मुंबई: मुंबईत राहणाऱ्या तमाम कोकणवासीयांसाठी यंदाचा गणेशोत्सव अधिक आनंददायी ठरणार आहे. मुंबई किंवा नवी मुंबईतून कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी प्रवाशांना सध्या रस्ते किंवा रेल्वेने तब्बल ७ ते ८ तासांचा खडतर प्रवास करावा लागतो. मात्र, आता हा प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार असून प्रवासी फक्त १ तासात थेट कोकणात पोहोचू शकणार आहेत. आगामी १५ ऑगस्टपासून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट विमानसेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार नितेश राणे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, १५ ऑगस्टपूर्वी ‘फ्लाय ९१’ (Fly91) ही विमान कंपनी चिपी ते नवी मुंबई या मार्गावर आपली सेवा सुरू करणार आहे. या सेवेच्या यशानंतर, लवकरच ‘इंडिगो’ (IndiGo) विमान कंपनीची सेवाही या मार्गावर उपलब्ध करून दिली जाईल. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई ते सिंधुदुर्ग ही थेट विमानसेवा तांत्रिक कारणांमुळे बंद होती. त्यामुळे मुंबई-ठाण्यात राहणाऱ्या चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी केवळ रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत होते. आता थेट नवी मुंबईतून सेवा सुरू होत असल्याने प्रवाशांचा मोठा त्रास वाचणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्गसाठी विमानसेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे, ज्याचा थेट फायदा स्थानिक चाकरमान्यांसह पर्यटकांनाही होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अथांग समुद्रकिनारे, सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग यांसारखे ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि मालवणच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. तसेच, कोकणात नवीन उद्योग आणि गुंतवणूक आणण्यासाठी उद्योजकांचा वेळ वाचेल, ज्यामुळे स्थानिक रोजगाराला मोठी गती मिळेल.


