मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला अखेर अधिकृत मान्यता दिली आहे. खाडी देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमधील वाढ, तसेच गाड्यांचे सुटे भाग, टायर आणि दैनंदिन देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ या सर्व बाबींचा सखोल विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या नवीन भाडेवाढीमुळे प्रवाशांना दिलासा देणारी एकच गोष्ट म्हणजे, यापूर्वी लागू करण्यात आलेली साध्या बसेसची १० टक्के हंगामी भाडेवाढ आता रद्द करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार, सुरक्षित व अखंडित सेवा पुरवण्यासाठी ही भाडेवाढ करणे अपरिहार्य झाले होते, असे महामंडळाचे म्हणणे आहे. वाढत्या महागाईमुळे आणि खर्चाच्या भारा मुळे राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कामकाजावर मोठा आर्थिक ताण निर्माण होत होता. त्यामुळे ही सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि एसटी अधिक सक्षम व दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक ठरला आहे.
या भाडेवाढीच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या निधीमुळे प्रवाशांच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा तसेच गुणवत्तापूर्ण सेवा कायम राखण्यास मोठी मदत होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सहाय्यक जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.


