मुंबई:
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या महत्त्वपूर्ण कामामुळे मध्य रेल्वेने काही प्रमुख गाड्यांच्या ‘शॉर्ट टर्मिनेशन’ (नियोजित स्थानकापूर्वीच प्रवास संपवणे) कालावधीत ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विकासकामांचा थेट परिणाम मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांवर होणार आहे.
या बदलांनुसार, गाडी संख्या २२१२० मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी ‘तेजस एक्स्प्रेस’ (Tejas Express) २ ऑगस्ट २०२६ पर्यंत सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल, म्हणजेच ही गाडी दादरपर्यंतच धावेल. यासोबतच, गाडी संख्या १२१३४ मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार असून, प्रवाशांना ठाणे स्थानकावरच उतरावे लागेल.
मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, या पायाभूत सुविधांच्या विकासकामामुळे प्रवाशांना होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी या बदलांची योग्य नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


