सध्याच्या काळात वाढती वृक्षतोड, जमिनींचे सपाटीकरण आणि परप्रांतीय गुंतवणूकदारांकडून कवडीमोल भावाने होणारी जमिनींची खरेदी यांमुळे कोकणच्या मूळ ओळखीला मोठा धोका निर्माण झाला आहे. निसर्गरम्य कोकण भकास होण्याच्या मार्गावर असून हे संकट दूर करण्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि जागृत नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत.
पूर्वजांनी जीवापाड जतन केलेल्या जमिनी आणि संस्कृती वाचवण्यासाठी ‘रानमाणूस’ अशी ओळख असलेले पर्यावरण कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी यावेळी आपल्या खास शैलीत गाऱ्हाणे मांडून जनजागृती केली. केवळ घोषणाबाजी न करता, निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात प्रत्येकाने प्रत्यक्ष कृतीतून स्वतः ‘राखणदार’ होणे गरजेचे असल्याचा संदेश या पदयात्रेतून देण्यात आला.
या पदयात्रेच्या दरम्यान पर्यावरण रक्षणावर आधारित विविध प्रबोधनात्मक गीते, घोषणा आणि थेट संवादाच्या माध्यमातून मळेवाड परिसरातील नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. आपल्या गावाचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी आणि निसर्गाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमाला मळेवाड आणि परिसरातील अबालवृद्धांसह बहुसंख्य ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती. जल, जंगल, जमीन आणि पर्यावरण रक्षणासाठी कोकणी माणूस मोठ्या संख्येने एकवटला असून, गावागावांत या पदयात्रेचे जंगी स्वागत केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


