मुंबई:
पश्चिम रेल्वेच्या हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी दुपारी १२.२१ च्या सुमारास बोरिवलीहून विरारकडे जाणाऱ्या एका लोकल ट्रेनचा (गाडी क्र. ९२०८७/९२१०६) डब्याचा दरवाजा धावत्या गाडीत अचानक निखळला. बोरिवली स्थानकाजवळ ही घटना घडली असून, डब्याचा दरवाजा (क्रमांक २२७०B) एका बाजूने पूर्णपणे लटकत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. चालत्या गाडीत दरवाजा निखळल्यामुळे डब्यात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. प्रवाशांनी स्वतः पुढे येत तो लटकणारा दरवाजा धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
या घटनेमुळे मुंबईच्या लोकल गाड्यांच्या देखभालीवर (Maintenance) आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवासी संघटनांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई आणि यात्री संघाचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले की, धावत्या गाडीचा दरवाजा निघणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती. रेल्वे प्रशासनाने तात्पुरती दुरुस्ती करून ट्रेन पुढे मार्गस्थ केली आणि नंतर सखोल तपासणीसाठी ती कारशेडमध्ये पाठवण्यात आली.
पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी घटनेला दुजोरा दिला असून, हा बिघाड तांत्रिक त्रुटीमुळे झाला की देखभालीतील निष्काळजीपणामुळे, याचा तपास केला जाईल असे आश्वासन दिले आहे.


