मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या टोल वसुलीसाठी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्या असून, २३ एप्रिल ही निविदा भरण्याची शेवटची तारीख आहे. २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जातील आणि त्यानंतर ठेकेदार निश्चित केला जाईल. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास मे २०२६ पासून प्रत्यक्ष टोल वसुली सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जानवली पूल ते पत्रादेवी या ६० किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ही टोल वसुली केली जाणार आहे. यामध्ये दुचाकी आणि तीन आसनी वाहनांना सवलत देण्यात आली असून, उर्वरित सर्व वाहनांना टोल भरावा लागणार आहे. या मार्गावरून वार्षिक सुमारे ५७.८८ कोटी रुपयांचा टोल जमा होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी जून २०२३ मध्ये हा टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, टोल विरोधी कृती समिती आणि विविध राजकीय पक्षांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे ही वसुली बंद करावी लागली होती. गेल्या तीन वर्षांपासून या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नव्हती, परंतु आता महामार्गाचे चौपदरीकरण पूर्णत्वाकडे जात असल्याने प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा टोलवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


