प्रशासकीय दुर्लक्षामुळे भगदाड; दुर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट
Follow us onमालवण:
छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्रात उभारलेला आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी पात्र ठरलेला ऐतिहासिक जलदुर्ग ‘सिंधुदुर्ग’ सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे संकटात सापडला आहे. किल्ल्याच्या दोन क्रमांकाच्या बुरुजाची तटबंदी अचानक ढासळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तटबंदीचे काही महत्त्वाचे दगड हलल्यामुळे तिथे तब्बल तीन मीटर रुंदीचे मोठे भगदाड पडले आहे. किल्ल्यावर राहणारे स्थानिक रहिवासी मंगेश सावंत यांनी या घटनेची माहिती दिली असून, शिवरायांच्या या ऐतिहासिक ठेव्याची अशी दुरवस्था पाहून अत्यंत दुःख आणि हताशपणा वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
तटबंदी कोसळल्याच्या या घटनेमुळे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरातत्त्व विभाग या किल्ल्याच्या संवर्धनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून अत्यंत ढिसाळ कारभार करत असल्याचा थेट आरोपही स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या वास्तूचे तात्काळ संरक्षण व्हावे, यासाठी किल्ल्याची तातडीने संरचनात्मक पाहणी (Structural Audit) करून आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पुरातत्त्व विभागाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.


