मुंबई:
मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. लोकल गाड्यांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोमवारपासून मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० अतिरिक्त फेऱ्या धावणार आहेत.
सध्या धावणाऱ्या १२ डब्यांच्या एका लोकलचे रूपांतर आता १५ डब्यांमध्ये करण्यात आले आहे. या बदलामुळे मध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या एकूण फेऱ्यांची संख्या आता २२ वरून थेट ३२ वर पोहोचणार आहे. यामुळे विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होईल.
प्रवासी क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ
१२ डब्यांच्या लोकलच्या तुलनेत १५ डब्यांच्या लोकलची प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी अधिक असते. एका १५ डब्यांच्या लोकल गाड्यातून एकावेळी जवळपास ७,५०० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकतात. वाढीव डब्यांमुळे गर्दीचे व्यवस्थापन करणे रेल्वे प्रशासनाला सोपे जाणार असून, सीएसएमटी ते कल्याण, कसारा, कर्जत आणि खोपोली या मार्गांवरील प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल.
३४ स्थानकांवर फलाट विस्तारीकरणाचे काम वेगात
१५ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी मोठ्या फलाटांची (Platforms) आवश्यकता असते. यासाठी मध्य रेल्वेने आपल्या ३४ स्थानकांमधील ५० फलाटांची लांबी वाढवण्याची योजना आखली आहे.
काम पूर्ण झालेली स्थानके: विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत आणि तानशेत.
उर्वरित स्थानकांवर सध्या युद्धपातळीवर काम सुरू असून, ही कामे जसजशी पूर्ण होतील, तसतशा १२ डब्यांच्या इतर लोकलचेही १५ डब्यांत रूपांतर केले जाईल.
| ट्रेन नंबर | मार्ग (…ते सीएसएमटी) | सुटण्याची वेळ | पोहोचण्याची वेळ (सीएसएमटी) | विशेष नोंद |
| 95306 | अंबरनाथ ते सीएसएमटी | सकाळी ०७:५१ | सकाळी ०९:०९ | अंबरनाथ सायडिंगवरून सुटेल |
| 95346 | अंबरनाथ ते सीएसएमटी | सकाळी ११:०३ | दुपारी १२:२१ | स्लो ते फास्ट’ |
| 95730 | कल्याण ते सीएसएमटी | दुपारी १३:३६ | दुपारी १४:४१ | – |
| 95230 | बदलापूर ते सीएसएमटी | दुपारी १६:४७ | संध्याकाळी १८:१० | – |
| 95142 | कर्जत ते सीएसएमटी | रात्री २०:३८ | रात्री २२:४१ | – |
| ट्रेन नंबर | मार्ग (सीएसएमटी ते…) | सुटण्याची वेळ (सीएसएमटी) | पोहोचण्याची वेळ | विशेष नोंद |
| 95305 | सीएसएमटी ते अंबरनाथ | सकाळी ०९:१५ | सकाळी १०:३४ | – |
| 95717 | सीएसएमटी ते कल्याण | दुपारी १२:२६ | दुपारी १३:३० | वेळ १ मिनिटाने पुढे ढकलली आहे |
| 95231 | सीएसएमटी ते बदलापूर | दुपारी १५:०३ | दुपारी १६:२७ | – |
| 95129 | सीएसएमटी ते कर्जत | संध्याकाळी १८:२१ | रात्री २०:१३ | – |
| 95335 | सीएसएमटी ते अंबरनाथ | रात्री २३:०८ | मध्यरात्री ००:३० | स्लो ते फास्ट’ (अंबरनाथ सायडिंगपर्यंत) |


