करण्यात आले आहेत. निवजेकर याच्यावर मारामारीचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध अनेक नॉन-कॉग्निजेबल (NC) तक्रारींचीही नोंद आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही कडक कारवाई केली आहे.

​या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर, दोन पोलीस अंमलदारांच्या कडक देखरेखीखाली त्याला गोवा राज्यातील त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षितरित्या सोडण्यात आले. गोव्यातील स्थानिक पोलीस ठाण्यात त्याला हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक बजावणी पूर्ण करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षे त्याला या तीन जिल्ह्यांत प्रवेश करण्यास बंदी असेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग: अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; रात्रीच्या अंधारात मोठी कारवाई

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी: दिनांक १८ सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यांतील तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, कणकवलीचे तहसीलदार दीक्षात देशपांडे, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी तसेच कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता.

 

कारवाईदरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला. आचरा–कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने २ वाहने ताब्यात घेतली, तर देवलीमार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या ३ वाहनांवर वेंगुर्ला पथकाने कारवाई केली. कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने ३ वाहने पकडली, तोंडवली येथे सावंतवाडी पथकाने ३ वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ परिसरात कुडाळ पथकाने ४ वाहने ताब्यात घेतली. अशा प्रकारे विविध ठिकाणी समन्वयाने करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रात्री झाराप परिसरात भेट देत कारवाईचा आढावा घेतला.*

रात्रभर चाललेल्या या मोहिमेत कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत, अगदी ३ वाजेपर्यंत कारवाई सुरू राहिली. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपल्या वाहनातील वाळू टाकून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या. प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला मोठा आळा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित तहसीलदार आणि त्यांच्या पथकांनी समन्वयाने ही कारवाई यशस्वी करून दाखवली. अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अशा प्रकारच्या संयुक्त आणि गुप्त कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा ठाम संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

वेंगुर्ले तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई; ७ कोटींचे अंबरग्रीस जप्त, चौघांना अटक


   Follow us on        

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा परिसरात वनविभागाने गुरुवारी एक मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’ची (ब्लू व्हेल माशाची उलटी) तस्करी उघडकीस आणली आहे. या धाडसी कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, याची बाजारपेठेत किंमत अंदाजे ७ कोटी रुपये इतकी मोठी आहे. याप्रकरणी वनविभागाने चार संशयित आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले असून परिसरात एकच खळबळ माजली आहे.

​बनावट ग्राहक बनून रचला सापळा

शिरोडा परिसरात काही व्यक्ती अंबरग्रीसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे श्री. सचिन शिदतूरे (वनक्षेत्रपाल फिरते पथक, सावंतवाडी) यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः ‘बनावट ग्राहक’ बनून तस्करी करणाऱ्यांशी संपर्क साधला आणि सापळा रचला. गुरुवारी, १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास व्यवहार निश्चित झाल्यावर वनविभागाने या आरोपींना रंगेहात पकडले.

​आरोपींची नावे आणि कारवाईत सहभागी पथक

या प्रकरणात रणजित रामचंद्र नायर (वय ४०, रा. परबगाव शिरोडा), गुरुनाथ नाईक (वय ७०, रा. परबगाव शिरोडा), विभव आडारकर (वय ३५, रा. शिरोडा) आणि निलेश मनोहर पांडजी (वय ३३, रा. रेडी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक श्री. मिलीश शर्मा, विभागीय वनअधिकारी श्री. संजय वाघमोडे आणि साहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वनक्षेत्रपाल सचिन शिदतूरे, अमित कटके, वनपाल सावळा कांबळे, महेश पाटील आणि अन्य वनरक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

​अंबरग्रीस हे अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानले जाते, त्यामुळे केवळ पैशांच्या हव्यासापोटी अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही तस्करीबद्दल माहिती मिळाल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सोशल मीडियावरील ‘क्रेझ’ पडली महागात! विर्डीच्या जंगलात अडकलेल्या ५ विद्यार्थ्यांची थरारक सुटका.

   Follow us on        

दोडामार्ग (प्रतिनिधी): सोशल मीडियावरील माहिती पाहून विर्डी परिसरातील वझरेरेखल धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या गोव्यातील पाच पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात जाणे चांगलेच महागात पडले. मात्र, दोडामार्ग पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीमुळे या पाचही विद्यार्थ्यांची मृत्यूच्या दाढेतून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय? गोव्यातील पणजी-आक्षी येथील चार मुले आणि एक मुलगी असे पाच जण विर्डी गावातील वझरेरेखल धबधबा पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळपर्यंत धबधब्याचा आनंद लुटल्यानंतर, परतीचा मार्ग शोधताना हे विद्यार्थी रस्ता चुकले. मोबाईलचे कमकुवत नेटवर्क, सभोवताली घनदाट जंगल आणि हिंस्र वन्यप्राण्यांचे आवाज यामुळे हे विद्यार्थी प्रचंड घाबरले होते.

पोलिसांची धाडसी मोहीम: घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी सायंकाळी ७:१५ वाजता ‘११२’ क्रमांकावर कॉल करून मदतीची विनंती केली. नागपूर नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच सिंधुदुर्ग पोलिसांनी दोडामार्ग पोलिसांना तातडीने सूचना दिल्या. दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक मानसी गावडे आणि पोलीस हवालदार बाळकृष्ण गवस यांनी विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली.

जंगलात वाहन जाण्यास मार्ग नसल्याने पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन पायी शोधमोहीम सुरू केली. हा परिसर अस्वल, वाघ आणि कोल्हे यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर असलेला भाग असल्याने ही मोहीम अत्यंत जोखमीची होती.

चार तासांनंतर लागला शोध: सुमारे चार तास उपाशीपोटी आणि भीतीपोटी नदीकाठी थरथरत बसलेल्या या विद्यार्थ्यांना अखेर रात्री १०:४५ च्या सुमारास शोध पथकाने शोधून काढले. पोलिसांचा आवाज ऐकताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “आम्ही प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परतलो,” अशी भावना सुटका झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक या पर्यटकांना जंगलाबाहेर काढून त्यांच्या दुचाकींपर्यंत सुरक्षित पोहोचवले.

प्रशासनाचे आवाहन: विर्डीचे जंगल निसर्गाने समृद्ध असले तरी तेवढेच धोकादायक आहे. त्यामुळे पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाताना खबरदारी बाळगावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या या तत्परतेचे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा कोकणवर अन्याय करणारा!

   Follow us on        

​सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा असल्याची भूमिका माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी मांडली आहे. हा महामार्ग थेट गोव्याला जोडला जात असताना, त्याचा एक फाटा रेडी बंदराला जोडला जावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले असून, सद्यस्थितीतील आराखड्यामुळे कोकणातील स्थानिक विकासाला खीळ बसण्याची भीती व्यक्त केली आहे.

​केसरकर यांच्या मते, नागपूरहून येणारा पर्यटक जर थेट गोव्याला निघून गेला, तर कोकणच्या पर्यटनाला त्याचा कोणताही लाभ होणार नाही. कोकणात उत्कृष्ट समुद्रकिनारे आणि बंदरे असताना महाराष्ट्रातील माल निर्यातीसाठी गोव्याच्या बंदराचा वापर का व्हावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा मार्ग आजऱ्यावरून रेडी बंदराला जोडल्यास त्याचा मोठा फायदा होईल. तसेच, कोकण कोस्टल रोड विरारपासून या मार्गाला जोडला जाणार असल्याने, पर्यटकांना पत्रादेवीमार्गे जाणे सहज शक्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.

​शक्तीपीठ महामार्ग केवळ चंदगडवरून गोव्याला जोडला जाऊ नये, असे स्पष्ट करत केसरकर यांनी सुचवले की, त्याचा एक फाटा तिलारी मार्गे उत्तर गोव्याला आणि दुसरा फाटा दक्षिण गोव्याला जोडला जाऊ शकतो. यामुळे चंदगड आणि दोडामार्ग तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. तसेच, हा फोरलेन हायवे चंदगड-दोडामार्गे नेल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल आणि आंबोली, फणसवडे, केसरी यांसारख्या ‘इको सेन्सिटिव्ह’ भागातून बोगदा काढल्यास निसर्गाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या विषयावर त्यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि चंदगडच्या आमदारांशीही चर्चा केली असल्याचे सांगितले.

 

सावंतवाडी बस स्थानकाचे आधुनिकीकरण होणार

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या सावंतवाडी येथील एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे भव्य बसस्थानक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, येत्या दोन महिन्यांत याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना काळामुळे रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता पुन्हा गती मिळाली आहे. सुमारे चार एकर जागेत ‘बीओटी’ (BOT) तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, सावंतवाडीची ओळख राज्यातील एक ‘आदर्श बसस्थानक’ म्हणून निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

​या नवीन बसस्थानकात प्रवाशांसाठी अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था, प्रशस्त रस्ते आणि बसच्या सुलभ हालचालीसाठी आवश्यक रुंदीकरण करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी विविध सुविधांसोबतच, येथे व्यावसायिक संधी निर्माण करून महसूल वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून सावंतवाडी आणि वेंगुर्ला बसस्थानक परिसरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तरतूद करण्यात आल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुनर्विकासाच्या आराखड्यात जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखाना मुख्य जागेत येत असल्याने निर्माण झालेला तांत्रिक अडथळा आता दूर करण्यात आला असून, विशेष बैठकीद्वारे यावर तोडगा काढण्यात आला आहे.

​या प्रकल्पासाठी कोणालाही विस्थापित न करता सर्वांच्या सहकार्याने काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन आमदार केसरकर यांनी दिले. राज्याच्या परिवहन मंत्र्यांशी यावर सविस्तर चर्चा झाली असून, पुढील दोन वर्षांत या प्रकल्पाचे भव्य स्वरूप प्रत्यक्षात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे सांगत, शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. आधुनिक बसस्थानक आणि सक्षम आरोग्य सुविधा यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search