सावंतवाडी | प्रतिनिधी: सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी परिसरातील गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आरोंदा येथील रहिवासी सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१) याला कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश मंजूर करण्यात आले आहेत. निवजेकर याच्यावर मारामारीचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध अनेक नॉन-कॉग्निजेबल (NC) तक्रारींचीही नोंद आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही कडक कारवाई केली आहे.
या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर, दोन पोलीस अंमलदारांच्या कडक देखरेखीखाली त्याला गोवा राज्यातील त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षितरित्या सोडण्यात आले. गोव्यातील स्थानिक पोलीस ठाण्यात त्याला हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक बजावणी पूर्ण करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षे त्याला या तीन जिल्ह्यांत प्रवेश करण्यास बंदी असेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


