वर्धा: वर्ध्यातील विरुळजवळ समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला. नागपूरच्या दिशेने प्रवासाला निघालेल्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या इथेनॉलच्या टँकरने जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, धडक बसताच महामार्गावर मोठा थरार नाट्य घडले.
धडकेच्या भीषणतेमुळे कारने क्षणात पेट घेतला. इथेनॉल अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीने काही सेकंदांतच रौद्ररूप धारण केले. कारमध्ये असलेल्या ५ प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी न मिळाल्याने, त्यांचा कारच्या आतच करपून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत झालेले सर्व नागरिक वर्धा जिल्ह्यातीलच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस (HSP) आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि मदतकार्य जलद गतीने व्हावे यासाठी समृद्धी महामार्गावरील नागपूर वाहिनीवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे रोखण्यात आली होती.
सध्या पोलिसांनी जळालेल्या वाहनांना बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत केली आहे. पोलिसांनी सर्व ५ मृतदेहांचे अवशेष ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


